आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. आणि विद्यार्थ्यांसाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणं महत्वाचं आहे. जगभरातील अनेक विद्यार्थी आज ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. अशातच गुगलने आपल्या AI चॅटबॉट Gemini साठी ‘AI Premium Plan’ हे खास सब्सक्रिप्शन आणलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ही ऑफर भारतीय विद्यार्थ्यांसाठी नाही आहे.
अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुगलकडून ही मोठी ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थांना गुगल चे AI ‘जेमिनी ॲडव्हान्स्ड‘ मोफत वापरता येणार आहे. ज्यांच्या ईमेल आयडी मध्ये ‘.edu’ असेल अशा विद्यार्थ्यांना गुगल AI च्या अनेक चांगल्या सुविधा मोफत मिळतील.
काय आहे ही ऑफर ?
गुगल आता ॲडव्हान्स्ड नोटबुक, एलएम प्लस आणि डेटा साठवण्यासाठी 2 टेराबाइट क्लाऊड स्टोरेज यांसारखी उपकरणे पैसे न घेता कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फ्री मध्ये देणार आहे. पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत ही ऑफर विद्यार्थ्यांना मोफत मिळेल. याचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 30 जून 2025 च्या आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
जेमिनी ॲडव्हान्स्ड हे गुगलचे सर्वात पॉवरफुल एआय मॉडेल आहे. ते जेमिनी 2.5 प्रो या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अनेक खास गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला अभ्यासासाठी कामी येतील. विद्यार्थी जेमिनीचा वापर खोलवरचे संशोधन करण्यासाठी करू शकतात. यामध्ये तुम्ही पीडीएफ फाईल्स अपलोड करून त्यामधील महत्त्वाची माहिती निवडू शकता आणि त्याच पानावर अधिक माहिती देखील मिळवू शकता. जेमिनी ॲडव्हान्स्ड गुगलच्या इतर टूल्ससोबत सहजपणे जोडले जाते. यामुळे तुम्ही इतर ॲप्समध्ये थेट एआयचा वापर करू शकता.
तसंच, 2 टेराबाइट स्टोरेजमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या नोट्स, प्रेझेंटेशन, गृहपाठ आणि प्रोजेक्ट्स ठेवण्यासाठी भरपूर स्टोरेज मिळेल. याशिवाय ते व्हिडिओ आणि पॉडकास्ट देखील तयार करू शकतील. कारण हे Ai मॉडेल वापरकर्त्यांना टेक्स्ट फाईल्समधून मल्टीमीडिया कंटेंट बनवण्याची सोय देतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून शिकता येतं, आपले विचार मांडता येतात.
Google हे नवीन बदल करत Copilot आणि OpenAI चॅटजीपीटी यांसारख्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
हे ही वाचा : गुगलवरुन नंबर घेताना सावधान!
भारतातील विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर का नाही ?
गुगलच्या नियमांनुसार या ऑफरसाठी विद्यार्थांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यांच्याकडे अमेरिकेतील शिक्षण संस्थेने दिलेला ‘.edu’ ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. ते अमेरिकेचे रहिवासी असावेत. विद्यार्थ्यांच्या कॉलेजमधील नावनोंदणीची पडताळणी आवश्यक आहे आणि त्यांचे वैयक्तिक Gmail खाते असणं गरजेचं आहे. ते Workspace खाते नसावं.
भारतातील विद्यार्थी जरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिकत असले किंवा ऑनलाइन शिक्षण घेत असले तरी या मोफत ऑफरसाठी ते नोंदणी करू शकत नाहीत. गुगलने अमेरिकेमधील विद्यार्थ्यांसाठी सांगितलेल्या पात्रता निकषात जर भारतीय विद्यार्थी बसत असतील तरच ते यासाठी पात्र ठरतील.
याव्यतिरिक्त भारतातील विद्यार्थी Google One AI प्रीमियम प्लॅनद्वारे जेमिनी ॲडव्हान्स्ड वापरू शकतात.या सब्सक्रिप्शनमध्ये अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ऑफरप्रमाणेच सुविधा मिळतात. मात्र त्याची किंमत दरमहा ₹1,950 आहे.
जरी Google ची ही ऑफर अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याची असली तरी या ऑफरमधून जगातील अनेक विद्यार्थी वगळले गेले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रात भारताची वाढती भूमिका पाहता गुगलने सर्व विद्यार्थ्यांसाठी अशा ऑफर्स सुरू कराव्यात.