गंगेच्या काठावरील सर्वात प्रसिध्द स्थळ म्हणजे वाराणसी. प्राचीन काळापासून वाराणसी एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहेच पण त्याच बरोबर ते एक महत्त्वाचे व्यापारी केंद्रही होते. म्हणून वाराणसीचा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विकास घडून आला. प्राचीन काळापासून व्यापार, धार्मिक विधी, मोक्ष, राजकीय घडामोडी, शिक्षण अशा अनेक कारणांसाठी भारतीय उपखंडातून अनेक लोक वाराणसीस भेट देत असत. पर्यायाने वाराणसीत संस्कृती तेथील गंगा नदीच्या प्रवाहाप्रमाणेच गतिशील झाली आहे. या गतिशील संस्कृतीचे पडसाद तिथल्या घाटांवर आढळतात.
मोकळे आल्हाददायक घाट
वाराणसीत एकूण 88 घाट आहेत. सकाळी आणि संध्याकाळी घाटांवर सर्वाधिक गडबड असते. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत, पवित्र कार्तिक महिन्याशी संबंधित धार्मिक क्रियांमुळे घाट विशेषतः गजबजलेले असतात. त्याच बरोबर परदेशी पर्यटकही गंगेच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घाटांवर फिरताना आढळतात. आपली धार्मिक स्नानकर्मे करण्यासाठी स्नानिकही भाविक गंगेच्या काठावर येतात. एकूणच शहरातील उष्णता आणि प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी आणि तसेच घाटांच्या मोकळ्या, आल्हाददायक वातावरणात विश्रांती घेण्यासाठी स्थानिक आणि पर्यटक येथे सकाळ संध्याकाळ येतात.
वाराणसीतलं विलक्षण नौकानयन
हा गंगेच्या काठावरील सकाळ आणि संध्याकाळचा काळ आणखी एका लोकसमूहासाठी विशेष पर्वणीचा असतो तो म्हणजे येथिल स्थानिक नावाडी. सकाळ आणि संध्याकाळीच नाविक अधिक उत्साहाने प्रवाशांचा (सवारीचा) शोध घेत असतात. स्थानिक नाविक वाराणसीस भेट देणा-या पर्यटकांना, भाविकांना आणि स्थानिक लोकांना त्यांच्या नौकांमधून विविध घाटांवरून फिरवून आणतात. सायंकाळी गंगाविहार करतानाच गंगाआरतीच्या वेळेस सा-या नौका वाराणसीतील मुख्य घाटापाशी म्हणजेच दशाश्वमेध घाटापाशी येवून थांबतात. त्यामुळे भाविकांना गंगेत बसून गंगाआरतीचा लाभ घेता येतो. म्हणूनच वाराणसीत गंगेच्या काठावरील नौकानयन एक विलक्षण अनुभूती देणारे आहे.
19 व्या शतकात नौकाविहाराचे कमी झाले महत्त्व
आजच्या घडीला वाराणसीतील नौकाविहार हे एकीकडे पर्यटकांसाठी आनंददायक व विरंगुळ्याचे साधन आहे, तर दुसरीकडे काही लोकांसाठी एका घाटावरून दुस-या दूरच्या घाटावर जाण्यासाठी रोजच्या प्रवासाचेही साधन आहे. मात्र पूर्वीच्या काळी वाराणसीतील नौकाविहार व्यापार आणि दळणवळणाशी जास्त संबंधित होते. पर्यायी दळणवळणाच्या मार्गांची सुधारणा झाल्याने वाराणसी शहराचे व्यापारी केंद्र म्हणून असलेले महत्व एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून कमी होऊ लागले. नदीच्या मार्गातील वाहतुकीत घट झाली. नौकानयन शहरातील तीर्थक्षेत्राशी निगडीत असलेल्या धार्मिक उपक्रमांशी मर्यादित राहिले. पुढे नौकाव्यवसाय वाराणसी शहराचा एक महत्त्वाचा भाग बनले.
वाराणसीतला निषाद समाज
प्राचीन काळापासून ‘निषाद समाज’ नौकानयनाशी निगडीत आहेत. सभ्यता आणि संस्कृती यांचा उगम आणि विकास नद्यांच्या खोर्यांतून झाला. त्यामुळे या समुदायाने व्यापार, जलवाहतुकीच्या माध्यमातून तत्कालीन समाजासाठी विशेष योगदान दिले.
निषाद राजाने राम, लक्ष्मण, सीतेला केले गंगापार
निषाद समाजाशी संबंधित एक प्रसंग रामायणातही येतो. वनवासासाठी निघालेले राम, लक्ष्मण आणि सीता गंगेच्या काठावर येतात. येथे त्यांची भेट निषादराजा गुहाशी होते. त्याच्या मदतीने राम लक्ष्मण आणि सीता केवट नावाच्या नावाड्याच्या नौकेतून गंगानदी पार करून दंडकारण्याच्या दिशेने प्रयाण करतात. ही प्रख्यात कथा दर्शविणारी भित्तिचित्रे संपूर्ण बनारसभर पाहायला मिळतात. येथील नाविक स्वतःला निषादाचे वंशज समजतात. गंगेच्या काठावर निषाद राजा नावाच्या घाटावर निषाद राजाचे मंदिर आहे. हा घाट मूळतः प्रभू घाटाचा भाग होता, परंतु नाविक समाजाने निषादराजाचे एक मंदिर बांधले आणि त्यामुळे या घाटाचे नाव बदलण्यात आले. वर्षातून एकदा वाराणसीतील सर्व नाविक येथे उत्सवासाठी जमतात.
हेही वाचा – वाराणसीतली होळी
घाटवर आणि मल्ला
सध्या घाटांवर नौकानयनाशी संबंधित दोन प्रकारचे लोकसमूह कार्यरत आहेत, घाटवर आणि मल्ला. ‘घाटवर’ म्हणजे नौकांचे मालक आणि ‘मल्लाही’ म्हणजे चालक. बहुतेक प्रमुख घाटांवर मल्लाही हे घाटवरांच्या बोटी चालवतात व त्यांची देखभाल करतात. आणि त्यासाठी त्यांना कमाईच्या सुमारे 50 टक्के वाटा मिळतो. घाटवर व मल्लाही यांच्यात कोणताही बंधनकारक करार नसतो. काही मल्लाही गरजेनुसार एका घाटावरून दुसऱ्या घाटावर जातात. काही वेळा हे मल्लाही घाटवरांचे नातेवाईक असतात, जे आसपासच्या गावांमधून हंगामी काळात रोख कमाईसाठी येतात. कामकाजाच्या तात्पुरत्या स्वरूपामुळे, मल्ला घाटवरांच्या वर्चस्वासाठी फारसा धोका ठरत नाहीत. तरी काही मल्लाहींनी वैयक्तिक पातळीवर घाटवर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळवल्याची उदाहरणे आहेत. मात्र त्यांची एकूण स्थिती घाटवरांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी नाही.
नाविक आणि पुजारी संबंध
बनारसच्या नाविक आणि पुजाऱ्यांच्या संदर्भात, वर्चस्व आणि अधीनतेचे नाते स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही समुदायांचे जीवन आणि त्यांची दैनंदिन व्यवहारशैली पवित्र गंगा नदी आणि तिच्याभोवती असलेल्या धार्मिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे.
हेही वाचा – वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त
ब्रिटिशांनाही पडली गंगेची भुरळ
असे म्हटले जाते की नाविक समुदाय भारतीय उपखंडात ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर त्यांना भेटणाऱ्या पहिल्या समुदायांपैकी एक होते. रस्ते आणि रेल्वे विकसित होण्याच्या आधी नद्या ह्या मुख्य दळणवळणाच्या मार्गांपैकी एक होत्या. गंगा नदी ही प्रमुख व्यापारी आणि संवादाची मार्गिका होती, ज्यावरून प्रवासी आणि सैन्य बंगालच्या उपसागराकडून उत्तर दिशेकडे जाऊ शकत होते. बोटींवरूनच वस्तू, नैसर्गिक साधने आणि माणसांचे वाहतूक मुख्यत्वे केली जात असे. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी नाविक समुदायाशी कारणपरत्त्वे जोडलेला होता. त्यातील काही ब्रिटिश अधिका-यांना प्रवासादरम्यान गंगेच्या निसर्गसौंदर्याने भुरळ घातली. याचाच परिणाम म्हणून गंगेची, तिच्या काठच्या रहाणीमानाची ब्रिटिशांनी काढलेली फार सुंदर चित्रे उपलब्ध आहेत.