‘बौद्धिक संपदेला, झालर सहृदयतेची – ठसा डॉ. मृदुला बेळेंचा’

Mrudula Bele : मृदुला बेळे, नाशिकमध्ये फार्मास्युटिक्स या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून पंधराहून अधिक वर्षे कार्यरत, फार्मास्युटिकल सायन्समधली पीएचडी, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटसच्या सल्लागार म्हणून नामांकित परदेशी क्लायंटससोबत काम, या सगळ्यासोबतच साहित्यावरचं, उर्दू गजलांवरचं, गालिबवरचं प्रेम, उत्कृष्ट लिखाण, फिटनेसबाबत दक्ष असणाऱ्या, चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या, हातमाग आणि भारतीय वस्त्रसंस्कृतीच्या जाणकार!
[gspeech type=button]

इटलीतल्या तुरिनमधून वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनयझेशनमधून शिष्यवृत्तीसह एलएलएम करणं, बौद्धिक संपदा कायद्यावर मराठीतून सलग वर्षभर लोकसत्तावृत्तपत्रातून सदर चालवणं, ‘राजहंससारख्या मातब्बर प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं प्रकाशित करणं, रशियातील मॉस्कोमध्ये ब्रिक्स कॉम्पिटिशन लॉ अन्ड पॉलिसी सेंटरमध्ये गेली दोन वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करणं, पुणे विद्यापीठाच्या मराठा विद्या प्रसारक कॉलेज ऑफ फार्मसी नाशिकमध्ये फार्मास्युटिक्स या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून पंधराहून अधिक वर्षे कार्यरत, फार्मास्युटिकल सायन्समधली पीएचडी, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटसच्या सल्लागार म्हणून नामांकित परदेशी क्लायंटससोबत काम, या सगळ्यासोबतच साहित्यावरचं, उर्दू गजलांवरचं, गालिबवरचं प्रेम, उत्कृष्ट लिखाण, फिटनेसबाबत दक्ष असणाऱ्या, चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या, हातमाग आणि भारतीय वस्त्रसंस्कृतीच्या जाणकार!!!. बापरे मला लिहून दम लागलाय, तुम्हालाही वाचून दम लागला ना!? पण करणार कायहे सगळं वर्णन ज्यांना लागू होतं त्या अत्यंत बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा, कमालीच्या तीव्र बुद्धिमत्तेचं आणि तितक्यात उत्तम संवेदनशीलतेचा मिलाफ म्हणजे डॉ. मृदुला देशमुख- बेळे.

औषधनिर्माणशास्त्र प्राध्यापिका ते  इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्

नाशिकमधलं माहेर- सासर, उत्तम अकॅडमिक करिअरसह एमफार्म करून नाशिकच्याच मराठा विद्या प्रसारक फार्मसी कॉलेजात ही उत्कृष्ट गुणवत्तेची मुलगी प्राध्यापकांच्या आग्रहाने प्राध्यापिका म्हणून रूजू होते. संसार- मूल बाळ, नोकरी असं चाकोरीबद्ध आयुष्य सुरू असताना, अचानक बौद्धिक संपदा कायद्यासारख्या क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाकडे आकृष्ट होते.  मृदुलाताई सांगतात, “MVPM मध्ये शिकवत असताना, 2008 साली पीएचडीसाठीची नोंदणी केली होती. त्यावेळी समवयस्क मित्र मैत्रिणींसोबत करिअरसंदर्भात गप्पा व्हायच्या. त्यातच अशाच पीएचडी केलेल्या आणि डॉ. रेड्डी यांच्या आयपीआर (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस) मध्ये काम करणाऱ्या एका मित्राशी झालेल्या दीर्घ फोन कॉलनं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण तो बोलत होता पेटंटशी निगडित एका क्लिष्ट केसबद्दल आणि त्याच्या बोलण्यातल्या पेटंट, आयपीआर आणि इतर तांत्रिक संज्ञा माझ्या डोक्यावरून जात होत्या. औषधनिर्माणशास्त्राची विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका असून सुद्धा मी इतकी इन्गोरंट कशी राहू शकते? या विषयावर त्या मित्राने माझी चांगलीच शाळा घेतली 

पीएचडी आणि इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस डिप्लोमा एकत्रच

 “फोन कॉल संपला, मित्राचं बोलणं आधी चांगलंच झोंबलं होतं, पण तो खरंच बोलतोय, हे माझ्या लक्षात आलं. मी माझ्या कम्फर्ट झोनमध्येच राहत होते, हे लक्षात आलं आणि आता आयपीआर हा विषय शिकायचाच या ध्येयाने मी झपाटली गेले. खरं तर माझी पीएचडी सुरू होती, पण त्याच वर्षी मी हैदराबादच्या नालसारमधून इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ वरचा डिस्टन्स कोर्स केला. सुरूवातीला विषय अवघड वाटत होता, पण जसजसं वाचन वाढत होतं तसतसं कायदेशीर भाषेचे किचकट पापुद्रे दूर करून गाभ्याशी जाऊ लागले. तत्त्व समजावून घ्यायला लागले तसतसा इंटरेस्ट वाढत गेला. त्या वर्षी या कोर्सच्या परीक्षेत भारतात मी दुसरी आले. दरम्यान पीएचडी पण पूर्ण झाली. 

इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉमध्ये इटलीतून एलएलएम

मग, माझ्या कॉलेजमध्ये मी हाच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉहा विषय अध्यापनासाठी मागून घेतला. मी शिकवायला लागले, मुलांनाही आवडायला लागलं. पण फक्त आयपीआरमधला डिप्लोमा पुरेसा नाही. मग पुढे एलएलबी केलं आणि हा कोर्स करत असतानाच मला कळलं की इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ मध्ये वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO), जिनिव्हा आणि इटलीमधील तुरिन युनिव्हर्सिटी यांचा एलएलएमचा एकत्रित कोर्स असतो. हे एलएलएम फार प्रतिष्ठेचं मानलं जातं. अर्थात तशीच दणकट चाळीस हजार युरो वगैरे त्याची फी असते. मात्र या कोर्ससाठी अर्ज केलेल्या जगातल्या 11 विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीच्या, हुशारीच्या जोरावर पूर्ण फेलोशिप मिळते. पुन्हा एकदा, आतल्या आवाजाने साद दिली की, हा कोर्स मी करायलाच हवा. जे स्वत: आयपीआरशिकवतात त्यांना फेलोशिप मिळते, असं समजलं. त्या ही कॅटॅगरीत मी बसत होते.

WIPO कडून शिष्यवृत्तीसाठी नकार  

वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनमधल्या एलएलएमच्या प्रवेशाची गोष्टही इंटरेस्टिंग आहे. मृदुलाताईंनी त्यासाठीचे सर्व डॉक्युमेंटस, स्टेटमेंटस ऑफ पर्पज वगैरे सगळं निगुतीने भरलं. शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळणाऱ्या अकरा जणांत समावेश होणं अवघड असलं तरी अशक्य नाहीये, हा आत्मविश्वास त्यांना होता. आणि पहिल्यांदा WIPO कडून शिष्यवृत्तीसह प्रवेशासाठी नकार आल्यानंतर सुद्धा चिवटपणाने त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने तसंच एका विद्यार्थ्याने अचानक कोर्स करू शकणार नाही असं सांगितलं आणि त्यांची इटलीतल्या तुरिनमधल्या एलएलएमची जागा निश्चित झाली. 

पेटंट का गरजेचं आहे ?

मृदुलाताई सांगतात, आधी तुरिन विद्यापीठात आणि मग जीनिव्हाला शिकणे, हा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातला खरोखरच माईलस्टोन होता. सुरूवातीला भावनिक घालमेलही झाली, पण जगातल्या चाळीस देशांतून आलेल्या चाळीस वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राध्यापकांनी दिलेल्या दृष्टिकोनांनी आयुष्याची दिशाच पालटून टाकली. तिथं शिकवायला येणारे अमेरिकन प्राध्यापक पेटंट का गरजेचं आहे ? हे पटवायचे.  कारण संशोधकांना अमुक औषध बनवताना किती मेहनत घ्यावी लागते, केवढा त्रास होतो, शिवाय जगातील अनेकांना ते औषध उपयोगी पडतं तर त्याचा मोबदला म्हणून घेतलं पेटंट, तर त्यात चूक ते काय? त्या वेळी ते पटूनही जायचं.

व्यवहारांकडे पाहायचा मानवीय दृष्टिकोन

 “तिथंच आम्हांला अर्जेंटिनाचे प्रोफेसर कार्लोस कोरिआ शिकवायला यायचे. औषधांची पेटंटस् या क्षेत्रातलं, प्रो. कोरिआ हे मोठ्ठं नाव. पेटंटचा मानवी हक्काचा जो अँगल कार्लोस सरांनी आम्हांला शिकवला तो मी विसरू शकत नाही. औषधांवर खूप पेटंटस दिली तर काय होतं, त्यामुळं गरीब लोक कसे त्या औषधांपासून वंचित राहतात, प्रसंगी जीव गमावतात. प्रत्येक देशाचा ‘पेटंट’ या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा असू शकतो. कारण वेळप्रसंगी असंही होऊ शकतं, की औषधाची किंमत सात हजार डॉलर्स आहे आणि आफ्रिकेतील एका व्यक्तीला त्याचा जीव वाचवण्यासाठी ते औषध हवंय, ज्याची वार्षिक कमाईच कशीबशी चार हजार डॉलर्स आहे. मग त्यानं काय करायचं? ते पेटंट असलेलं औषध परवडत नाही म्हणून मरायचं का!? कार्लोस सरांनी ही आयुष्यभराची शिकवण आणि या व्यवहारांकडे पाहायचा मानवीय दृष्टिकोन दिला.” 

औषधांबाबत भारताच्या सकारात्मक बाजूची आंतरराष्ट्रीय दखल

इतकंच नाही तर सरांना जेव्हा कळलं की मी भारतातून आलेय आणि फार्मास्युटिकल सायन्स शिकवतेय, तेव्हा ते मला सगळ्या वर्गासमोर म्हणाले, “भारताबद्दल मला नितांत आदर आहे. कारण माझा देश असलेला अर्जेंटिना असो किंवा इतर कुठला गरीब देश, तिथल्या गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा परवडणारं औषध कसं पुरवावं, हे आम्ही भारताकडून शिकतोय. आमची धोरणं आम्ही तुमच्याकडून शिकतोय, We are walking on your footprints.” त्यावेळी मला अभिमान तर वाटलाच, पण थोडी खंतही वाटली, की आपल्या भारताची ही सकारात्मक बाजू बऱ्याच लोकांना माहितीच नाहीए, म्हणून पुढे लिखाणातूनही शक्य तिथं मी हे पुढं आणायचं ठरवलं.

पेटंट आणि भारतीय औषध कंपन्यांबाबतच महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन

यातूनच सुरू झाला मृदुलाताईंचा क्लिष्ट विषयावरच्या रसाळ लिखाणाचा प्रवास. हा प्रवास सुरू करायचं प्रोत्साहन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दिलं हे त्या आवर्जून सांगतात. 2015 साली बौद्धिक संपदा कायद्यावर कथा अकलेच्या कायद्याची हे लोकसत्तातलं त्यांचं सदर इतकं गाजलं की राजहंस प्रकाशनाने त्यावरचं पुस्तकच काढलं. यानंतरचं डॉ. मृदुला देशमुख- बेळे यांचं अशीही एक झुंज हे पुस्तक तर फारच मोलाचं आहे- कारण ते बोलतं नफेखोरीच्या आणि पैसा कमावण्याच्या जगात, पुरेसा पैसा नाही म्हणून एकही रूग्ण औषधोपचारांविना वंचित राहू नये म्हणून मानवी मूल्यं सर्वाधिक महत्त्वाची मानणाऱ्या सिप्ला या भारतीय औषधनिर्मिती कंपनीबद्दल आणि सिप्लाचे सर्वेसर्वा डॉ. युसूफ हमीद यांच्याविषयी. तुरिनच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहिलेला फायर इन द ब्लड  हा चित्रपट त्यामागची प्रेरणा. हा चित्रपट होता- एड्सने त्रासलेल्या आणि केवळ औषधं परवडत नाहीत म्हणून तळमळून जीव सोडणाऱ्या गरीब आफ्रिकन लोकांबाबत, आणि त्या लोकांच्या मदतीला धावून गेलेल्या भारतीय ‘सिप्ला’ या कंपनीबाबत. हा चित्रपट पाहिल्याच्या क्षणापासून मृदुलाताईंनी निश्चयच केला होता, की हे उदात्त मानवतेचं भारतीय कंपनीने केलेलं काम, जगासमोर यायलाच हवं. अमेरिकन कंपन्या जी औषधं 15 हजार डॉलर्स प्रतिवर्ष या दराने प्रचंड नफा कमवून विकत होत्या, तिथं सिप्लाने केवळ 350 डॉलर्स प्रति वर्ष किंमतीत, आफ्रिकेला औषध कसं पुरवलं, याची ही इंटरेस्टिंग कहाणी खुद्द डॉ. युसूफ हमीद आणि अनेक परदेशी पत्रकार, संशोधकांशी बोलून मृदुलाताईंनी समोर आणलेली आहे. यासोबत कोविडच्या महाभयंकर साथीला सामोरे जात असताना, कोरोनाच्या कृष्णछायेत हे ही पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. 

बौद्धिक संपदा केंद्राच्या संचालक

यासोबतच सध्या मृदुलाताई करत आहेत त्यातलं आणखी एक मोलाचं काम म्हणजे- मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या – महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची अवाढव्य शैक्षणिक संस्था असलेल्या मंडळाच्या प्रज्ञा (MVP Center for Promotion research and awareness of Intellectual Property  and Innovation) या बौद्धिक संपदा केंद्राच्या संचालक म्हणूनही मृदुलाताई काम करत आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्रात असलेल्या 450 हून अधिक संस्थातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या पेटंट आणि बौद्धिक संपदा रजिस्टर करण्यासाठीच्या या केंद्राचे उद्घाटन 2024 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी MKCL चे विवेक सावंत सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, मृदुलाताईंची बौद्धिक संपदा कायद्यावरील पकड आणि प्रज्ञा सेंटरच्या माध्यमातून नव्या पिढीची बौद्धिक संपदा जतन करण्याचे त्या करत असलेले काम पाहून MKCL ने प्रज्ञासाठी काम करणाऱ्या तीन इंटर्न्सचा पुढच्या तीन वर्षांचा पगार प्रायोजित केलाय.  

एकूणच एक वर्तुळ पूर्ण होतंय- आधी मृदुलाताईंच्या अभ्यासू, जिज्ञासू वृत्तीने जगभरात उमटवलेल्या ठशांचं आणि आता प्रज्ञाकेंद्राच्या माध्यमातून तरूण उत्साही संशोधकांच्या उदयाचं.

2 Comments

  • जयंत जोशी

    मला एक पेटंट घ्यायचे असेल तर मी सुरवात कशी करू. माझ्या घेतलेल्या ट्रायल्स वरून मला खात्री आहें

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. मला एक पेटंट घ्यायचे असेल तर मी सुरवात कशी करू. माझ्या घेतलेल्या ट्रायल्स वरून मला खात्री आहें

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची
Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ