2025 हे वर्ष बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक सिनेमांसाठी आश्वासक असणार असं सध्या तरी वाटत आहे. प्रेक्षकांची बदललेली मानसिकता, भारताची स्ट्रेंथ असलेली सध्याची युवा पिढी, तितक्याच मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची आशा बाळगून असलेला फॅमिली ऑडियन्स हे सगळं विचारात घेऊन निर्मात्यांनी यावर्षी त्यांच्यासमोर असलेल्या कोणत्या कथांना सिनेमा तयार करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे याची रूपरेषा आता समोर आली आहे. 2025 मध्ये कोणता सिनेमा समीक्षकांची वाहवा मिळवेल ? आणि कोणता सिनेमा बॉक्सऑफिसवर बाजी मारेल? कॉर्पोरेटच्या भाषेप्रमाणे चार तिमाहीत आपल्यासमोर मनोरंजनाचे कोणते पर्याय उपलब्ध असतील ? जाणून घेऊयात.
देशभक्ती सिनेमांचा सिझन
जानेवारी ते मार्च हा काळ हा दरवर्षी प्रमाणे देशभक्तीपर सिनेमांचा असणार हे नक्की आहे. 17 जानेवारीला कंगना रनौतचा बराच प्रलंबित ‘एमर्जन्सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1970 च्या दशकात इंदिरा गांधी यांच्या सरकरने देशावर लादलेली ‘आणीबाणी’ची परिस्थिती आणि त्याचे जनमानसावर पडलेले पडसाद, त्या काळात भारताची झालेली औद्योगिक पिछेहाट ही मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमातून भाजपा खासदार कंगना रनौत आपल्या कथेतून, निर्मितीतून आणि दिग्दर्शनातून करणार आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमातून विविध राजकीय पात्र साकरतांना आपल्याला दिसणार आहेत. सिनेप्रेमींना आणि राजकीय वर्तुळात या सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे.
‘सिंघम अगेन’ने 2024 चा समारोप करणाऱ्या अजय देवगण हा 2025 ची सुरुवात ‘आझाद’ या सिनेमाने करणार आहे. अजय देवगण या सिनेमातून आपला पुतण्या अमान देवगण याला आणि रविना टंडनची मुलगी राशा थडानी हिला लाँच करणार आहे. अभिषेक कपूरची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं नुकतंच एक गाणं आणि ट्रेलर रिलीज करण्यात आलं आहे. 1920 च्या दशकातील या कथेत ‘आझाद’ हे एका घोड्याचं नाव असून त्याने अमान सोबत मिळून देशाच्या रक्षणासाठी दिलेलं योगदान या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
अक्षय सुपरहिट देणार का?
अक्षय कुमार 2025मध्ये आपल्या फ्लॉप सिनेमांची शृंखला मोडण्यासाठी आपली ‘खिलाडी’ वृत्ती दाखवेल असं वाटतंय. हिट, फ्लॉपची काळजी न करता एकेकाळी मिथुन जसा ओळीने सिनेमा प्रदर्शित करायचा, तशी कामाची पद्धत सध्या अक्कीने अवलंबली आहे. ‘स्काय फोर्स’ हा त्याचा यावर्षीचा पहिला सिनेमा असणार आहे. अभिषेक कपूर आणि संदीप केवलवानी याचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अक्षय कुमार सोबत निमरत कौर, सैफ अली खान आणि नवोदित वीर पहाडीया हे दिसणार आहेत. जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रभक्तीचं औचित्य साधून 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सेकंड ट्रायमिस्टर
करण जोहर आपल्या टिपिकल स्टाईल मधील युथ, रोमँटिक कम फॅमिली ड्रामा सिनेमाचा जॉनर अबाधित ठेवत ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा सिनेमा एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित करणार आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही ‘बवाल’ची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
साजिद नाडीयाडवाला आपल्या ‘हाऊसफुल’ सिरीज सिनेमातील विक्रमी 5 वा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. तरुण मनसुखानी हे यावेळी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘हाऊसफुल’च्या प्रत्येक सिनेमाप्रमाणे या सिनेमातही अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा सारखी मोठी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. 6 जून 2025 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लव रंजन (लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता) हे सध्या ‘दे दे प्यार दे’ या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा सिक्वेलचं शूटिंग करत आहेत. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा पहिला फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. लव फिल्म्स या बॅनरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अंशुल शर्मा यांच्यावर सोपवली आहे.
90 कोटीचं गाणं
‘टॉलीवूड’चे सिनेमे हे मागील काही वर्षांपासून देशभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे सर करत आहेत. 2025 मध्ये प्रेक्षक वाट बघत आहेत असा दक्षिणेकडचा पहिला सिनेमा राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा ‘गेम चेंजर’ हा आहे. लोकप्रिय दिग्दर्शक शंकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी 90 कोटी रुपये खर्च झाल्याचं नुकतंच निर्मात्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा सिनेमा एकाच वेळी तेलगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
रजनीकांत यांचा ‘कुली’ हा सिनेमादेखील देशभरातील किंवा जगभरातील रजनी सरांच्या फॅन मंडळींना आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक लोकेश कनागराज यांना आहे. सध्या शुटिंगच्या अंतिम टप्प्यात असलेला हा सिनेमा 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. आमिर खान या सिनेमामध्ये छोट्या भूमिकेत दिसणार असल्याने हिंदी प्रेक्षक हा सिनेमा आवर्जून बघतील अशी निर्मात्यांना आशा आहे.
कमल हसन यांचा अभिनय आणि मनिरत्नम यांचं दिगदर्शन हा देखील योग प्रेक्षकांना यावर्षी कित्येक वर्षांनी बघायला मिळणार आहे. ‘ठग लाईफ’ हे या सिनेमाचं नाव असणार आहे. एक, दोन नव्हे तर भारतातील सर्वच भाषांमध्ये हा सिनेमा डब केला जाणार आहे. नुकतंच या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. 5 जून 2025 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सलमानलाही हिटची प्रतिक्षा
सलमान भाई कित्येक वर्षांपासून एका हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. शाहरुख खानला दक्षिणेकडील दिग्दर्शक ‘अटली’ने दिलेल्या यशाने प्रभावित होऊन सलमानने एआर मुरगदोस या दिग्दर्शकाला हाताशी धरून ‘सिकंदर’ हा सिनेमा बनवायला घेतला आहे. या सिनेमात सलमान सोबत नॅशनल क्रश रश्मीका मंदाना असणार आहे. ‘ईद का शानदार प्रोग्राम’ ही टॅग लाईन वापरत कित्येक सुपरहिट दिलेल्या सलमानला या वर्षी ‘सिकंदर’द्वारे तेच यश परत मिळवता येईल का ? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘वॉर’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर यशराज फिल्म्सने त्याच्या सिक्वेलची तयारी सुरू केली होती. वॉर 2 हा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ब्रम्हास्त्र फेम अयान मुखर्जी हा यावेळी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळतोय. टायगर श्रॉफला यावेळी विश्रांती देण्यात आली आहे. हृतिक रोशन सोबत यावेळी आरआरआर फेम ज्युनिअर एनटीआर ला संधी देण्यात आली आहे. 14 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील प्रत्येक भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘कांतारा’ ने जगभरात मिळवलेली लोकप्रियता आणि या सिनेमाच्या सबकुछ रिषभ शेट्टीला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार लक्षात घेऊन ‘होमबाळे फिल्म्स’ या कंपनीने ‘कांतारा 2’ची जबाबदारी उचलली आहे. पहिल्या कांतारापेक्षा हा सिनेमा अधिक भव्य प्रमाणावर केला जाणार आहे असं सांगितलं जात आहे. रिषभ शेट्टी हेच या सिनेमाचे प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक असणार आहेत. पहिल्या भागाचा प्रिक्वेल म्हणून तयार करण्यात आलेला हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सनी देओल आणि आमीर खान एकत्र
‘लाहोर 1947’ या सनी देओलच्या सिनेमाची देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सनी पाजी सोबत आमिर खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी अशी स्टारकास्ट पहिल्यांदाच एकत्र आली आहे. आमिर खान हा या सिनेमाचा निर्माता आहे. सनी आणि आमिर ही जुगलबंदी प्रेक्षकांनी ‘घायल’ आणि ‘दिल’च्या वेळी 1990 मध्ये बघितली आहे. शिवाय, ‘लगान’ आणि ‘गदर’ हे दोन सिनेमे देखील 2001 मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. इतक्या वर्षांनी हे दोन्ही मोठे कलाकार जुनं कटुत्व विसरून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यामुळे प्रेक्षक आणि बॉलीवूड 2025 च्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
मराठी सिनेमासृष्टी देखील जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणाऱ्या ‘संगीत मानापमान’, ‘जिलबी’, ‘फसकलास दाभाडे’ सारख्या सिनेमांकडून प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.
2025 हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी आशावादी असणार आहे हे वरील सिनेमांच्या यादीवरून आपल्या लक्षात आलं असेलच. या सर्व सिनेमा, निर्मात्यांना त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देऊयात आणि आपण आपली ‘कुर्सी की पेटी’ बांधून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊयात.