गौतमाने इ.स.पू. सुमारे 500 साली एका प्रचंड वटवृक्षाखाली ध्यान करत असताना बुद्धत्त्व प्राप्त केले. ज्या वृक्षाखाली बसून बुध्दांना बोधीप्राप्ती झाली तो वृक्ष पुढे बोधीवॄक्ष म्हणून प्रसिध्द झाला. याच वृक्षाला काही ठिकाणी महाबोधीवॄक्ष असेही म्हटले आहे. ही जागा म्हणजेच सध्याच्या बिहारमधील बोधगया.
वटवृक्ष आणि गौतमाशी संबंधित लोककथा
ह्या स्थळाशी संबधित एक कथा सांगितली जाते. स्थानिक संस्कृतीत वटवृक्ष सुफलनाचे आणि प्रजननाचे प्रतिक मानले गेले असल्याने, सुजाता नावाच्या एका स्त्रीने ह्या वटवृक्षाला प्रजननासाठी खीर अर्पण करेन असा नवस केला होता. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी ती वटवृक्षापाशी खीर घेवून आली असता, तिला तिथं गौतम बुध्द ध्यानस्थ अवस्थेत दिसले. जशी आपली इच्छा पूर्ण झाली तशी, ह्या ध्यानस्थ संन्यासाचीही पूर्ण होवो ह्या विचाराने तिने ती खीर बुध्दांना अर्पण केली. मुळात ही लोककथा असल्याने ह्याच गोष्टीची वेगळी आवृत्तीही प्रसिध्द आहे. बुद्धांनी या वृक्षाखाली सात आठवडे (49 दिवस) आपल्या आसनावरून न हलता ध्यान केले. त्यावेळेस जंगलात येणा-या सुजाता नावाच्या वृध्द स्त्रीने त्यांस पाहिले. संन्यासाचे कठोर तप पहाता त्याने काही खाल्ले असेल की नाही अशी वात्सल्यपूर्वक चिंता तिच्या मनात उपस्थित झाली. तिने दुस-या दिवशी बुध्दांसाठी एक भांडे भरून खीर करुन आणली आणि बुध्दांना खाण्यास आग्रह करु लागली. ध्यानस्थ बुद्धांना ह्या सर्व ऐहिक घडामोडीची कल्पनाच नव्हती. शेवटी कंटाळून तिने ती खीर बुध्दांसमोर ‘भूक लागेल तेव्हा खाईल’ या विचाराने ठेवली आणि निघून गेली. दुस-या दिवशी तिला भांडे रिकामे आढळले. त्यामुळे तिने रोज खीर ठेवण्यास सुरुवात केली. असे सांगितले जाते की, ही खीर खाल्ल्यानंतरच बुध्दांना जाणवले की, अति तपश्चर्या किंवा अति भोग, कोणतेच योग्य नाही. कायम मध्यम मार्ग स्वीकारावा.
अशा प्रकारे हाच बोधीवृक्ष बुध्दांच्या काळापासून पवित्र मानला केला. परिणामी हा वृक्ष ज्ञान, बोध, आध्यात्मिक दृढता, तपश्चर्येचा मार्ग, करुणा आणि शांततेचे प्रतीक मानले गेले.
बोधीवृक्षाच्या सन्मानार्थ उत्सव
बोधगया भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी (बोधीप्राप्ती झालेले ठिकाण) एक असल्याने ते पवित्र तीर्थ मानले. सम्राट अशोकाने इ.स.पू. तिसऱ्या शतकात ह्या ठिकाणी मंदिर बांधले होते. इथल्या चैत्य कमानींमध्ये कोरलेल्या शिलालेखात “भगवतो शाक्यमुनिनो बोधो” असा उल्लेख सापडतो. याचा अर्थ “पवित्र शाक्यमुनींसाठी बोधी वृक्षाभोवती बांधलेली वास्तू” असा होतो. अशाप्रकारे सम्राट अशोकाने बोधी वृक्षाला अभिवादन केले. त्याच्या कारकीर्दीत दरवर्षी कत्तिक महिन्यात बोधीवृक्षाच्या सन्मानार्थ एक उत्सव साजरा केला जात असे.
भारतातील सर्वात जुन्या बौद्ध मंदिरांपैकी एक स्तूप
सध्या येथे असलेले मंदिर पाचव्या किंवा सहाव्या शतकातील आहे. हे संपूर्णपणे विटांनी बांधलेले असून भारतातील सर्वात जुन्या बौद्ध मंदिरांपैकी एक आहे. याचा काळ गुप्तकाळाचा उत्तरार्ध मानला जातो. सध्याच्या महाबोधी मंदिर संकुलात एक 50 मीटर उंच मुख्य मंदिर, वज्रासन, पवित्र बोधी वृक्ष आणि बुद्धांच्या प्रबोधनाशी संबंधित इतर सहा पवित्र स्थळे यांचा समावेश होतो. संकुलाभोवती अनेक प्राचीन पूजास्तूप (वोटिव स्तूप) आहेत. संकुलातील सातवे पवित्र स्थान कमळ तलाव दक्षिणेस कुंपणाबाहेर आहे.
सध्याचा वटवृक्ष मूळ बोधीवृक्षाचा थेट वंशज
या बोधीवृक्षाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. सम्राट अशोकाच्या राणीला म्हणजेच तिस्सराखेला बोधीवृक्षाबद्दल ईर्ष्या वाटत होती. याचे कारण ज्ञात नाही. ती राणी झाल्यानंतरच्या तिसऱ्या वर्षी म्हणजेच अशोकाच्या राज्याच्या एकोणविसाव्या वर्षी तिने काट्यांच्या साहाय्याने वृक्षाला नष्ट करण्याचा शाप दिला होता. तथापि बोधीवृक्ष पुन्हा वाढून आला. इतिहासात अनेक वेळा विविध कारणांनी वृक्ष नष्ट झाला, तेव्हा तेव्हा त्याच ठिकाणी त्याच वृक्षाची नवीन फांदी लावण्यात आली. ज्या मूळ बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ झाले होते, तो आता अस्तित्वात नाही. पण सध्या बोधगया येथे महाबोधी मंदिराजवळ असलेला महाबोधीवृक्ष त्या मूळ बोधीवृक्षाचा थेट वंशज मानला जातो. सध्या असलेल्या वृक्षाचे इ.स.पू. अंदाजे 250 पुनर्रोपण केले होते असा उल्लेख सापडतो.
वन संशोधन संस्थेचं बोधीवृक्षाच्या देखभालीत साहाय्य
सध्या मात्र बोधीवृक्ष फार जीर्ण झालेला आहे. त्याचे पश्चिमेकडे तीन फांद्यांसह असलेले एक मोठे खोड अजूनही हिरवेगार आहे. पण इतर फांद्या मात्र वठलेल्या आहेत. शाबूत असलेली हिरवी फांदी कदाचित एखाद्या नवीन झाडाची असू शकते, कारण तिथे इतर विविध झाडांच्या खोडांचा एकत्रित समूह दिसतो. डॉ. बुकानन (हॅमिल्टन) यांनी 1811 मध्ये जेव्हा हा वृक्ष पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो अतिशय सशक्त आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसावा अशी नोंद केलेली आहे. त्यानंतर हळूहळू हा वृक्ष जीर्ण होत गेला आणि 1876 मध्ये आलेल्या एका वादळात त्याचे उरलेसुरले अवशेषही नष्ट झाले होते. त्या वेळी कनिंगहॅम यांनी मूळ वृक्षाची एक तरुण शाखा तत्पूर्वीच त्याजागी उगम पावली आहे अशी नोंद केलेली आढळते. 2007 पासून, भारतातील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (वन संशोधन संस्था) महाबोधी वृक्षाच्या देखभालीत साहाय्य करत आहे.
बुद्धांच्या अनुपस्थितीत पूजेकरता ‘आनंद बोधी’
प्राचीन बौद्ध ग्रंथांतील उल्लेखानुसार जेव्हा बुद्ध प्रवासात असायचे तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीतही लोकांना अर्पण (पूजा) करता यावी म्हणून, बुद्धांनी बोधीवृक्षाचे एक रोप श्रावस्तीजवळील जेतवन विहाराच्या प्रवेशद्वारासमोर लावण्याची परवानगी दिली. त्यासाठी मोग्गल्लान नावाच्या भिक्षुंनी बोधीवृक्षाचे एक फळ झाडावरून खाली पडण्यापूर्वीच गोळा केले. अनाथपिंडिक नावाच्या भिक्षुंनी एका सोन्याच्या कलशात हे फळ विधीपूर्वक लावले. लगेचच त्यातून एक 50 हात उंच फांदी उगम पावली. या झाडाची प्रतिष्ठा करण्यासाठी बुद्धांनी एक रात्र त्या वृक्षाखाली ध्यान केले. हे झाड आनंद नावाच्या भिक्षुंच्या मार्गदर्शनाखाली लावले गेले असल्यामुळे ते “आनंद बोधी” म्हणून ओळखले जाऊ लागले.
परिणामी या बोधीवृक्षाचे जगभरात स्थलांतर झाले.
हेही वाचा – कोणार्क – भारताचे वैभव
श्रीलंकेतील जय श्री महा बोधी
सम्राट अशोकाची कन्या संगमित्ता थेरी यांनी बोधीवृक्षाची एक फांदी सिंहलद्वीपात म्हणजेच आजच्या श्रीलंकेत नेवून लावली. आजही अनुराधापूरा नावाच्या प्राचीन राजधानीत तो वृक्ष जय श्री महा बोधी या नावाने वाढत आहे. महावंस या सिंहली भाषेतील प्राचीन ग्रंथानुसार, जय श्री महा बोधी वृक्ष इ.स.पू. 288 मध्ये लावण्यात आला होता.
अशा प्रकारे महाबोधीवृक्षाचे स्थलांतर अनेक जगभरातील अनेक प्राचीन बौध्द स्तूपात, मठात, नगरीत, आधुनिक संशोधन संस्था, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी झाले आहे. बोधीवृक्षाची पाने भाविकांकडून आठवणीच्या स्वरूपात (स्मृतिचिन्ह म्हणून) नेली जातात.
ज्ञान, बोध, आध्यात्मिक दृढता, तपश्चर्येचा मार्ग, करुणा आणि शांततेचे प्रतीक असलेला बोधीवृक्ष प्रतिमाशास्त्रानुसार ठळक हृदयाकृती पानांमुळे सहज ओळखता येतो. विविध प्राचीन बौध्द स्तूपांमध्ये बोधीवृक्षाचे चित्रण आहे. सध्या बोधीवृक्ष बिहार राज्याच्या चिन्ह आहे. बौद्ध धर्माच्या 2500 वर्षांच्या स्मरणार्थ आणि गौतम बुध्दांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, भारताच्या टपाल विभागाने 24 मे 1956 रोजी बोधीवृक्षाचे चित्र असलेली दोन टपाल तिकिटे प्रकाशित केली होती. त्यापैकी एक तिकिट 2 आण्यांचे आणि दुसरे 14 आण्यांचे होते.