महिला दिनी नागपूर जिल्ह्यातील घोराड ग्रामपंचायतीने गावात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन वर्ग आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. कार्यक्रमाला त्या गावातील बहुतांश महिला मोठ्या उत्साहाने नटून-थटून आल्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होताना काही महिला लवकर थकवा आल्याने खुर्चीवर जाऊन बसायच्या. तरीही या मुक्त वातावरणात रमताना आणि आपले कलागुण सादर करताना त्या खूप आनंदी होत्या. प्रत्येक कार्यक्रमात आत्मीयतेने सहभागी झाल्या होत्या. आरोग्य तपासणी करताना प्रत्येकीचे रक्त नमुने घेतले गेले. आरोग्य तपासणी पार पडली. कार्यक्रम संपला . दोन दिवसांनी त्यांच्या रक्त तपासणीचे रिपोर्ट आलेत. त्यात अर्ध्याहून अधिक महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण फारच कमी आढळून आलं. कित्येकींच्या रक्तातील थायरॉईडचे तर कुणाचे कोलेस्ट्रॉल वाढलेलं. अशा आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या गोष्टी तपासणीतून पुढे आल्या. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कितीतरी महिला आपली दुखणी अंगावर काढतात हे सत्य आहे. जोपर्यंत आपलं दुखणं मोठं होत नाही तोपर्यंत योग्य उपचार करून घेण्यासाठी त्या पुढे धजावत नाहीत. आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणे या बाबी ग्रामीण महिलांसाठी नवीन नाहीत…
युनोचे ध्येय गाठण्यासाठी
युनोने शाश्वत विकासाची जी 17 ध्येय ठरवली आहेत त्यात आरोग्यदायी गाव हे एक ध्येय आहे. हे ध्येय 2030 पर्यंत साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी गावातील सर्व घटकांचा पुढाकार गरजेचा आहे. आरोग्य म्हटले की त्यात शारीरिक, मानसिक आरोग्य आले. घरादाराच्या स्वच्छतेपासून, शुद्ध पिण्याचे पाणी, परिसरातील प्रसन्न वातावरण, रोजगार, एकमेकांशी सलोख्याचे संबंध, अंधश्रद्धा, व्यसने, जुन्या वाईट परंपरांना तीलांजली, कुपोषण मुक्ती या बाबींची त्यात महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी गावाची एकजूट आवश्यक आहे.
अंधश्रद्धा अजूनही कायम
विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना देखील अजूनही काही गावकरी आणि विशेषतः जमाती जुन्या रूढी, अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात येणाऱ्या कोलाम गुढ्यातील एक घटना आठवते. तिशीतील नऊ महिन्याची गर्भार स्त्री. कुडाच्या झोपडीवजा घरातच तिचे कळा देणे सुरू होतं. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण फक्त पाच होतं. आरोग्य केंद्राचे डॉक्टर, बालविकास प्रकल्प अधिकारी, आशा वर्कर तिला दवाखान्यात भरती करण्याबाबत आग्रहीहोते. मात्र गावातील आणि कुटुंबातील लोक तिला गावाची वेस ओलांडू द्यायची नाही यावर ठाम होते. बाळंतपण घरीच होईल यासाठी संपूर्ण गूढा एकवटला. शेवटी अधिकार आणि बळाचा वापर करून तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. तिथे तिचं सुरक्षित बाळंतपण झालं.
ग्रामीण भागात अजूनही अशा अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत यासाठी गावात ग्रामपंचायत वा अन्य सेवाभावी मंडळाच्या वतीने वारंवार अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन वर्गाचं आयोजन करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा : आरोग्य खर्चात सरकारी अर्थसाहाय्य…
आपण काय करू शकतो
गावातील प्रत्येक महिला ही कुठल्या न् कुठल्या बचत गटाची सदस्य असतात. बचत गट हे महिलांच्या संघटीत शक्तीचं एक रूप असते. बचत गटाच्या सभेवेळी, महिलांच्या आरोग्य विषयक चर्चा करता येईल. वेगवेगळे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधता येतील.
ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला सभा घेतली जाते. या सभेत आशा वर्कर, ए एन एम यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून शासनाच्या योजना या महिलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही केली पाहिजे. महिलांकडून आरोग्यविषयक आलेल्या प्रश्नांवर ग्रामसभेमध्ये चर्चा करुन त्यानुसार कृतीयोजना तयार केली पाहिजे. या कृतीयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य दिले पाहिजे.
बऱ्याच गावात असं दिसून येतं की, 15 व्या वित्त आयोगाच्या 25 टक्के निधीतून आरोग्यविषक मार्गदर्शन शिबिरा्ंचं आयोजन केलं गेलं. मात्र या शिबिरांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आणि उपस्थिती नव्हती. ग्रामपंचायचीचा एक उपक्रम दिलेला आहे तो केवळ उरकून टाकावा अशा भावनेने अशी शिबिर घेतली जातात. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जात नाही. या शिबिरांमध्ये अनेक वेळा डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात. ती औषधे गरीब महिला खरेदी करू शकत नाही. यासाठी काही ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी तसेच सामान्य फंड निधीतून खरेदीसाठी तरतूद केली आहे. मात्र, लाभार्थींची संख्या कमी आहे. आजारी पडल्यावर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने एक कमिटी स्थापन करुन त्या कमिटीद्वारे पुढाकार घेतल्यास समस्या सुटण्यास मदत होते.
मुळात आजार होऊ नये यासाठी ग्राम स्वच्छतेवर भर देणे. योगासनांचं प्रशिक्षण देणं, गावात व्यायामशाळा सुरू करणं असे साधेसोपे उपाययोजना सुरू करता येतील.
हे ही वाचा : भारताने का सुरू केली स्थूलतेविरोधात जनजागृती मोहिम
शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी गरजेची
शासनातर्फे आरोग्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. ‘आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PMJAY) या दोन प्रमुख आरोग्य योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सुद्धा उपचार दिले जातात. शिवाय धर्मादाय रुग्णालयामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना उपचार दिले जातात.
गर्भवती महिलांसाठी सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती स्त्रीचं आणि तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचं उत्तम पालन पोषण व्हावं, गर्भवती स्त्रीची बाळंतपण सुरक्षितरित्या व्हावं यासाठी मातृत्व वंदना योजना, जननी सुरक्षा योजना राबवल्या जातात. यामध्ये महिलांना पोषण आहार, वैद्यकीय तपासणी, मोफत बाळंतपण औषधे असं सगळं पुरवलं जातं. गर्भवती महिलां संदर्भात योजना या सर्व घटकातील महिलांसाठी असून सरकारी रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येतो.
यासाठी आवश्यक असलेली माहिती ही राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या संकेतस्थळांवर उपलब्ध असते. मात्र या योजनेची अंमबजावणी करुन खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यंत्रणा कमी पडते. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी महिला आरोग्य जपण्यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष असावं. ज्याठिकाणी त्या ग्रामपंचायत किंवा तालुका हद्दीतील सर्व महिलांच्या आरोग्याविषयीची माहिती उपलब्ध असेल. व त्यांना उपचाराची गरज असेल तर या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना उत्तमोत्तम उपचार पुरवता येतील.