स्मशानभूमीपासून कामाची सुरूवात करणाऱ्या ‘खसाळा’च्या सरपंच जयश्री इंगोले

Grampanchayat: गावात काम करायचं नुसतं ठरवलं म्हणजे होत नाही तर त्याकरता गावकऱ्यांचा सहभागही लागतो. खसाळ्याच्या सरपंचांनी दारोदारी अक्षता वाटप करत ग्रामसभेचं आमंत्रण दिलं. प्रत्येक ग्रामसभेत चिठ्ठी टाकून तीन जणांना ‘ग्रामसभा उपस्थिती प्रोत्साहन पुरस्कार’ सुरू केला. पाणी मुरवणे, दरडोई 5 झाडे, अभ्यासिका असे अनेक उपक्रम गावात सुरू आहेत. 
[gspeech type=button]

नागपूर शहरालगत खसाळा ग्रामपंचायत आहे. कोराडी विद्युत प्रकल्पामुळे या गावाचे पुनर्वसन झाले. गाव पुनर्वसीत असल्यामुळे गावात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा बऱ्यापैकी होत्या. आता विकास म्हणजे आणखी काय करायचे? असा प्रश्न 2023 मध्ये सरपंच पदावर निवडून आलेल्या जयश्री धनंजय इंगोले यांना पडला. त्यांनी आपल्या परिसरातील इतर आदर्श गावांना भेटी दिल्या. अभ्यास केला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत रोजगार संघाच्या संपर्कात त्या आल्या. मला माझ्या गावात काही आगळे वेगळे काम करायचे आहे असा निर्धार त्यांनी केला. रोजगार संघाच्या ‘अंत तिथून आरंभ’ या थीमची त्यांना भुरळ पडली आणि सुरू झाला स्मशानभूमीपासून ग्रामीण विकासाचा हरित प्रवास.

घरोघरी ‘अक्षता वाटप’ करून लोकसहभाग

गावातील स्मशानभूमीचा विस्तीर्ण परिसर भकास होता. त्या परिसरात असंख्य स्मृतीवृक्ष लावून त्याचे स्मृतीउद्यान करण्याचा संकल्प त्यांनी केला. ग्रामसभेच्या माध्यमातून आपल्या भावना लोकांपुढे व्यक्त कराव्यात आणि त्यांच्या सहभागातून गाव आदर्श, सुंदर करावे असं त्यांनी ठरवलं. मात्र ग्रामसभेला लोकच येत नाही असा अनुभव आल्याने त्या निराश झाल्या. लोक सहभाग मिळाला नाही तर विकास कामे कशी करायची या प्रश्नावर विचार करण्यात त्यांचा बराच वेळ खर्ची पडला. घरोघरी जाऊन लोकांना बोलवावे. ग्रामसभेचे महत्त्व समजून सांगावे असा विचार मनात येत त्यांनी ग्रामसभेला लोकांना आमंत्रित करण्यासाठी घरोघरी ‘अक्षता वाटप’ हा उपक्रम राबविला. ग्रामसभेचे आमंत्रण स्वतः सरपंच आपणास अक्षता देऊन देत आहेत याचा वेगळाच प्रभाव गावकऱ्यांवर पडला. सर्वांनी ग्रामसभेला हजेरी लावली. त्यातही त्यांनी ग्रामसभेला जे उपस्थित होते त्यांच्या नावापैंकी तीन चिठ्ठ्या काढून त्यांना ‘ग्रामसभा उपस्थिती प्रोत्साहन पुरस्कार’ देण्याची घोषणा केली. पहिल्याच सभेत ग्रामगीता, ग्रामगुज, सरपंच हितगुज ही पुस्तके त्यांनी गावकऱ्यांना भेट दिली. ग्रामसभेला ग्राम स्तरावरील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवून त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्याची चुणूक दाखवली. आणि जयश्री यांना गावकऱ्यांचा सहभाग मिळू लागला.

प्रत्येक कार्यक्रमात प्रेरणादायी पुस्तकांचं वाटप

गाव सहभागातून गावात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, वळण रस्त्यावर सुशोभित ओटे, लोकसहभागातून ग्रामस्वच्छता, गावात शासकीय इमारतींना सुंदर रंगरंगोटी, ग्रामगीतेतील प्रभावी विचार भिंतीवर अंकित करून त्यांना बोलकं करणे, जलसंवर्धनाचे निरनिराळे प्रयोग, संक्रांतीला महिला मेळाव्याचे आयोजन करून वाणात मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन, 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत ग्राम जयंती प्रबोधन पर्व राबवून विविध विकास कामांना चालना देणे असे कल्पक उपक्रम त्यांनी गावात राबविले.

पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे

लोकांची साथ मिळत गेली. गावात पडणारे पावसाचे पाणी एकही थेंब गावाबाहेर जाऊ नये म्हणून ठिक ठिकाणी जलतारा प्रकल्प, वैयक्तिक शोषखड्डे आणि स्मृती उद्यानामध्ये लोकसहभागाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता पाझरतलाव तयार करण्यात आला. वॉटर एटीएमचे हजारो लिटर वेस्टेज पाणी नालीत वाहत जात होते. त्या पाण्याला शोष खड्ड्यांमध्ये घेऊन ते बालोद्यानाकडे वळते केले. जेणेकरून पाण्याचा पुनर्वापर करता येतो हे गावकऱ्यांना कळून चुकले. गावात प्लास्टिक बंदी व्हावी म्हणून गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली.

मोक्ष काष्ट आणि दरडोई पाच झाडे

आपले गाव स्वच्छ, सुंदर, हरित गाव व्हावे म्हणून गावात प्रतिव्यक्ती पाच झाडे लावावीत असा संकल्प त्यांनी केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाडे लावली मात्र त्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक कुटुंबावर सोपविली. गावातील स्मशानभूमीमध्ये प्रेत जळायला भरपूर लाकडे लागतात. त्याचा आपसूक ताण निसर्गावर पडतो. यासाठी त्यांनी ‘मोक्ष काष्ट’चा प्रयोग स्मशानभूमीत करण्याचे ठरविले. शेतातील तुराट्या पराठ्या शेतकरी पेटवून टाकतात. त्यापासून ‘मोक्ष काष्ट’ कसे तयार करता येईल, याचा शोध त्यांनी घेतला. या क्षेत्रात काम करणाऱ्या विजय लिमये नामक व्यक्तींशी त्यांनी संपर्क करून त्यांनी त्यांच्याच मदतीने लोखंडी कठडे स्मशानभूमीसाठी मागवून घेतले. यापुढं प्रेतासाठी लागणाऱ्या इंधनाचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत करेल करावा असा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने गावात ‘मोक्ष निधी’ जमा करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

स्मशानभूमीत अभ्यासिका

या गावातील स्मशानभूमीला स्मृती उद्यान म्हणून संबोधले जाते. या स्मृति उद्यानातील निसर्ग रम्यता आणि शांतता बघून इथे विद्यार्थिनी अभ्यास करायला बसतात हे एक परिवर्तनच म्हणावे लागेल. खसाळा हे गाव आजूबाजूंच्या असंख्य गावांसाठी आदर्श मॉडेल ठरावे असे गाव निर्माण करण्याचा प्रयत्न जयश्री इंगोले करत आहेत. गावातील तरुणांसाठी अभ्यासिका, वाचनालय निर्मिती तसेच सौर ऊर्जा ग्राम करणे यासाठी त्या पुढाकार घेत आहेत. त्यासाठी सतत शासकीय योजनांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करतात. महाराष्ट्रातील इतर गावांनी राबविलेले काही सुंदर उपक्रम आपल्या गावात राबविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.

गावात जलसंधारणाचे केलेले प्रयोग आणि त्यामुळे वाढलेली गावातील पाणी पातळी याची दखल घेत दैनिक लोकमततर्फे आयोजित लोकमत सरपंच पुरस्काराने नुकतेच जयश्री यांना गौरविण्यात आले.

1 Comment

  • उध्दव साबळे

    धन्यवाद ,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून
कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा
हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांनी साप किंवा नागांची प्रतिमा काहीशी नकारात्मक निर्माण केली. खजिन्याचा रखवालदार बदला घेणारा, इच्छादारी अशा वेगवेगळ्या रुपात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ