शीर्षक वाचून कदाचित दचकायला होईल. पण भारत आणि जगभरात सर्पपूजेचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यात येतो. ओफिओलाट्रीमध्ये सर्प, निसर्ग, संस्कृती, कलाकृती, मानव यांचा परस्पर संबंध यासर्वांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो. अनेक प्राचीन साहित्यात सर्पावरील लिखाण आढळते. भारतात ठिकठिकाणी स्थानिक श्रद्धांनुसार सर्पपूजा करण्यात येते. वेद आणि पुराणांमध्ये सर्प हे पाणी, प्रजनन क्षमता आणि संरक्षण यांचे प्रतिक म्हणून सांगण्यात आले आहेत. त्यामुळंच त्यांना दैवत्वही प्रदान करण्यात आलं आहे.
संरक्षण, जलस्रोत आणि प्रजननाशी संबंध
दैवत्व दिलं असलं तरी लोकांना सापांच्या विषारी शक्तीची भीतीही वाटते. सर्प निसर्गातील काही गोष्टींचे नियंत्रण करतो, संरक्षण करतो म्हणून त्याच्याबद्दल लोकांमध्ये आदरही पाहायला मिळतो. वैदिक काळात देव आणि मनुष्य यांच्यातील मध्यस्थ म्हणून सर्पांचे स्थान होते. पाऊस व पाण्याशी त्यांचा संबंध जोडल्यामुळं नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी सर्पांची प्रार्थना केली जात असे. कृषीप्रधान समाजात भूमीचे रक्षक असणाऱ्या सर्पांना शांत करण्यासाठी अथर्ववेदात विशेष स्तोत्रे रचण्यात आली. पुराणकथा रचताना सर्पांना ‘नाग’ म्हणून चित्रित करण्यात आले. अफाट सामर्थ्य आणि ज्ञान असणारे अर्धमानवी व अर्धप्राणी या स्वरुपातील दैवी शक्ती म्हणून नागांचं वर्णन करण्यात आलं. भूगर्भ म्हणजेच जमिनीच्या खाली नागांचं साम्राज्य असल्यानं जलस्रोत आणि प्रजननाशी त्यांचा संबंध जोडण्यात आला. स्कंद पुराणात नागांना सन्मानित करण्यासाठीचे विधी तपशीलवार देण्यात आले आहेत.
प्राचीन भारतीय मूर्तीकलेतील सर्प
सिंधू संस्कृतीच्या काळापासून लहान ते भव्य आकारात सर्पांची शिल्प कोरण्यात आली. विविध कालखंडात सामान्य सर्प ते सर्पराजा यांची अतिशय कलात्मक शिल्प भारताच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. या शिल्पांमधूनही सर्पांचे निसर्गातील शक्तिशाली शक्ती, संरक्षक, विश्वासू ही रुप दाखवण्यात आली आहेत. नागराज प्रतिमाशास्त्रात बहुतांशपणे देव किंवा संतांना बहुमुखी नागांनी वादळ, पावसापासून संरक्षित केलेले दाखवण्यात आल्याचे दिसते. शेषनागावर पहुडलेले विष्णू, गळ्यात सर्प धारण केलेले भगवान शंकर, पोटावर सर्पपट्टा बांधलेले श्रीगणेश या हिंदू देवता त्यांचे सर्पाशी असणारं सख्य दाखवतात. संरक्षण, ज्ञान व परिवर्तन या गुणांचा समुच्चय सर्पामध्ये असल्यानं त्यांचा आदर देवांकडून केला जातो.

‘सर्प्पाकावू’ पर्यावरण संरक्षक
महाराष्ट्रामध्ये अनेक देवराया आढळतात. देवराई म्हणजे देवाच्या नावाने किंवा देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. या जंगलातील झाडं तोडली की भीषण आपत्ती येते, प्रकोप येतो असा पूर्वापार समज चालून आला आहे. वास्तविक हे पर्यावरणाचं जतन, संरक्षण करण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी घालून दिलेलं बंधन आहे. देवाच्या भयामुळं किंवा श्रद्धेमुळं या देवरायांचं आपोआप संरक्षण होत गेलं. परिणामी पर्यावरणाचा समतोल राखला गेला. असाच प्रकार केरळमध्ये पाहायला मिळतो. केरळमध्ये ‘सर्पकावू’ म्हणजे सर्पांकरता राखून ठेवलेलं जंगल. यातील वनस्पती, वृक्षांना आणि प्राण्यांना त्रास दिल्यास देवाचा प्रकोप होतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळं सर्पकावूचे आपोआप संरक्षण केले जाते. या सर्पकावूमुळे अनेक औषधी वनस्पतींचं जतन होत आहे. स्थानिक जैवविविधता टिकवण्यात या सर्पकावूचं महत्त्वाचं योगदान आहे.

महत्त्वाची नाग तीर्थक्षेत्रे
कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कुके सुब्रह्मण्या’ हे सुमारे पाच हजार वर्षांपासूनचे नाग देवस्थान आहे. भगवान विष्णूचे वाहन गरुड शिकारीच्या शोधात असताना दैवी सर्प वासुकी आणि इतर सर्पांनी कुके सुब्रह्मण्याला आश्रय घेतल्याची कथा सांगितली जाते. सुब्रह्मण्याची इथं नाग स्वरुपात पूजा केली जाते. आश्लेषा बळी आणि सर्प दोष परिहार या दोन विशेष पूजांकरता देशभरातील भाविक इथं येतात. काळसर्प संरक्षण करता आश्लेषा बळी करण्यात येतो. तर शेतात किंवा कुठेही चुकून सर्प हत्या झाली तर त्याच्या दोषनिवारण्याकरता सर्प दोष परिहार करण्यात येतो. कर्नाटकातच चिकबळ्ळापुरा जिल्ह्यातील गौरीबिडनूरमध्ये विदुरावस्था नावाचे देऊळ आहे. महाभारत युद्धानंतर विदुराला त्याच्या तपश्चर्येनंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी या जागी दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. हे देऊळ चोला साम्राज्यात साधारण अकराव्या शतकात बांधण्यात आले. या देवळाच्या आवारात नागाची वेगवेगळ्या आकारातील असंख्य दगडी शिल्प आहेत. अतिशय सुंदर कलाकुसर आणि सौंदर्य असणारी ही शिल्प आहेत. या देवळातही काळसर्पदोष पूजा, नागदोष निवारण पूजा करण्यात येतात. केरळमध्ये मन्नारसला मंदिरही नाग तीर्थक्षेत्र आहे. इथं आयल्यम उत्सवात नागदेवतेची विधिवत पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी विशेष नृत्य केले जाते. आसाम व बंगालमध्ये नागदेवतेच्या सन्मानार्थ ‘मनसा पूजा’ करण्यात येते.

हिंदू पौराणिक कथांमधील सर्प देवता
शेषनागानं आपल्या शिरावर पृथ्वीचा डोलारा स्थिरपणे सांभाळला आहे. वासुकी यानं समुद्रमंथनात स्वतःला दोरी म्हणून वापरू दिलं होतं. तक्षक हा न्यायाचे प्रतिनिधीत्व करतो. संरक्षण विधींमध्ये तक्षकाला आवाहन केले जाते. मनसा ही सर्पदंशापासून संरक्षण करणारी व प्रजनन क्षमतेची देवी आहे. कालिया हा नैसर्गिक धोक्यांना वश करणे व वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक आहे. आदिशेष हा त्याच्या फण्यावर ग्रहांना आधार देतो. उलुपी ही अर्जुनाची पत्नी निष्ठा व संगोपनाचे उदाहरण आहे. पद्म हा वैश्विक सुव्यवस्था राखतो. कार्कोटल हा नल-दमयंती कथेत आहे. परिवर्तन व पुनर्जन्माशी याचा संबंध आहे. शंखपाल हा दयाळू नाग रक्षक आहे. आस्तिक हा जनमेजयाचा सर्पबळी थांबवणारा सलोखा व सुसंवादाचे प्रतिक आहे. धृतराष्ट्र हा शक्ती व संरक्षणाचे प्रतिक आहे.

भारताबाहेरील सर्पपूजा
जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये सर्पाचे आदरयुक्त स्थान आहे. मेसोपोटेमियामध्ये सर्पांना अमरत्वाचं प्रतीक मानलं जायचं. सापाच्या कात टाकण्याच्या अवस्थेला त्यांनी पुनर्जन्माशी जोडलं होतं. इजिप्तमधील पौराणिक कथांमध्ये एपेप नावाज सर्प हा अराजकतेचं प्रतिनिधीत्व करतो तर कोब्रा देवी वाडजेट ही संरक्षण व राजेशाहीचं प्रतिक होती. ग्रीक देव एस्क्लेपियसच्या काठीला सर्पाने वेढलेलं दाखवण्यात येतं. ही सर्पांनी वेढलेली काठी ही औषधं व जीवनाच्या चक्रीय स्वरुपाचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात श्रावण महिन्यात साजरी करण्यात येणारी नागपंचमी हा सणही सर्प आणि निसर्गाचा शेतकऱ्याच्या आयुष्यातील संबंधांना गौरव करण्याचा दिवस आहे.
संदर्भ – कुशा देव सिंग यांचा ओफिओलाट्रीवरील अभ्यास