तुम्ही कधी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलात आणि त्यांनी “ओव्हेरियन सिस्ट” असल्याचे सांगितले तर अनेक महिलांना याविषयी भीती वाटते, तर काहींना अनेक प्रश्न पडतात – हे सिस्ट म्हणजे नेमकं काय? ते धोकादायक आहे का? यावर उपचार काय आहेत? चला, या सगळ्या शंका दूर करूया आणि ओव्हेरियन सिस्टविषयी सविस्तर माहिती घेऊया.
ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय?
ओव्हेरियन सिस्ट म्हणजे महिलांच्या अंडाशयामध्ये (ovary) द्रवाने भरलेली छोटी गाठ किंवा फुगवटा असतो. खरंतर दर महिन्यात जेव्हा अंडाशयामध्ये स्त्रीबीज तयार होते त्या वेळेला एका फुगवट्याच्या मार्गे ते बाहेर सोडले जाते. त्यांना फंक्शनल ओव्हेरियन सिस्ट असे म्हणतात. हे सिस्ट सहसा छोटे असतात व हानिकारक नसतात आणि बऱ्याचदा आपोआप कमी होतात. मात्र काही वेळा इतर काही कारणाने जे सिस्ट तयार होतात त्यांचा आकार मोठा होऊ शकतो व त्यांच्यामुळे काही त्रासही होऊ शकतो. सिस्टाडीनोमा, डर्माटॉइड इंडोमेट्रीऑसीस आणि ओव्हेरियन कॅन्सर सिस्ट अश्या विविध प्रकारचे हे सिस्ट असू शकतात.
ओव्हेरियन सिस्ट का निर्माण होतात?
बहुतांश वेळा, या सिस्ट नैसर्गिकरीत्या तयार होतात आणि काही विशिष्ट कारणांमुळे होतात –
1. हार्मोनल बदल – मासिक पाळीतील हार्मोनल असंतुलनामुळे सिस्ट होऊ शकते.
2. गर्भधारणेसाठी स्त्रीबिजाची निर्मिती – ओव्हरीमध्ये बीजांड तयार होताना काही वेळा सिस्ट निर्माण होतात.
3. पीसीओएस (Polycystic Ovary Syndrome) – अनेक लहान सिस्ट तयार होऊन पाळी अनियमित होते.
4. एंडोमेट्रिओसिस – गर्भाशयाच्या अस्तरासारखी पेशी ओव्हरीमध्ये वाढल्याने सिस्ट तयार होऊ शकते.
5. गर्भधारणा – काही महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान सिस्ट तयार होऊ शकतात.
6. पेल्व्हिक इन्फेक्शन – गंभीर संसर्गामुळेही सिस्ट निर्माण होऊ शकते. ओव्हेरियन सिस्टची लक्षणे कोणती? जेव्हा सिस्ट छोटी असते तेव्हा लक्षणे जाणवत नाहीत. मात्र काही वेळा ते मोठे झाल्यास किंवा समस्याजनक असल्यास खालील लक्षणे दिसू शकतात –
• पोटाच्या खालच्या भागात हलक्या किंवा तीव्र वेदना
• पाळी अनियमित होणे
• पोट फुगल्यासारखे वाटणे
• पोट जड वाटणे
• लघवी सतत लागणे किंवा लघवी करताना त्रास होणे
• संभोगादरम्यान वेदना
• अपचन किंवा मलावरोध
जर अचानक तीव्र वेदना, ताप, उलट्या किंवा भयंकर थकवा जाणवत असेल, अंग गार पडून वेगाने ठोके पडत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओव्हेरियन सिस्टचे परिणाम काय असू शकतात?
बऱ्याच वेळा सिस्ट आपोआप नाहीसे होते, पण काही वेळा त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात –
रप्चर (फाटणे) – सिस्ट फुटल्यास अचानक तीव्र वेदना आणि रक्तस्राव होऊ शकतो.
टॉर्शन (पीळ बसणे) – काही वेळा सिस्टमुळे ओव्हरी फिरते आणि रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असतात.
इन्फर्टिलिटी (वंध्यत्व) – काही विशेष प्रकारच्या सिस्टमुळे गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.
कॅन्सर ( कर्करोग) – मेनोपॉज नंतर बनलेले सिस्ट असे असू शकतात. सिस्ट आकाराने मोठे असल्यास ते फुटण्याचा धोका अधिक असतो.
ओव्हेरियन सिस्टची तपासणी कशी केली जाते?
योनी मार्गाने अंतर्गत तपासणी- यामध्ये डॉक्टर हाताने तपासणी करून सिस्टच्या आकाराबाबत अंदाज घेऊ शकतात.
सोनोग्राफी (Ultrasound) – सिस्टचा आकार, प्रकार आणि स्थान समजते.
ब्लड टेस्ट – काही विशिष्ट सिस्ट असल्यास डॉक्टर CA-125 टेस्ट करतात.
हार्मोनल तपासणी – पाळीशी संबंधित सिस्ट असल्यास हार्मोन चाचणी केली जाऊ शकते.
उपचारासाठी काय करता येईल?
सिस्ट आकाराने लहान असल्यास आणि त्यांचा जास्त त्रास नसल्यास सिस्टसाठी तातडीच्या उपचारांची गरज नसते. मात्र लक्षणांनुसार पुढील उपाय केले जातात –
• नियमित निरीक्षण – छोटे सिस्ट आपोआप कमी होते का, हे पाहण्यासाठी डॉक्टर काही महिने निरीक्षण करतात. यामध्ये वारंवार सोनोग्राफी करायला लागते.
• औषधोपचार – हार्मोनल असंतुलनामुळे सिस्ट असेल तर डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्या देऊ शकतात.
• शस्त्रक्रिया (Surgery) – सिस्ट मोठे असेल ( >10 सेमीहुन मोठे) , वेदनादायक असेल किंवा कर्करोगाचा संशय असेल तर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
ओव्हेरियन सिस्ट टाळण्यासाठी काय करू शकतो?
हे सिस्ट टाळण्यासाठी कोणताही खात्रीशीर उपाय नाही. मात्र नियमित आरोग्य तपासणी करून सिस्ट लवकर शोधता येते.
याखेरीज हार्मोनचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी पुढील उपाय करता येतात.
संतुलित आहार घेणे – हिरव्या भाज्या, फळे, प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
योग्य वजन राखणे – लठ्ठपणा हा हार्मोनल असंतुलनासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.
जास्त प्रक्रिया केलेले अन्न टाळणे – जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ कमी खा.
ताणतणाव कमी ठेवणे – मेडिटेशन, व्यायाम यामुळे हार्मोनल संतुलन राखता येते.
शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे!
• ओव्हेरियन सिस्ट म्हणजे कॅन्सर नाही! – बहुतांश सिस्ट निरुपद्रवी असतात. त्यामुळे त्यांची चिंता करू नये.
• ही समस्या सामान्य आहे – अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी सिस्ट होते आणि ते पूर्णपणे बरे होतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतल्यास चिंता करण्याची गरज नाही.
तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला सिस्ट असल्यास घाबरू नका. योग्य माहिती घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या!