साथीच्या रोगांचं निवारण करणारी ‘शीतला देवी’!

हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून दिली जाते. त्यानुसार थंडावा देणारी देवता म्हणून ‘शीतला’. ताप येणा-या किंवा आणणा-या सर्व रोगांशी जोडली गेली आहे. पर्यायाने ती रोगांची देवी किंवा रोग निवारक देवता मानली जाते. त्यातही विशेषतः साथीच्या रोगांमुळे येणारा ताप कमी करणारी किंवा दूर करणारी देवता म्हणून ती प्रसिध्द आहे.
[gspeech type=button]

शीतलेचा उल्लेख असलेला सर्वात जुना शिलालेख राजस्थानातील ओसिया येथील साचिया माता मंदिरात आढळतो. या मंदिराच्या गर्भगृहातील शिलालेखात साचिया, शीतला आणि चंडिका अशा तीन देवींच्या मूर्ती स्थापन केल्याचा उल्लेख आहे.  हा शिलालेख इ.स. 11व्या शतकातील आहे. स्कंदपुराणातील प्रभासक्षेत्रमाहात्म्यामध्ये (7.1.135.1-7) शीतलागौरीचा उल्लेख आहे.

 

देवी, गलगंड व गाठीपासून मुक्तता देणारी देवता

शीतलागौरीच्या पूजनामुळे कलियुगातील दुःख कमी होते असे म्हटले आहे. देवी, गलगंड व गाठी यांपासून मुक्ती देणारी देवता म्हणून तिच्या पूजण्याचे नियम दिले आहेत. त्याचप्रमाणे, स्कंदपुराणातील अयोध्यामाहात्म्यामध्येही (2.8.8.21-28) अयोध्या यात्रेचा एक भाग म्हणून शीतलेचे पूजन तसेच बंडी व चुडका या देवतांबरोबर असलेल्या तिच्या मंदिराचा उल्लेख आहे.  श्री बृहन्नारदीय महापुराणात (1:117.94-99) द्वादशमासस्थिताष्टमीव्रतनिरूपणम या अध्यायात देवी शीतलाशी संबंधित प्रार्थना, तिचे रूप आणि पूजा यांचे वर्णन आढळते. भावप्रकाश ह्या मध्ययुगीन आयुर्वेदिक ग्रंथात मसुरिकाधिकार या प्रकरणात देवीरोग व गाठींचा उल्लेख आहे. ह्या प्रकरणाच्या शीतलाधिकार नावाच्या उपप्रकरणात मध्ये देवी शीतलाला उद्देशून स्तोत्र रचलेले आहे.

मुखेडमधील शिल्प

झाडू, सूप धारण केलेल्या गाढवावर आरुढ नग्न मूर्ती

श्रीबृहन्नारदीय महापुराण आणि भावप्रकाश या ग्रंथांमध्ये शीतलेचे वर्णन – गाढवावर बसलेली, झाडू, सूप व जलकुंभ धारण केलेली देवता – असे आहे. तिच्या मूर्तिचा सर्वात जुना पुरावा राजस्थानातील झालरापाटण येथील शीतलेश्वर मंदिरात सापडतो. झालरापाटणमधील मंदिर इ.स. 689 च्या सुमाराचे असून, मुख्य मंदिराजवळ सात देवींच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मूर्ती नग्न रूपात असून, झाडू, सूप धारण केलेल्या आणि गाढवावर आरूढ झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या शीतलेशी साधर्म्य दर्शवितात.  तसेच गुजरातमधील मोढेरा मंदिरातील सूर्यकुंडाजवळील देवळातही तिची मूर्ती आहे. मोढेराच्या मंदिरात शीतलेची बाराही हात असलेली मूर्ती आहे. सध्या मूर्तीचे काही हात मोडलेले असले तरी इतर हातातील वज्र, तलवार, जलकुंभ आणि सूप ठळकपणे दिसतात. ती एका प्राण्यावर बसलेली आहे जे बहुधा गाढव असावे. त्याचे डोके भग्न झाले असल्याने नक्की सांगता येत नाही. भारतभर शीतलेच्या अशा मूर्ती आढळतात. ग्रामीण भागात मात्र शीतलेची पूजा बहुतेक वेळा शेंदूर लावलेल्या दगडाच्या स्वरूपात केली जाते.

विविध राज्यात शितला देवीचे रुप वेगळे पण काम एकच

भारतभर तिची पूजा विविध प्रकारे केली जाते. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तिच्या पूजेचे विशेष प्रस्थ आहे. या राज्यांमध्ये तिची पूजा साथीच्या देवी आणि गावदेवी (ग्रामदेवता) या दोन्ही स्वरूपांत केली जाते. गुजरातमध्ये तिची पूजा नवऱ्याच्या आणि मुलांच्या सौख्यासाठी केली जाते. तसेच उष्णतेपासून होणा-या रोगांपासून वाचवणारी थंड देवता म्हणूनही तिला पूजतात. सोळाव्या शतकाच्या स्कंदपुराणातील काशीखंडातील उल्लेखानुसार देवीरोग बरे करणारी शक्ती  म्हणून तिची वाराणसीमध्ये पूजा केली जाते. पश्चिम बंगाल व गुजरातमध्ये तिची पूजा विशेषतः लोकप्रिय आहे. बंगाली मंगलकाव्यांमध्ये, शीतलेचे विवाहित ब्राह्मण स्त्री म्हणून वर्णन केले आहे. त्यानुसार ती लाल काठाची पांढऱ्या साडी आणि कपाळावर मोठा कुमकुमाचा टिळा धारण करते.  बाकी तिची चिह्ने तशीच आहेत. बंगाल मध्ये केल्या जाणा-या शितलापूजनात तिची अशीच मूर्ती तयार करतात.

 

आधुनिक रोगांपासून बचाव करण्यासाठीही शितलेचे पूजन

आधुनिक काळात तिची पूजा केवळ देवी, कांजिण्या अशा साथीच्या रोगांपर्यंतच मर्यादित राहिली नसून त्यात एचआयव्ही, एड्स, कॉलरा यांसारख्या नव्या रोगांचाही समावेश झाला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तिची ओली बीबी, बसंता बुद्धी, सडेला माता, चेचक माता, रक्तीवती, छोटी मा, बडी मा, मातंगी, महाकाली, ज्येष्ठा, षष्ठी, कालरात्रीअशी अनेक नावे प्रसिध्द आहेत.

बंगालमधील पेंटिंग

शिळी सप्तमी 

शीतलाशी संबंधित केले जाणारे महत्वाचे व्रत म्हणजे ‘शिळी सप्तमी’. ह्या दिवशी उरलेले म्हणजेच शिळे अन्न  तिला अर्पण केले जाते. इतर साधारण पूजनाशिवाय देवीच्या अभिषेकामध्ये पाणी, दूध, दही किंवा ताक याचा वापर महत्वाचा आहे. कारण हे घटक शरीराला थंडावा देतात. काही समुदायांमध्ये शिळ्या अन्नपदार्थांमध्ये काही विशिष्टच पदार्थ असतात. शिळे झाल्यावर यातील पोषणमूल्य वाढतं. आताच्या भाषेत सांगायचं तर गट बॅक्टेरिया, प्रो बायोटिक, गुड बॅक्टेरिया. आणि हे शरीराकरता चांगले असतात. यामुळं प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग दूर राहतात.

 

सिंधी समुदायातील थडरी

सिंधी समुदायातील थडरी हा सण शीतला देवीशीच संबंधित आहे. या समुदायाची ही धारणा आहे की, शीतला देवी रोगांपासून आपलं संरक्षण करते. उष्णतेपासून होणाऱ्या देवी, कांजण्या या रोगांपासून बचाव होण्यासाठी शीतला देवीचं पूजन केलं जातं. शीतला देवीला अग्नी आवडत नाही असं ते मानतात. त्यामुळं ते शिळा सप्तमीच्या दिवशी चूल पेटवत नाहीत. आदल्या दिवशीच स्वयंपाक करतात. याकरता लोला, कोकी, पराठा पदार्थ विशेष करून तयार केले जातात. महिला पुरोहिताच्या हस्ते शीतला देवीची पूजा करून कथा ऐकवली जाते.

हेही वाचा –वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त

महाराष्ट्रातील शीतला देवीचे पूजन

महाराष्ट्रात शीतला निम्नस्तरावरील देवता म्हणून ओळखली  जाते. तिची पूजा विशेष करून देवीरोग, चेचक, गोवर, कांजिण्या इत्यादी आजारांपासून मुक्तीसाठी केली जाते. विशेषतः देवी रोगाच्या साथीच्या वेळेस तिच्या पूजनाला विशेष महत्व आले.  मुखेडमधील बाराव्या शतकातील प्राचीन शिवमंदिरात तिची मूर्ती आहे. तिच्या प्रमुख प्रतीकांवरून म्हणजेच — झाडू, तलवार, सूप, कपाल (अस्थिकुंभ), पुढ्यातील दोन सांगाड्यांच्या आकृती आणि  गाढव — यांवरून ती शीतला देवी असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील केळवे, माहीम आणि चौल इथली शीतलेची मंदिरे प्रसिध्द आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा
हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकांनी साप किंवा नागांची प्रतिमा काहीशी नकारात्मक निर्माण केली. खजिन्याचा रखवालदार बदला घेणारा, इच्छादारी अशा वेगवेगळ्या रुपात
Diet For Sports : बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळामध्ये सततची रॅली, स्मॅश, सर्व्हिस आणि रिसिव्ह यामुळे लेगवर्क, रिफ्लेक्सेस, आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ