गेल्या काही भागांमध्ये आपण पर्माकल्चर आणि त्यातील महत्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून घेतली. आता ह्यापुढे अधिक ज्ञान कसं आणि कुठे घेता येईल ते पाहुया.
पर्माकल्चरची रचना ही फक्त एका शेतापुरती मर्यादित नसून एकूण मानवजातीच्या भल्यासाठी आहे तेंव्हा जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुनियोजित पद्धतीने हा विचार कसा पोहोचेल असा विचार सुरुवातीपासूनच मॉलिसन आणि होमग्रेन ह्या जोडगोळीने केला. पर्माकल्चर शिकण्या-शिकवण्याची सुनियोजित पद्धत अमलात आणली गेली. त्यातील सर्वात मुलभूत कोर्स आहे PDC.
इंट्रोडक्शन टू पर्माकल्चर कोर्स (IPC):
महत्वाच्या संकल्पनांची तोंड ओळख करून घेण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. ह्या कोर्सच्या आधारे सुरुवात करून मग हळूहळू जसं जमेल तसं शिकण्यासाठी हा कोर्स आहे. वीकेंडला दोन किंवा तीन दिवसांचा हा कोर्स असतो. ज्यांच्याकडे PDC करण्यासाठी वेळ नाहीये किंवा शेतीची डिझाईन करण्यासाठी वेगळी माणसे आहेत ते हा कोर्स करू शकतात.
पर्माकल्चर डिझाइन सर्टिफिकेट कोर्स (PDC):
सर्व संकल्पनांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त असलेला हा कोर्स आहे. कमीतकमी ९ दिवस ते १६ दिवस, ज्यात ७२ तासांचा अभ्यास आणि त्यासोबत प्रत्यक्ष शेतावर काम करण्याचा अनुभव समाविष्ट असेल असा हा कोर्स असतो. भारतात क्लीआ चांदमल ह्यांचे फोयट फार्म, नरसाण्णा कोपुला ह्यांचे अरण्या एग्रीकल्चर अल्टरनेटिव, नवदन्या इंस्टिट्यूट, धर्मालय इंस्टिट्यूट अशा काही ठिकाणी हा कोर्स आयोजित केला जातो. भारताबाहेरीलही काही शिक्षक भारतात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी हा कोर्स घेतात. आपलं शेत ज्या भागात आहे त्या भागात पर्माकल्चरचा वापर कशा पद्धतीने केला गेलाय ते पाहण्यासाठी शक्यतो आपल्या शेताशी साधर्म्य असलेल्या जागी शिकणं फायद्याचं ठरतं. साधारण तीस ते पन्नास हजार रुपये फी असते पण ह्यातील संकल्पनांचा चांगला वापर केला तर हा खर्च खूपच लवकर भरून काढता येतो.
ऑनलाईन कोर्सेस:
प्रत्यक्ष शेतावर राहून शिकणे शक्य नसेल त्यांच्यासाठी अनेक ऑनलाइन पर्यायही सध्या उपलब्ध आहेत. पर्माकल्चर एड्युकेशन ऑनलाईन, ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी ऑनलाईन PDC, Udemi हे काही चांगले पर्याय आहेत. आंतरराष्ट्रीय मान्यता, आपल्या सोयीप्रमाणे कधीही शिकण्याची सोय आणि PDC पेक्षा कमी खर्च हे ऑनलाईन शिकण्याचे फायदे आहेत.
शिकण्यासोबतच प्रत्यक्ष शेतावर भेट देणेही शिकण्यासाठी फार गरजेचं आहे. आम्ही काम करत असलेल्या मोहरानला तर आपण भेट देऊ शकता पण त्यासोबतच भारतातील पर्माकल्चरचा सर्वोत्तम वापर केलेल्या इतर काही शेतांची भेटही फार मोलाची ठरू शकते. त्यातील काही महत्वाची ठिकाणे खालीलप्रमाणे:
१. Foyts फार्म:
पश्चिम घाटात वसलेल्या गोव्यातील हे क्लिआ चंदमल ह्यांनी गेल्या तीस वर्षांत तयार केलेलं मॉडल आहे. सदाहरित वन, माकडे, बिबटे इत्यादी वन्यप्राणी असतानाही अत्यंत उत्पादक शेत कसं करता येईल ह्याचा हा एक उत्तम नमुना आहे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, माती पुनरुज्जीवित करणे, शाश्वत आर्किटेक्चर ह्यावरही फार चांगलं काम इथे पाहायला मिळेल.
२. पीटर फर्नांडिस आणि रोझी ह्यांचे शेत:
गोव्यातीलच आसगावमधील फक्त ६०० वर्ग मीटरवर वसलेलं हे शेत, जैवविविधतेने नटलेलं आहे. डेब्री पसरलेल्या पडीक जमिनीवरही अत्यंत कमीतकमी वेळात पर्माकल्चरची तत्वे वापरून नंदनवन फुलवलेलं इथे पाहायला मिळेल.
३. अरण्या एग्रीकल्चर अल्टरनेटिव्ह:
तेलंगणातील अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशात, नरसाण्णा आणि पद्मा कोपुला ह्या जोडप्यांनी ह्या शेतीची पर्माकल्चर पद्धतीने रचना केलीय. वर्षभर वेगवेगळे कोर्सेसही इथे आयोजित केले जातात.
४. चैत्रबन, पुणे
राजगुरुनगर जवळ चैत्रबन हे ज्योती देशपांडे ह्यांचे शेत पर्माकल्चर पद्धतीने विकसित केलेल्या शेताचा एक चांगला नमुना आहे. कमी पाऊस आणि अत्यंत उताराची जमीन असतानाही हे एक जैवविविधतेने नटलेले, अत्यंत उत्पादक शेत आहे. खासकरून कायमस्वरूपी गादीवाफे इथे पाहता येतात.
पर्माकल्चर शिकणं निव्वळ आपल्या शेतावर वापरण्यासाठी उपयोगी नाहीये तर हा करियरचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पर्माकल्चर आपल्या विचारांना दिशा देण्याचं काम करतं. त्यामुळेच आर्किटेक्ट, डॉक्टर्स, शेतकरी, नगररचनाकार, डिझायनर्स, इंजिनियर्स अशा विविध क्षेत्रातील अनेक मंडळी आपल्या मूळ विशेषतेसोबत पर्माकल्चरचाही अभ्यास करत आहेत.
सध्या ज्या विपरीत परिस्थितीत आपली शेती, शेतकरी आणि पर्यावरण आहे ती फारच गंभीर आहे. त्यावर युद्धपातळीवर अत्यंत तातडीने आपल्याला काम करावे लागेल. माणसांची काळजी, पृथ्वीची काळजी आणि ह्या दोघांची काळजी घेतल्यानंतर जे अधिकचं उत्पादन होईल ते पुन्हा माणसांमध्ये आणि निसर्गात परत केलं तरच शाश्वतता सध्या होऊ शकणार आहे. रासायनिक शेती ही दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता तर कमी करत आहेच पण प्रदूषणाचं, अनारोग्याचं ते एक सर्वात मोठं कारण आहे. आपली लोकसंख्या ही पुढचे काही वर्षे तरी वाढत राहणार आहे आणि अशा वाढत्या लोकसंख्येला चांगलं अन्न, निवारा मिळवून देण्यासाठी पर्माकल्चर खूप मोलाचं काम करू शकतं. आज शेतीत रासायनिक शेतीला पर्याय नाही अशी बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता आहे, त्याचबरोबर मातीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. चांगलं, पौष्टिक अन्न ही तर नेहमीच मागणी असलेली गोष्ट राहणार आहे तेंव्हा महाराष्ट्रातील तरुण जेवढ्या लवकर ह्याकडे लक्ष देतील तेवढ्या लवकर महाराष्ट्र आणि देशाची सुजलाम सुफलाम होईल ह्यात शंका नाही.
1 Comment
Hi Sameer ji
Dr Deepali Hebbare here from nisarg Mitra group
I want to do a short course in permaculture around Pune
Can u suggest
Though I hv read abt the places I hv written,still asking