सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तेलंगणा इथल्या एका रासायनिक कारखान्यात अणुभट्टीचा (रिएक्टर) स्फोट झाला. या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 42 मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. अजुनही बचाव कार्य सुरूच आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केमिकल कंपनीमध्ये स्फोट
तेलंगणामधल्या पशामिलाराम इथल्या सिगाची केमिकल इंडस्ट्री युनिटमध्ये अणुभट्टीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 39 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, बचाव कार्यादरम्यान आणखीन मृतदेह सापडले आहेत.
बचावकार्याच्या पहिल्या टप्प्यात 31 मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तर तीन जखमींचा रुग्णालयातील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बचावकार्याचा शेवटचा टप्पा अजूनही सुरू आहे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परितोष पंकज यांनी पीटीआयला दिली आहे.
रासायनिक अभिक्रियेमुळे हा स्फोट झाल्याचा संशय तेलंगणा राज्याचे आरोग्यमंत्री दामोदर राजनसिंहा यांनी व्यक्त केला आहे. या स्फोटामुळे संपूर्ण कारखाना उद्धवस्त झाला असून स्फोटावेळी कारखान्यात 90 कर्मचारी काम करत होते. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, कारखान्यांच्या छताचे तुकडे झाले. तर काही कर्मचारी जवळजवळ 100 मीटर अंतरावर फेकले गेले, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. राज्यपालांनी कामगार, रोजगार प्रशिक्षण आणि कारखाने (LETF) चे प्रधान सचिव एम. दान किशोर यांच्याशीही चर्चा करुन पीडितांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बचावकार्य
बचावकार्यामध्ये एनडीआरएफ, हायड्रा आणि तेलंगणा अग्निशमन आपत्ती प्रतिसाद पथकांचा समावेश आहे.
सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी
सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड, ही अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट्स (एपीआय), इंटरमीडिएट्स, एक्सिपियंट्स, व्हिटॅमिन-मिनरल मिश्रणे तयार करते. आरोग्यमंत्री दामोदर राजनसिंहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी 40-45 वर्षे जुनी असून मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज बनवते.
चौकशी समितीची नेमणूक
राज्य सरकारने या आपत्तीची आणि त्याच्या मूळ कारणांची चौकशी करण्यासाठी एक उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे. हा स्फोट स्प्रे ड्रायरच्या आत दाब वाढल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कामगार स्प्रे ड्रायर चालवत असताना दाब वाढल्याचा दिसून आला. त्यातील धुळीच्या सूक्ष्म रासायनिक कणांमुळे स्फोट होऊन त्यानंतर आगीनं तीव्र रूप धारण केलं आणि मोठा अपघात झाला.
आर्थिक सहाय्य
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली.