वैशाख पौर्णिमा दोन कारणांसाठी विशेष आहे. एक म्हणजे भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि वन्यप्राणी गणना. वर्षातला हा एक दिवस महाराष्ट्रात वन्यप्राण्यांच्या गणनेकरता राखून ठेवण्यात आला आहे. गेले कित्येक वर्ष याच दिवशी वन्यप्राणी गणना करण्यात येत आहे. पण ही वन्यप्राणी गणना नेमकी कशी करतात आणि याच दिवशी का करतात, चला समजून घेऊयात..
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशातली दृश्यमानता
आपण सगळेच जाणतो की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो. त्यामुळं चंद्रप्रकाशही चांगला असतो. रात्रीच्या अंधारात आपल्याला या चंद्रप्रकाशात अगदी लख्ख नाही तरी, बऱ्यापैकी दिसू शकते. वैशाख पौर्णिमेचं वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यातल्या पौर्णिमेला आकाश नीरभ्र असतं. म्हणजेच ढग नसतात. परिणामी स्वच्छ चंद्रप्रकाश असतो. शहरांमध्ये वीजेच्या झगमगाटात या गोष्टी फारशा लक्षात येत नाही. पण शहरांपासून दूर गावाकडं हा फरक आपल्याला लगेचच लक्षात येतो. ग्रामीण भागात आणि जंगलात पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गोष्टी बऱ्यापैकी स्पष्टपणे नजरेस येतात. हे तर झालं रात्रीच्या नैसर्गिक पुरेशा उजेडाबद्दल. हे तर सर्वच पौर्णिमेला लागू होतं. पण वैशाख पौर्णिमा निवडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे.
उन्हामुळे पाणवठ्यांवर परिणाम
वैशाख महिना म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. पावसाळा ऋतू संपून बराच काळ लोटलेला असतो. या काळात कित्येक झाडांची पानगळ झालेली असते. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत बऱ्यापैकी आटलेले असतात. काही मोजक्या पाणवठ्यांवरच पाणी शिल्लक असतं. त्यामुळं जंगलातले सर्व प्राणी या मोजक्याच पाणवठ्यांवर अवलंबून असतात. शिल्लक पाणवठ्यांवरच पाणी पिण्यासाठी त्यांना यावं लागतं. वनखातेही काही ठिकाणी उन्हाळ्याच्या सुरवातीला पाण्याची कृत्रीम तळी करतात. मोजक्या जागा असल्यामुळे प्राण्यांना ट्रॅक करणं सोपं जातं. रात्रभर या पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद या गणतीत केली जाते.
वन्यप्राणी गणती नेमकी कशी करतात?
जंगलातील पाणवठ्यांच्या जागी वनखात्यातर्फे मचाणी बांधण्यात येतात. उंचीवरून पाणवठ्यावरील प्राणी सहज दिसेल अशा अंतरावर आणि जागी या मचाणी बांधण्यात येतात. पूर्वी बांबूच्या मचाणी बांधल्या जायच्या. पण गेल्या काही वर्षांपासून लोखंडाच्या कायमस्वरुपी मचाणी जंगलात वनखात्याने बांधल्या आहेत. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साधारण दुपारी तीन वाजता या मचाणीवर एक वनरक्षक आणि दोन प्राणीमित्र स्वयंसेवक अशी तीन जणांची टीम या मचाणीवर येऊन बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत ही टीम तिथंच बसलेली असते. या काळात पाणवण्यावर कोणतं जनावर आलं आहे हे ते टिपतात. प्राण्याच्या बाह्यआकारावरून कोणता प्राणी आला आहे, हे टीमला लगेच कळतंच. त्या जंगलात हत्ती, नीलगाय, गवे, हरण, सांबर, कोल्हा, लांडगा, वाघ, बिबट्या आणि आणखी कोणत्या प्राण्यांचा अधिवास आहे, या गोष्टी माहीत असतातच. प्राण्याच्या पावलाच्या ठश्यावरून तो प्राणी कोणता आणि नर आहे की मादी हे ओळखता येते. पिल्ले किंवा बछड्यांच्या पावलांचा ठसा लहान असतो. प्रत्येक वाघाची टेरिटरी ही ठरलेली असते. एका वाघाच्या टेरिटरीत साधारण दोन-तीन वाघीणी असतात. त्यांच्यासोबत बछड्यांचे ठसेही दिसले म्हणजे त्या जोडप्याला किती पिल्लं झाली हे कळतं. प्रत्येक वाघाच्या शरीरावरील पट्टे हे वेगळे असतात. बिबट्याच्या शरीरावरील ठिपके वेगळे असतात. प्रत्येक प्राण्याचं हे वेगळेपण हीच त्याची ओळख असते. ही झाली प्राणीगणनेची पारंपरिक पद्धत. गेल्या काही वर्षांपासून प्राणीगणनेत आधुनिक साधनांचाही वापर करण्यात येत आहे. काही हालचाल झाल्यास रात्रीच्या काळोखात इमेज घेणाऱ्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर वन्यप्राणीगणनेमध्ये केला जात आहे. वैशाख पौर्णिमेच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच पाणवठ्याच्या मार्गावरील झाडांच्या खोडाला हे नाईट व्हिजन मुव्हिंग सेन्सर असणारे कॅमेरे बांधण्यात येतात. याकरताही वनखात्याकडून स्वयंसेवकांची मदत घेण्यात येते.
सामान्य नागरिक या गणतीत सामील होऊ शकतात का?
वनखात्याला या गणतीकरता स्वयंसेवकांची गरज असते. त्यामुळं वन्यप्राणी संवर्धनावर काम करणाऱ्या लोकांची मदत या वन्यजीव गणतीकरता ‘स्वयंसेवक’ म्हणून घेण्यात येते. या स्वयंसेवकांना प्राण्याच्या बाह्य वैशिष्ट्यावरून नेमका कोणता प्राणी आहे, हे ओळखता यायला हवं. यासाठी त्यांचा विविध प्राण्यांबद्दलचा पुरेसा अभ्यासही हवा, त्यांची माहिती असणं गरजेचं असतं. वनखात्यातर्फे दरवर्षी वृत्तपत्रांमध्ये वन्यप्राणी गणतीकरता स्वयंसेवक हवेत अशी जाहिरात देण्यात येते. त्यानुसार इच्छुक प्राणीमित्र अर्ज भरून वनखात्याकडे पाठवतात. निवडलेल्या इच्छुकांना वनखात्यातर्फे तपशील कळवण्यात येतात. 2025 पासून याकरता वनखात्यातर्फे ऑनलाईन फॉर्मद्वारे ही प्रक्रिया करण्यात येत आहे. काम करणाऱ्या लोकांची मदत या वन्यजीव गणतीकरता स्वयंसेवक
गणतीदरम्यान स्वयंसेवकांचा प्रत्यक्ष अनुभव
सामान्य माणसांना रात्रीच्या वेळी अभयारण्य किंवा जंगलांमध्ये यायला बंदी असते. या उपक्रमाच्या माध्यमातून रात्रीचं जंगल अनुभवण्याची संधी वन्यजीवप्रेमींना मिळते, असं गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ वन्यप्राणी गणतीकरता ताडोबा जंगलात जाणारे अरुण दुबे यांनी सांगितलं. व्यवसायाने बँकर असणारे अरुण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. अरुण सांगतात, “गणतीकरता स्वयंसेवकांनी आपल्याला दिलेल्या मुख्य फॉरेस्ट चेकपोस्टवर आपलं आपण पोहचायचं असतं. तिथून आपल्याला नेमून दिलेल्या मचाणीवर वनखात्याच्या गाडीनं सोडण्यात येतं. वनखात्याकडून स्वयंसेवकाची खूप सुरक्षा आणि काळजी घेण्यात येते. वनखात्याकडून पाणी आणि बिस्किटं पुरवण्यात येतात. बाकी आपल्या खाण्याची सोय आपल्याला करावी लागते. पण या गणतीदरम्यान फारसं खाणं-पिणं न केलेलंच उत्तम. कारण अंधारात नैसर्गिक विधीसाठी खाली उतरणं धोकादायक असतं. लोकांना या प्राणीगणतीत सामील करण्याचे आणखी एक कारण म्हणजे एखाद्या जंगलात कोणत्या प्रजातीचे खरंच किती प्राणी आहेत. याकरता सामान्य लोकांनांही कळतं.”
तुमच्या भागातील अभयारण्य आणि जंगलांमधील वन्यप्राणी गणना कशी झाली, याबद्दल नक्की माहिती घ्या.
हेही वाचा – देशात जातनिहाय जनगणना होणार, म्हणजे नेमकं काय?
हेही वाचा – जीएसटी ई – इनव्हॉईस म्हणजे काय?