उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय?

Vise President Jagdeep Dhankhar Resignation : उपराष्ट्रपपती जगदीप धनखड यांनी सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी या अनपेक्षित घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दिनांक 22 जुलै 2025 रोजी गृह मंत्रालयाने त्यांच्या राजीनाम्याला कलम 67 (अ) अंतर्गत तात्काळ मंजूरी दिली आहे. 
[gspeech type=button]

उपराष्ट्रपपती जगदीप धनखड यांनी सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी या अनपेक्षित घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दिनांक 22 जुलै 2025 रोजी गृह मंत्रालयाने त्यांच्या राजीनाम्याला कलम 67 (अ) अंतर्गत तात्काळ मंजूरी दिली आहे. 

उपराष्ट्रपती धनखड यांनी  राजीनाम्यामध्ये जरी तब्येतीचं कारण दिलं असलं तरी, खरं हेच कारण आहे की आणखीन काही असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला आहे. समजून घेऊयात नेमकं राजधानी दिल्लीत घडलं काय? आणि आता पुढे काय होणार? 

उपराष्ट्रपतींच्या राजीनामा पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

संसदेची अधिवेशनं ही नेहमीच वादळी असतात. हिच अलिखित परंपरा कायम ठेवत यावेळी चक्क देशाचे उप-राष्ट्रपती, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनीच धक्का दिला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित संविधानाच्या कलम 67 (अ) पदाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. आरोग्याच्या कारणास्तव वैद्यकीय सल्ल्यानुसार या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. 

“माझ्या कार्यकाळात आपण राखलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि आमच्यातील सुखदायक आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी तुमच्या महामहिम – भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो.

“मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य आहे आणि माझ्या पदाच्या काळात मी बरेच काही शिकलो आहे.”

त्यांनी आपल्या पत्राचा शेवट असा केला की, “हे पद सोडताना, भारताच्या जागतिक उदय आणि अभूतपूर्व कामगिरीबद्दल मला अभिमान आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यावर माझा अढळ विश्वास आहे.”

दरम्यान, धनखड यांचा कार्यकाळ 2027 साली संपणार आहे. तब्येतीचं कारण देत त्यांनी दोन वर्षे आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 साली भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून ते निवडून आले होते. तर 11 ऑगस्ट 2022  रोजी शपथ घेत त्यांनी कार्यभार हाती घेतला होता.  डिसेंबर 2024 मध्ये विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला होता.

तब्येतीचं खरं कारण की आणखीन काही

धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण नेमकं हेच कारण आहे की आणखीन काही अशी चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे. 

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वय 74 वर्ष आहे.  दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती.  मार्च 2025 मध्ये त्यांना काही दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.  जूनमध्ये, कुमाऊं विद्यापीठात सुवर्णमहोत्सवी समारंभात सहभागी होताना ते बेशुद्धही पडले. तरिही, ते संसदेत सक्रिय राहून आणि राज्यसभेचे कामकाज अगदी सक्षमपणे चालवत होते.

मात्र त्यांच्या या राजीनामा देण्याच्या वेळेवर काँग्रेस सह अन्य विरोधी नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश हे राजीनामा देण्याच्या काही वेळापूर्वी उपराष्ट्रपतींसोबत होते. “उपराष्ट्रपतींचा अचानक राजीनामा जितका धक्कादायक आहे तितकाच तो अनाकलनीय आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझ्यासह अनेक खासदारांनी त्यांची भेट घेतली. संध्याकाळी 7.30 वाजता त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. यात काही शंका नाही… की त्यांना त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल. पण त्यांच्या पूर्णपणे अनपेक्षित राजीनाम्यात काहीतरी दडलं आहे. तरी, ही अटकळ बांधण्याची वेळ नाही,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे यांनीही धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. “उपराष्ट्रपतींनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची बातमी चिंताजनक आहे. आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना करतो. पण एक प्रश्न उद्भवतो. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सगळ्यांना नवल वाटत आहे.   या सरकारमध्ये काय चाललं आहे? हा निर्णय योग्य सल्लामसलत किंवा चर्चेशिवाय घेतला आहे का? जर आरोग्याची चिंता असती तर अधिवेशनाच्या काही दिवस आधी किंवा नंतरही राजीनामा देता आला असता.”

हे ही वाचा : राज्यसभा अध्यक्ष पदावरुन जगदीप धनखड पायउतार होणार का?

पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रेलचलीत राजीनाम्याचा धक्का 

संसदेच्या अनेक खासदारांसाठी, धनखड यांच्या राजीनाम्याची वेळ संशयास्पद होती. माजी उपराष्ट्रपतींचा राज्यसभेतला पहिला दिवस अनेक घटनांनी भरलेला होता. दुसऱ्या दिवशी बैठका आणि विविध कार्यक्रमांचं नियोजनही केलं होतं.  

जसं की, सोमवारी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या रोख रकमेवरून त्यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रस्ताव सादर केल्यावर त्यांनी महासचिवांना आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितलं. शिवाय, त्यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित आणि नामांकित सदस्यांना शपथ दिली.

मंगळवारी (22 जुलै 2025 रोजी ) दुपारी त्यांनी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात ते “न्यायपालिकेशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा” करणार होते.

संशयित घटना

सोमवारी राज्यसभेत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रस्ताव आल्यावर  महासचिवांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. विरोधकांच्या मते, याविषयी सरकारला कल्पना नव्हती. 

द फेडरलमधील एका वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी धनखड यांनी बोलावलेल्या बैठकीचे अध्यक्षपद भाजप अध्यक्ष आणि राज्यसभेतील सभागृह नेते जेपी नड्डा आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे नव्हते, त्यामुळे या संशयात  आणखी भर पडली आहे.

याशिवाय उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने एक पत्रकार परिषद प्रसिद्ध करून जाहीर केलं होतं की ते 23 जुलै रोजी भारतातील खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाईच्या नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधण्यासाठी जयपूरला जाणार आहेत. 

या काही घटनांवरुन त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव नाही तर राजकीय मतभेदांवरुन राजीनामा दिला असू शकतो अशी शक्यता विरोधक व्यक्त करत आहेत. 

पुढे काय घडणार?

गृह मंत्रालयाकडून जगदीप धनखड यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे धनखड आता पदमुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत हे पद रिकामं असेल. संविधानानुसार, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे आपसुकच राज्यसभेचे अध्यक्ष पदही रिकामी असणार आहे. तरी, सध्या या पदाची जबाबदारी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यावर असेल.

निवडणूक आयोग लवकरच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार गुप्त मतदान करतात. नियमांनुसार, ही निवडणूक 19 सप्टेंबर 2025 पूर्वी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका कधी घोषित होतात आणि नवीन उपराष्ट्रपती कोण असतील याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Google's earthquake alert system : दरवर्षी सरासरी हजारो लोकं भूकंपात मृत्यूमुखी पडतात. पण 2019 पासून गुगलच्या मोबाईल-आधारित अलर्ट्सच्या व्यवस्थेमुळे भूकंपग्रस्त
E-rupee : ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर आहे. जे लाभार्थीला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या रूपात मिळते. हे एक
Reversible cancer therapy : कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या या संशोधनाकडे पाहिलं जात आहे. केमो थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ