आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, “झोप नीट घ्या, नाहीतर तब्येत बिघडेल.” पण खरंच आपण हे मनावर घेतो का? आपण वेळेत झोपतो का? आपल्यापैकी खूप कमी लोक या गोष्टीला गंभीरपणे घेतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिरीज बघणं, गेम्स खेळणं किंवा काही लोकं कामामुळे नाईट शिफ्ट करतात, या सगळ्या जागरणांमुळे त्यांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, हे त्यांना समजत नाही.
आजकाल अनेक तरुण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात, कामं करतात तसंच बरेच जण शिफ्टमध्ये काम करतात. ज्यामुळे त्यांच्या झोपेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडते.
तुम्हाला कदाचित वाटेल, एक रात्र कमी झोपलो तर, त्यात काय एवढं? पण थांबा! स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर 8 तास तरी तुम्ही झोपला नाहीत, तर तुमच्या रक्तात काही असे प्रोटीन्स तयार होतात जे तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात.
कमी झोप आणि हृदयाचा संबंध
हे प्रोटीन्स तुमच्या शरीरात सूज निर्माण करतात आणि ही सूज तुमच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. हळूहळू ही सूज तुमच्या हृदयाचं काम बिघडवते. यामुळे हार्ट फेल्युअर, हृदयाचे ठोके अनियमित होणं असे अनेक गंभीर त्रास तुम्हाला होऊ शकतात.
स्वीडनमधल्या उप्पसाला विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञांनी 16 निरोगी आणि तरुण मुलं-मुलींची निवड केली. त्यांना काही दिवस एका लॅबमध्ये (प्रयोगशाळेत) ठेवलं. तिथे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवलं गेलं. म्हणजे त्यांनी काय खाल्लं, किती हालचाल केली, प्रकाशात किती वेळ ते राहिले, या सगळ्याची नोंद ठेवली गेली. यावेळी या तरुणांनी दोन प्रकारचे वेळापत्रक पाळले:
1.चांगली झोप: तीन रात्री या 16 जणांनी पूर्ण 8.5 तासांची झोप घेतली.
2.कमी झोप: त्यानंतरच्या तीन रात्री त्यांनी फक्त 4 तास झोप घेतली.
या प्रत्येक झोपेच्या टप्प्यानंतर, या सर्व लोकांना छोटी जास्त वेगाची सायकल चालवायला दिली. आणि त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासले गेले. शास्त्रज्ञांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये जवळपास शरीरातील 90 वेगवेगळ्या प्रोटीन्सची तपासणी केली.
यावेळी त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे दिसली ती म्हणजे, कमी झोपेमुळे रक्तातील सूज तयार करणारे प्रोटीन्स (inflammatory markers) वाढले होते. आणि जे चांगले प्रोटीन्स असतात, जे आपल्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात, ते मात्र कमी झाले होते.
कमी झोपेमुळे तुमचं शरीर ‘स्ट्रेस मोड’ मध्ये जातं. म्हणजे शरीरावर ताण येतो आणि शरीरात सूज वाढवणारे प्रोटीन्स तयार होतात. ही सूज हळूहळू रक्तवाहिन्यांना खराब करते. आणि यामुळे हृदयविकार (हृदयाचे आजार), हृदयाचे ठोके अनियमित होणे, हार्ट फेल्युअर यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा : 59 टक्के भारतीयांची झोप उडाली ! सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर
व्यायाम करूनही उपयोग नाही?
आणखी एक महत्त्वाची गोष्ट या संशोधनात समोर आली. साधारणपणे, व्यायाम केल्यावर शरीर चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करतं, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण संशोधनात असं आढळलं की, जर कमी झोप घेतली असेल, तर व्यायाम करूनही हे चांगले प्रोटीन्स आपल्या शरीरात तितक्या प्रमाणात तयार होत नाहीत. म्हणजेच, झोप कमी असेल तर व्यायामाचाही पूर्ण फायदा मिळत नाही.
यासाठी आपण काय करायला हवं?
काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणू शकतो:
झोपेचं वेळापत्रक ठरवून ठेवा: रोज रात्री एका ठराविक वेळेत झोपायला जा आणि सकाळी एका ठराविक वेळेत उठा. सुट्ट्यांमध्येही हे वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा.
उशीरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप टाळा: झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्ही बघणं बंद करा.
झोपेच्या आधी शांत वातावरण ठेवा: झोपण्यापूर्वी शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा. खोलीत जास्त प्रकाश नसावा, आवाज नसावा. हलके संगीत ऐकू शकता किंवा पुस्तक वाचू शकता.
शक्य असेल तर 7-8 तास तरी झोपण्याचा प्रयत्न करा.