दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले असून आता पुढची कमान ही आपच्या ज्येष्ठ व विश्वासू नेत्या आतिषी यांच्या हाती दिली आहे.
मद्य घोटाळा प्रकरणी तुरूंगात असलेल्या केजरीवाल यांना दिनांक 13 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर रविवारी 15 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी आपण येत्या दोन दिवसात राजीनामा देत असल्याचं माध्यमांमध्ये स्पष्ट केलं. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाचा पुढचा दावेदार कोण यावर चर्चा सुरू होती. अर्थातच यामध्ये आतिषी याचं नाव प्रामुख्याने चर्चेत होतं.
कोण आहेत आतिषी मार्लेना?
आतिषी या 2019 पासून राजकारणात सक्रिय झाल्या. आप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्व दिल्लीतून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्या पराभूत झाल्या. पुढे त्यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.
आतिषी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर्स डिग्री घेतली आहे. यापूर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळामध्ये आतिषी यांच्याकडं सर्वात जास्त खात्यांची जबाबदारी दिली आहे. सध्या त्यांच्याकडे महिला व बालविकास, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, उर्जा, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा या खात्यांचा कार्यभार आहे.