मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या (NIA Court) विशेष कोर्टाने तब्बल 17 वर्षानंतर हा निकाल दिलेला आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर आलेला हा निकालही धक्कादायक आहे. कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे की, सरकारी वकिलांनी मालेगाव इथे स्फोट झाल्याचं सिद्ध केलं. मात्र, या स्फोटात गाडीमध्ये बॉम्ब ठेवलेला हे सिद्ध करण्यात यश आलं नाही.
त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी,सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि नि. मेजर रमेश उपाध्याय यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
याशिवाय या स्फोटातल्या जखमींची संख्या 101 नसून 95 आहे. काही मेडिकल सर्टिफिकेटमध्ये हेराफेरी केली होती, असंही कोर्टाने या निकालाच्या सुनावणीवेळी म्हटलं आहे.
निकालात कोर्टाने काय म्हटलं?
एनआयए विशेष कोर्टाने या निकालात आरोपपत्र दाखल करतेवेळी आणि तपासावेळी तपास यंत्रणेने ठेवलेल्या अनेक त्रूटी स्पष्ट केल्या. कोर्टाने सांगितलं की, या घटनेत यूएपीए (UAPA) लागू करता येणार नाही कारण त्यासाठी विशेष परवानगी घेतली जाते. ती त्यावेळी घेतली नव्हती. श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या घरीच हे बॉम्ब बनवलेले होते याविषयी पुरेसे पुरावे मिळाले नाहीत. बॉम्ब हल्ल्याच्या घटनास्थळी पंचनामा करताना तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळांचं कोणताही नकाशा, चित्र तयार केलं नाही. घटनास्थळावरुन बोटांचे, हातांचे ठसे, काही पुरावे, बॉम्ब असतील तर त्याचे शिल्लक अवशेष अशा कोणत्याच गोष्टी गोळा केल्या नाहीत. जे पुरावे होते तेही संशयास्पद होते. बॉम्ब हल्ल्यात वापरल्या गेलेल्या गाडीचा चेसिस नंबर ही अस्पष्ट होता. तसेच संबंधित गाडी ही हल्ल्यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडे होती हेही सिद्ध करु शकले नाहीत. त्यामुळे हे सगळे पुरावे दोषपूर्ण असल्यामुळे कोर्ट या आरोपींना दोषी मानू शकत नाही.
विशेष एनआयए कोर्टात न्यायमूर्ती ए.के.लाहोटी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती.
17 वर्षापूर्वीचा खटला निकाली लागला
2008 साली महाराष्ट्रातल्या मालेगाव इथे हा बॉम्ब हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द वा या संकल्पनेचा राजकारणात वापर केला जाऊ लागला. त्यामुळे दहशतवादाला कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.
या बॉम्बहल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 100 हून अधिक जखमी असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, कोर्टाने केवळ 95 जणंच या हल्ल्यात जखमी झाल्याचं म्हटलं आहे. या घटनेला तब्बल 17 वर्ष झाल्यानंतर हा निकाल सुनावला आहे. या हल्ल्यात भाजपा नेत्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाह पुरोहीतसह सात जण आरोपी होते. या आरोपींवर यूएपीए (बेकायदेशीर कृत्य ) कायद्याअंतर्गत खटला दाखल केला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी आता सातही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.