व्हाईट हाउसमध्ये द्विपक्षीय चर्चेच्या वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झडलेल्या शाब्दिक चकमकीनंतर रशियासोबत गेल्या तीन वर्षापासून प्राणप्रणाने लढत असलेले झेलेन्स्की पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून रशिया-युक्रेनचे युध्द काही तासात संपवू अशा वल्गना त्यांनी केल्या. ट्रम्प यांचा पुतीन यांच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर आहे. तो त्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवतो. व्हाईट हाऊसमधील बैठकीत युक्रेनमधील खनिज संदर्भातील करारावर स्वाक्षरी होणे अपेक्षित होते. मात्र बैठकीत ट्रम्प, झेलेन्स्की व अमेरिकेचे उपराष्ट्रपती जी.डी.वान्स यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक झाली. अमेरिकेच्या लष्करी व आर्थिक मदतीवर युक्रेन युध्दात टिकला आहे. अन्यथा युद्ध दोन आठवड्यातच संपले असते. तूम्ही तिसऱ्या महायुध्दाचा भडका उडवू पाहता आहे अशा प्रकारची टिप्पणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यावर वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त करत, एकदिवस रशियाकडून अमेरिकेला धोका असेल असे सुनावले. यावरुन दोघात वाद झाला, झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून तडका फडकी बाहेर पडावे लागले. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्षांनी लावला आहे. मात्र या घटनेनंतर संपुर्ण युरोपीयन संघाने युक्रेनला पाठिंबा दिल्याचे जाहिर केले.
युक्रेन – रशिया युद्धानंतर झेलेन्स्कीचे नाव प्रकर्षाने पुढे आले
2022 मध्ये युक्रेन – रशिया युद्ध सुरू झाले. रशियाने पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून युक्रेनवर हल्ला चढवला. त्यानंतर सुरू झालेल्या या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. रशियाच्या ताकतीपुढे युक्रेन टिकाऊ धरणार नाही. असा सर्वांचा समज होता. मात्र तो समज फोल ठरला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या कणखर नेतृत्वामुळे रशियाचे नेतृत्व सुद्धा हतबल झाल्याचे चित्र निर्माण झालं. म्हणून अजूनही रशियाला पूर्णता युक्रेनवर ताबा मिळवता आला नाही. वोलोदिमीर झेलेन्स्की या कणखर नेतृत्वाची नेमकी वाटचाल कशी आहे. हे आपण जाणून घेऊया.
वोलोदिमीर झेलेन्स्की
वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा जन्म यहूदी धर्मात झाला. 25 जानेवारी 1978 ला युक्रेन मध्ये त्यांचा जन्म झाला झेलेन्स्की यांचे वडील अलेक्झांडर झेलेन्स्की हे व्यवसायाने प्रोफेसर होते आणि आई रायमा या इंजिनियर होत्या. घरातच शैक्षणिक वातावरण असल्याने वोलोदिमीर यांना शैक्षणिक बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉ ची डिग्री मिळवून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
एका कॉमेडियनचा राष्ट्राध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास
वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा शैक्षणिक जीवनापासूनच कॉमेडी करण्याकडे कल होता. याच दरम्यान त्यांनी 1997 मध्ये काही कलाकारांना एकत्र घेत एक कॉमेडीचा ग्रुप तयार केला. त्याचं नाव क्वार्टल 95 असं ठेवण्यात आलं. हा कलाकारांना एकत्र करत ग्रुप बनवल्यानंतर वोलोदिमीर आणि त्यांच्या ग्रुपला चांगलीच पसंती मिळाली. यानंतर याचाच परिणाम 2003 नंतर वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी वेगवेगळ्या कॉमेडी कार्यक्रमांना सुरुवात केली. आणि हे काम करत असतानाच त्यांना एक दिवस राजकारणामध्ये पाऊल ठेवण्याची इच्छा निर्माण झाली.
कॉमेडीचे कार्यक्रम करता करता राजकारणात प्रवेश आणि युक्रेनच्या अध्यक्षपदापर्यंत झेप
वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शैक्षणिक आयुष्यापासून सुरू केलेला प्रवास राजकारणाच्या पटलावर येऊन स्थिरावला वोलोदिमीर झेलेन्स्कीना कॉमेडी क्षेत्रात मिळालेल्या यशानंतर राजकारणात ही लोकांची पसंती मिळाली. वोलोदिमीर यांनी सर्वेंट ऑफ द पीपल पार्टीची स्थापना केली. आणि या पार्टीच्या स्थापनेनंतर याच पार्टी मधून त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत 73.2 टक्के मते मिळवून वोलोदिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा वोलोदिमीर यांनी पराभव केला. याच पोरोशेन्को यांनी निवडणुकी दरम्यान वोलोदिमीर राजकारणात नवीन असल्याचे टिकास्त्र केले होते. पण त्यांच्या या वक्तव्याचा युक्रेनच्या नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नाही आणि याच निवडणुकीत 20 मे 2019 ला युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून वोलोदिमीर झेलेन्स्की विराजमान झाले.