दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेखा गुप्ता त्यांच्या नवी दिल्लीतील सिव्हिल लाईन्स भागातील शासकीय निवासस्थानी जनसुनवाई घेत असताना एक व्यक्ती काही कागदपत्र देण्याकरता त्यांच्याजवळ आली आणि तिनं हल्ला केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना साप्ताहिक ‘जन सुनवाई’ कार्यक्रमादरम्यान घडली. या सुनवाई दरम्यान 30 वर्षांच्या एका व्यक्तीने प्रवेश केला, कथितरित्या मुख्यमंत्र्यांना एक कागद दिला, ओरडला, त्यांच्या थोबाडीत मारली, त्यांचे केस ओढले आणि त्यांना शिवीगाळ केली.
गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीची ओळख पटली आहे. राजेश भाई खिमजी भाई सकारिया असे नाव असलेल्या या व्यक्तीचे वय 41वर्षीय आहे. त्याने मुख्यमंत्र्यांशी शारीरिक बाचाबाची केल्याचेही समजते.
नंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था असताना हा हल्ला झालाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रांनी सांगितले की, आरोपीच्या ताब्यात न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने आयएएनएसने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांवर एक जड वस्तू फेकण्यात आली. यामुळे त्या जमिनीवर पडल्या. तथापि, याबाबत दिल्ली पोलिसांचे अधिकृत निवेदन अजून आलेलं नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज जन तक्रार सुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू आहे.”
दिल्ली पोलिसांचे एक पथक मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानीही पोहोचले.
सूत्रांनी सांगितले की, भाजपने दावा केला आहे की मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत झाली असावी.
पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, रेखा गुप्ता यांच्यावर सुमारे 35 वर्षांच्या एका व्यक्तीने ‘हल्ला’ केला. या व्यक्तीने प्रथम त्यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला.
पत्रकारांशी बोलताना दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, “जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्याकडे जाऊन काही कागदपत्रे सादर केली आणि अचानक त्यांचा हात धरला आणि त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत किरकोळ धक्काबुक्की झाली, ज्यामध्ये टेबलाच्या कडेला किंचित दुखापत झाली.”
ते पुढे म्हणाले, “पोलिस संबंधित व्यक्तीची ओळख तपासत आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना निश्चितच काहीसा धक्का बसला आहे, ज्यामुळे थोडी चिंता निर्माण झाली आहे. मी नुकतीच त्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना दगड किंवा थापड मारण्यात आली नाही.”