जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या उपस्थितीत कोयनानगरमध्ये रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या नियोजना संदर्भात बैठकीचे सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी माण- खटाव तालुक्यातील राजेवाडी तलाव आणि जिहे – कटापुरच्या पाण्यावरून भाजपच्याच आमदार आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी जाधव यांनी केलेल्या राजेवाडी तलावातील पाणी निसर्गाच्या मुद्द्यावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चांगलेच भडकले.
जिहे- कटापूरचे पाणी उचलताना कराड उत्तर मतदार संघात खालच्या भागाला पाणी मिळावे, अशी मागणी आमदार मनोज घोरपडे यांनी केली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे आणि मनोज घोरपडे यांच्यात तू – तू मैं -मैं पाहायला मिळाली. यावेळी या दोघातील तू -तू, मैं -मैं समोरच्या लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरे यांच्या समोरील माइक बंद केला.
याच बैठकीत विटा- खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी सांगली जिल्ह्याला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याचे सांगत राजेवाडी तलावास टेल टँन्क म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. या मागणीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तिथेच विरोध केला.
माण खटाव या दुष्काळ तालुक्याला जिहे- कटापूर, कण्हेर, धोम, बलकवडी योजनेतून पाणी देण्यावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि अजित दादांचे मंत्री मकरंद पाटील यांच्यात आमचं पाणी आम्हालाच राहिले पाहिजे, अशी भूमिका दिसल्याने या प्रश्नावर योग्य तोडगा निघणार का अशी सुद्धा जिल्ह्यात चर्चा सुरू झालीय.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणांची संख्या आहे. आणि यातच जिल्ह्यातीलच लोकप्रतिनिधींमध्ये कोणाला किती पाणी मिळावं यावरून मतभेद असल्याचं या बैठकीमध्ये दिसून आलं. सोबतच प्रशासकीय अधिकारी देखील पाणी वाटपाचे योग्य नियोजन करत नसल्याचे ही उघड झालं. त्यामुळे अद्याप कडक उन्हाळा सुरू होण्यास वेळ असला तरी जिल्ह्यातील रहिवाशांचे या अनियमिततेमुळे हाल तर होणार नाहीत ना असा प्रश्न या सर्व घडामोडी नंतर उपस्थित होतोय.