आतापर्यंत पॅकबंद असलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर त्यातील घटकांची सविस्तर माहिती देणं बंधनकारक आहे. पण आता समोसा, जिलेबी यासारख्या पदार्थांवरही त्यात किती साखर आणि तेल वापरलं आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात सर्व केंद्रीय संस्थांना सूचना दिल्या आहेत.
बर्गर, पिझ्झा यासारखंच समोसा, जिलेबी हे पदार्थही जंक फूड आहेत. त्यामुळे तंबाखू, सिगारेट वा अन्य जंक फूड पदार्थामुळे जितका आपल्या आरोग्याला धोका आहे, तितकाच धोका याही पदार्थांपासून आहे हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचं हे पहिलं पाऊल आहे असं म्हटलं जातं. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनंतर सर्व केंद्रीय संस्थामधील कॅटीनमध्ये सुट्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या समोसा, जिलेबी अशा अन्य पदार्थांतील घटक आणि त्यांची माहिती एका फळ्यावर दिली जाणार आहे. जेणेकरुन, ग्राहकांना आपण एक समोसा वा जिलेबीमधून किती साखर आणि तेल खाल्लं याची पूर्ण माहिती मिळेल.
तंबाखू एवढंच जंक फूड धोक्याचं
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार आता सर्व कॅटिन्समध्ये सूचना फलक लावले जाणार आहेत. हे फलक फक्त समोसा आणि जिलेबी याच दोन पदार्थांची माहिती देणार नाहीत, तर वडापाव, भजी, लाडू या पदार्थांतील घटकांची माहितीही पुरवली जाणार आहे, अशी माहिती एम्स (AIIMS) नागपूर इथल्या अधिकाऱ्यांनी दिली.
समोसा, जिलेबी, वडापाव, भजी, लाडू हे पदार्थ तंबाखू इतकेचं धोकादायक आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या सूचना फक्त सुरुवात आहे. यापुढे अशा अनेक पदार्थांची तपासणी करुन त्यातील घटक लोकांसमोर उघड करणं बंधनकारक असेल. लोकांना ते नेमकं काय खात आहे, त्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत आहे याची माहिती मिळाली पाहिजे, अशी माहिती कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे नागपूरचे अध्यक्ष डॉ. अमर आमले यांनी दिली.
लठ्ठपणा हे देशासमोरचं नवीन संकट
देशामध्ये लठ्ठपणा रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लठ्ठपणा विरोधात जनजागृतीसाठी मोहीम सुरु करत असल्याचं जाहीर केलं आहे. 2050 पर्यंत भारतात 44.9 कोटी नागरिक हे लठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2050 साली लठ्ठपणामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत असू शकतो. शहरांमध्ये दर पाच व्यक्तीपैकी एक व्यक्ती हा अती लठ्ठ असतो. लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचा आजार होऊ लागला आहे.
बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जंक फूड, तेलकट, गोड पदार्थांचं अतीसेवन अशा अनेक कारणांमुळे लठ्ठपणाचा आजार बळावत आहे.
खाण्यास बंदी नाही पण जनजागृती करणार
समोसा, वडापाव, भजी, लाडू हे सगळे भारतीय अन्नपदार्थ आहेत. त्यामुळे ते खाण्यावर बंदी घातली जाणार नाही. शेवटी कोणी काय खायचं हे दुसरं कोणी ठरवू शकत नाही. मात्र, आपण जे खातोय ते आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही, ते अतिप्रमाणात खाल्लं तर तब्येतीवर काय परिणाम होतील याविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. कारण मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हार्मोन्स संबंधित अनेक आजार हे चुकीच्या अन्नपदार्थांच्या सवयींमुळे होतात. त्यामुळे या सगळ्या अन्नपदार्थातील घटकांची माहिती नागरिकांना देऊन त्यांना सावध करण्यासाठी सरकारने या सूचना दिलेल्या आहेत.