केंद्रीय शिक्षण मंडळाने इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थांना नापास झाल्यावरही पुढील वर्गात ढकलण्याचं धोरण रद्द केलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. जर ते दुसऱ्यांदा देखील नापास झाले, तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही.विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत पास होणं बंधनकारक असेल
केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सैनिक शाळांसह केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या 3000 हून अधिक शाळांना हा नियम लागू होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंत्रालयाच्या मते शालेय शिक्षण हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे राज्ये याबाबत स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. यापूर्वीच, दिल्लीसह 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी ‘नो-डिटेंशन’ धोरण रद्द केलं आहे.
मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी पाचवी किंवा आठवीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलण्याचा निर्णय आधीच घेतला आहे
‘नो-डिटेंशन’ पॉलिसीमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी घसरत होती. विद्यार्थी नापास होण्याची भीती न बाळगता बेफिकीर झाले होते. यामुळे त्याचा शैक्षणिक प्रगतीवर विपरित परिणाम होऊ लागला. शिक्षणतज्ज्ञांनी यावर आपला विरोध व्यक्त केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव कमी झाली होती.
नवीन निर्णयाचा काय परिणाम होईल?
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढेल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारेल, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार म्हणाले. शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी घेतला आहे.
काय आहे नवीन अधिसूचना ?
इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश देण्यात येईल. पण, पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षा मूल्यमापन याची कार्यपध्दती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद निश्चित करेल.
जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही, तर अश्या विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी शिक्षकांकडून अधिकचे मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा घेतली जाईल.
जर विद्यार्थी ह्या परीक्षेतही नापास झाले तर पाचवी किंवा आठवीच्या वर्गात अश्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाईल.
प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही