देशातल्या काही भागात पुढचे पाच दिवस सतत पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी सांगितलं की, दक्षिण भारतातल्या तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे.
मध्य भारतातल्या सुद्धा काही राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशाच्या वायव्य भागात म्हणजेच पंजाब, हरयाणामध्ये वादळी वारे, वीजा आणि गडगडाटासह पुढचे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतातही वातावरण बदलण्याची शक्यता
पूर्व भारतात खासकरून आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात हवामान गरम आणि दमट असणार आहे. पण दिल्लीत राहणाऱ्या लोकांना मात्र उष्णतेपासून थोडा आराम मिळू शकतो.
अखिल श्रीवास्तव यांनी सांगितलं की, आज म्हणजे शनिवार आणि उद्या रविवारी संध्याकाळी दिल्लीत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान 37 ते 39 अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते. हवामानातील हा बदल उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे झाला आहे.
मुरादाबादमध्ये उन्हाळी आजारांमध्ये वाढ
या दरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात वाढत्या तापमानामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वरिष्ठ डॉक्टर वी. सिंह यांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल होणारे बहुतेक लहान मुले ही टायफॉइड, ताप, जुलाब, सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांनी त्रस्त आहेत.
डॉ. सिंह म्हणाले की, उन्हाळा तीव्र झाला आहे आणि या काळात लहान मुलं लगेच आजारी पडतात. त्यांनी लोकांना बाहेरचे अन्न न खाण्याचा सल्ला दिला आहे. ते पुढे म्हणाले की, बाहेरच्या अन्नात भेसळ होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे बाहेरचं अन्न टाळलेले बरं. काही लोक अन्नात आरोग्यासाठी चांगल्या नसणाऱ्या गोष्टी मिसळतात. सध्या रुग्णालयात जवळपास 200 रुग्ण येत आहेत आणि त्यापैकी 25-30 लहान मुले आहेत. उष्णतेमुळे उलट्या-जुलाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. पण परिस्थिती आता नियंत्रणात आहे.