भारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी 6 डिसेंबरला लाखोच्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होतात. या निमित्ताने राज्य सरकारकडून मुंबईतल्या केंद्र व राज्य सरकारी आस्थापना, बँका आणि शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
चैत्यभूमीवरील व्यवस्था
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुमारे दहा लाख भाविक चैत्यभूमीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार राज्य सरकारतर्फे आणि विविध स्वयंसेवी संस्थांकडून विविध सेवा पुरवल्या जातात.
या सर्व अनुयायांसाठी चैत्यभूमीवर भोजन, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष व चोख सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली आहे. भिख्यू संघांतील भिक्षुकांसाठी सुद्धा निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.
महापरिनिर्वाण दिनापूर्वीच चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अन्नदानसेवा, मोबाईल चार्जिंग, न्हाणीघरं अशा अत्यावश्यक सुविधा ही देण्यात आल्या आहेत.
पुस्तक साहित्य आणि अन्य साहित्यांच्या विक्रीसाठी 550 स्टॉल्सची व्यवस्था केली आहे. महिला आणि बालकांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे.
दादर स्थानकाच्या पश्चिम बाजूस, पालिकेचा एफ उत्तर विभाग, चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान तसेच दादर स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण आणि माहिती कक्षाची व्यवस्था केली आहे.
12 विशेष लोकलसेवा
या निमित्ताने मध्य रेल्वेकडून गुरुवारी मध्यरात्रीपासून परळ-कल्याण आणि कुर्ला – पनवेल स्थानकांदरम्यान 12 विशेष धीम्या लोकल चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेप्रमाणे हार्बर रेल्वेमार्गावरही विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे.
लाईव्ह प्रक्षेपण
चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, आणि यूट्युबवरही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.