महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याचं औचित्त्य साधून मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जगांरे पाटील यांनीही आज दसरा मेळावा घेतला. बीडमधील नारायणगडावर लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना एकजुटीने राहत न्याय्य-हक्कांसाठी लढण्याचं आवाहन केलं आहे.
उलथापालथ करावीच लागणार
महाराष्ट्रात मागच्या वेळी एक लाट आली आणि उठाव झाला. पण आत्ता मात्र आपल्याला उलथापालथ करावीच लागणार. आपल्या मागण्या मान्य केल्या जाणार नसतील, आपल्या नाकावर टिचून जर सत्ताधारी निर्णय घेणार असतील तर आपल्याला उलथापालथ करावीच लागणार. समाजाच्या आरक्षणासाठी, समाजाच्या भविष्यासाठी आपल्या लेकरांबाळांसाठी आपल्याला लढावं लागणार आहे. आपला समाज आणि आपला शेतकरी आपल्याला महत्त्वाचा आहे.
अन्यायाविरोधात उठाव करा
आपल्या हिंदू धर्माने आपल्याला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं आहे. त्यामुळे आज तुमच्यावर जो अन्याय होत आहे, त्याविरोधात तुम्ही लढलं पाहिजे. आपल्या लेकरांना, पुढच्या पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी आज आपण झटत आहोत. गेल्या 14 महिन्यापासून आपण आरक्षणसाठी झुंज देत आहोत. पण आपल्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. आपण क्षत्रिय मराठे आहोत आणि क्षत्रिय कधी गप्प बसत नाहीत.
नारायणगडाची शिकवण आपण पाळणार
आपला हा समाज एकनिष्ठ आहे. एकदा साथ द्यायची म्हणलं तर पूर्णपणे साथ देतो. मग काहीही झालं तरी मागे हटत नाही. आज मी मर्यादा पाळून बोलणार. आज मी हिंदू धर्म आणि नारायणगडाची शिकवण पाळणार. आपल्या धर्मानुसार एकमेकांना समजून घेण्याची संस्कृती आज पाळणार.