पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या मेहूल चोक्सीचं प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्याचंच लक्ष लागलेलं आहे. बेल्जियम सरकारने लवकरात लवकर चोक्सी यांना भारत सरकारकडे सुपूर्त करावं यासाठी विशेष प्रयत्न केले आत आहेत. या अंतर्गतच भारत सरकारने मेहूल चोक्सी यांना देशातल्या कोणत्या तुरूंगात आणि कशापद्धतीने ठेवलं जाणार आहे याची माहिती देणार पत्र पाठवलेलं आहे. जाणून घेऊयात या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.
पीएनबी घोटाळा
व्यावसायिक मेहूल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकमध्ये 12 हजार कोटी रुपयाचा घोटाळा करुन बेल्जियममध्ये पलायन केलं. त्यानंतर बेल्जियममधल्या एंटवर्पमध्ये त्यांना अटक केली. तेव्हापासून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
भारत सरकारचे पत्र
या प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी भारत सरकारने बेल्जियम सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात नमूद केलं आहे की, मेहूल चोक्सी यांना मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये मानवाधिकारनुसार ठरवून दिलेल्या नियमांनी ठेवलं जाणार आहे. यामध्ये चोक्सी यांना तुरूंगात कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील याची ही स्पष्टता दिलेली आहे. चोक्सी यांना खरंच अशा सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत का हा एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आर्थर रोड जेलमधल्या बॅरक नंबर 12 मध्ये मेहूल चोक्सी यांना ठेवलं जाणार आहे. त्यांना जेलमध्ये चटई, उशी, चादर आणि कांबळ दिली जाणार आहे. जर आरोग्याच्या दृष्टिने गरज भासली तर लाकडाचा किंवा लोखंडाचा पलंग दिला जाईल. मेहूल चोक्सी यांना कॅन्सरच्या आजाराचं निदान झालं आहे त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं त्यांच्या वकिलांचं मत आहे.
तुरुंगामध्ये चोक्सी यांना कोणत्या सुविधा मिळणार?
भारत सरकारने आपल्या पत्रात म्हटल्यानुसार, चोक्सी यांना तुरुंगामध्ये स्वच्छ पाणी, 24 तास मेडिकल सुविधा उपलब्ध असतील, चांगलं पौष्टिक जेवण दिलं जाईल. तुरूंगात आणि त्यांच्या बॅरेकमध्ये दररोज स्वच्छता केली जाईल. पुरेसा सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा त्यांना मिळेल यांची खात्री करु.
दररोज एक तासाहून अधिक वेळ त्यांना बॅरकच्या बाहेर, तुरूंगाच्या परिसरात फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि मनोरंजनासाठी दिला जाईल. मुंबई शहराचं वातावरण हे खूप सामान्य असतं त्यामुळे त्यांच्या बॅरकमध्ये हिटर किंवा एसीची आवश्यकता नाही.
चोक्सी यांच्या तब्येतीचं कारण लक्षात घेता त्यांना दिवसातून तीन वेळा जेवण दिलं जाईल. आजारपणामुळे त्यांना विशेष डाएट द्यायचं असेल तर त्यांची ही सुविधा केली जाईल. तसेत तुरूंगामध्ये कॅन्टीन आहे, तिथून ते फळं आणि इतर पदार्थ खरेदी करु शकतात.
तुरूंगामध्ये त्यांना योग, ध्यानसाधना, लायब्ररी आणि बोर्ड गेम्ससारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध करु दिल्या जातील, असं त्या पत्रात म्हटलं आहे.