महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे, ज्यात एका वेब सिरीजमधील कलाकाराचाही समावेश आहे.
या लोकांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून एजंट्सनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला होता. मोठ्या पगाराचे स्वप्न दाखवून त्यांचे विमान तिकीट आणि व्हिसाची व्यवस्थाही केली गेली. मात्र, थायलंडला पोहोचल्यावर या लोकांचे फोटो पाहून एजंट्सच्या लोकांनी त्यांना ओळखलं आणि 7 ते 8 तास प्रवास करून गाडीतून त्यांना थायलंड-म्यानमार सीमेवर नेण्यात आले. त्यानंतर नदी पार करून त्यांना म्यानमारमधील एका बंद जागेवर डांबण्यात आलं. तिथे त्यांना बनावट कंपन्यांशी एका वर्षाचा करार करण्यास भाग पाडले. या लोकांना भरती करणाऱ्या एजंट्सना एका व्यक्तीमागे जवळपास 1000 अमेरिकन डॉलर्स मिळत होते.
या ठिकाणी अडकलेल्या लोकांना सायबर फ्रॉड करायला लावला जात होता. यामध्ये डिजिटल अटक आणि बनावट गुंतवणुकीच्या योजनांद्वारे लोकांना फसवण्याचे काम हे लोक करत होते. हे काम वेगवेगळ्या स्तरांवर विभागलेले गेले होते. कनिष्ठ स्तरावर महिला बनून लोकांना फसवण्याचं काम दिलं जायचं तर मधल्या स्तरावर पोलीस किंवा कस्टम अधिकारी बनून धमकवण्याचं काम करायचे.
या लोकांची सुटका केल्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने कसून चौकशी केली.आणि यात काही एजंट तसंच बनावट कंपन्या सामील असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मनीष ग्रे/मॅडी , तैसान/आदित्य रवी चंद्रन , रूपनारायण रामधार गुप्ता , तलानिती नुलक्सी आणि जेन्सी राणी डी यांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये मनीष ग्रे/मॅडी हा मुख्य आरोपी असून तो एक वेब सिरीजमधील अभिनेता आहे. लोकांना थायलंडमध्ये चांगल्या नोकरीचे खोटे आमिष दाखवून म्यानमारमध्ये पाठवण्याचं काम मनीष करायचा. तो भारत, म्यानमार, थायलंड आणि मलेशियातून या फसवणुकीचे जाळे चालवत होता. याशिवाय, तलानिती नुलक्सी हा भारतात सायबर गुन्हेगारीचं एक युनिट सुरू करण्याच्या तयारीत होता.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, म्यानमारमधून सोडवलेल्या लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत. महाराष्ट्र सायबर या गुन्हेगारी साखळीतील प्रत्येक व्यक्तीला शोधून काढून त्यांना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
हे ही वाचा : सायबर क्राईम कॅम्पमध्ये अडकले 2 हजार भारतीय
नागरिकांसाठी सूचना
महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही संशयास्पद नोकरीच्या ऑफरवर विश्वास ठेवू नका. विशेषत: जास्त पगाराचे आमिष दाखवणाऱ्या किंवा परदेशात नोकरी देणाऱ्या अज्ञात मार्गांनी येणाऱ्या ऑफर्सची व्यवस्थित खात्री करा. कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा.