दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ‘सिंदूर उड्डाणपूल’ ज्याला पूर्वी ‘कर्नाक पूल’ म्हणून ओळखले जात होते. या उड्डाणपुलाचे उद्या, गुरुवार, 10 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुंबईकरांसाठी ही खरच एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे, कारण गेल्या दहा वर्षांपासून या भागातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते.
या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, आणि विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच, राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, आमदार श्री. सुनील शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह, तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुलाचं महत्त्व आणि जुना इतिहास
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेला आणि पी. डि मेलो मार्गाला जोडणारा हा सिंदूर उड्डाणपूल दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग यांसारख्या वर्दळीच्या परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल महत्वाचा असणार आहे.
जवळपास 150 वर्ष जुना असलेला कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं होतं. त्यानंतर, मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये हा पूल पाडला. आणि मशीद बंदर परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा मार्ग कायम राहावा यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसारच या सिंदूर पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये हे काम यशस्वीपणे पूर्ण पूर्ण केलं आहे.
या पुलाची एकूण लांबी 328 मीटर आहे, तर रेल्वेच्या हद्दीतील लांबी 70 मीटर आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याची (Approach Road) एकूण लांबी 230 मीटर असून, पूर्वेकडे 130 मीटर आणि पश्चिमेकडे 100 मीटर इतकी आहे.
रेल्वे मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी आरसीसी (Reinforced Cement Concrete) आधारस्तंभांवर (Pier) प्रत्येकी 550 मेट्रिक टन वजनाच्या दोन मोठ्या लोखंडी तुळया (Girder) बसवण्यात आल्या आहेत. या तुळया 70 मीटर लांब, 26.50 मीटर रुंद आणि 10.8 मीटर उंच आहेत.
या प्रकल्प अंतर्गत 550 मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई 19 ऑक्टोबर 2024 रोजी आणि उत्तर बाजूची लोखंडी तुळई 26 आणि 30 जानेवारी 2025 रोजी रेल्वेच्या हद्दीत यशस्वीपणे सरकवण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे वाहतूक आणि वीज पुरवठा थांबवून विशेष ब्लॉक घेऊन हे काम सुरक्षितपणे पार पाडण्यास मदत केली.
550 मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी तुळईची जुळवणी जमिनीपासून 8 ते 9 मीटर उंचीवर पूर्ण करून, ती रेल्वे भागावर 58 मीटर अधांतरी सरकवणे, सुमारे २ मीटर उंचीवरून खाली उतरवणे आणि आरसीसी आधारस्तंभांवर बसवणे, हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे काम होते. यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. पूर्वेकडील पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंतचं संपूर्ण काम अवघ्या 4 महिन्यात पूर्ण करण्यात आलं आहे.
सुरक्षिततेची खात्री
महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने सिंदूर पुलाची उभारणी, स्थापत्य कामं आणि इतर संबंधित कामं पूर्ण झाली आहेत. पुलाची भारक्षमता , स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी (Load Test) घेण्यात आली आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते, मार्गिकेवरील कॉंक्रिट, डांबरीकरण, अपघातरोधक अडथळा, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी यांसारखी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. पुलाच्या संरचनात्मक स्थिरतेचं प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र, तसेच पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचं ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) महानगरपालिकेला मिळालं आहे. म्हणजेच, आता हा सिंदूर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
– मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव यांसारख्या व्यावसायिक भागांना रेल्वेमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरेल.
– पुलाच्या पुनर्बांधणीमुळे गेल्या 10 वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी एक सुलभ मार्ग उपलब्ध होईल.
– यामुळे पी. डि’ मेलो मार्ग, विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील (junction) वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
– युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्ग या मार्गांवरील वाहतूकही या पुलामुळे अधिक सुलभ होईल, ज्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल.
हा पूल सुरू झाल्याने दक्षिण मुंबईतील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.