जम्मू-काश्मिर इथल्या पहलगाम बैसरन इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत. तसंच एका भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल, आयबी अधिकारी आणि दोन परदेशी पर्यटकांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील मुंबईतील हेमंत जोशी, अतुल मोनी (डोबिंवली), संजय लाली (ठाणे), दिलीप देसाई (पनवेल), संतोष जगदाळे आणि कस्तुबा गणवोतय (पुणे) या पर्यटकांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. तर 17 पर्यटक हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान याठिकाणी आता पिंपरी – चिंचवड इथले सुमारे 32 पर्यटक अडकले आहेत.
मिनी स्वित्झर्लंडवर हल्ला
पहलगाममधलं बैसरण हे पर्यटन स्थळ मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी जवळपास या पर्यटन स्थळावर सुमारे हजार ते पंधराशे पर्यटक उपस्थित होते. सगळे पर्यटक आनंदाच्या भरात असतानाच दुपारी 2.30 च्या सुमारास अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करत एका क्षणात सगळं वातावरण बदलून टाकलं. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटकांना आपल्या सोबत्याचा मृत्यू पाहावा लागला. या हल्ल्याची बातमी पसरताच लष्कर – ए – तोयबाची एक शाखा रेझिस्टन फ्रंटने (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी AK-47 रायफलच्या 7.62 एमएम बुलेटच्या शेल्स घटनास्थळी आढळल्या.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती
दुपारी 2.30 च्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. बहुतांशी पर्यटक हे घोडेस्वारी करत असताना दोन ते तीन दहशतवाद्यांनी जंगलातून येत या संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आणि गोळीबाराला सुरुवात केली.
गुलझार अहमद या स्थानिक रहिवाश्यांनी आणि प्रत्क्षदर्शींनी सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ते तिथल्या स्टँडवर थांबले होते तेव्हा काही पर्यटक हे व्हॅलीच्या वरच्या बाजूला गेले होते. जवळपास 2.45 च्या सुमारास काही पर्यटक हे इकडे-तिकडे ओरडत धावत असलेले दिसले. त्यांना काय झालं विचारलं त्याचवेळी गोळीबाराचा आवाज येऊ लागला. त्यावेळी काहितरी भयानक घडत असल्याची जाणिव आम्हाला झाली. त्यानंतर, दोन – तीन तरुण हे फक्त पुरूषांना गोळ्या मारत असून स्त्रियांना सोडत असल्याचं पाहिलं.
पुण्यातील एका पर्यटकांने जे त्या घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी इंडिया टूडे चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म कोणता हे विचारुन गोळ्या मारल्या असल्याची माहिती दिली.
तर आणखीन एका महिला पर्यटकाने सांगितलं की, व्हॅलीच्या बाजुला असलेल्या दाट झाडीतून या दहशतवाद्यांनी येत गोळीबार करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही पुरुषांना पकडून त्यांना अझान ही प्रार्थना म्हणायला लावली. त्यांना म्हणता आली नाही म्हणून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि हिंदूमुळे आमचा धर्म धोक्यात आहे असं वक्तव्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यातून परतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबिया येथे दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. जेद्दाह येथे पोहोचल्यावर त्यांना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी हा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले आहेत.
सकाळी पंतप्रधानाच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहेत. या बैठकीत तिन्ही सैन्यदलाला सतर्क राहण्याचे आदेस दिले आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पाहणी
गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेत मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास श्रीनगर इथे पोहोचले. बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांनी नायब राज्यपालांसह बैसरण व्हॅलीची पाहणी केली.
नियोजनबद्ध हल्ला
गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी काही दिवसापूर्वीच या व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता. न्यूज 18च्या बातमीनुसार या दहशतवाद्यांनी पूंच सेक्टरमधून सात तासाचा रस्तेमार्गे प्रवास करुन या व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता. लष्कर – ए – तोयबाचे उपप्रमुख आणि हाईज सईदचा जवळचा सहकारी सैफुल्लाह कसुरी हा या हल्ल्यामागचा सूत्रधार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शोधमोहिम सुरू
या हल्ल्यानंतर लागलीच शोधमोहिम सुरू करण्यात आली. न्यूज 18च्या बातमीनुसार, जवळपास 4-6 दहशतवादी या परिसरात लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच या शोधमोहिमेवेळी एका संशयीत दहशतवाद्याचा फोटो समोर आलेला आहे. घटनास्थळावर काढलेल्या एका व्हिडीओमधून एक कुर्ता घातलेला आणि हातात एके-47 रायफल असलेल्या इसम पाहायला मिळतो.
जागतिक नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध
अमेरिकेचे राष्ट्रिय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुती, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यानाहू, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी व्हॅन्स, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेत्यांसह परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.