पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 17 जानेवारी 2025 रोजी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. या एक्स्पोमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील आणि तंत्रज्ञानाशी संबंधित 100 पेक्षा अधिक नवीन प्रोजेक्ट लाँच होतील.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025, 17 ते 22 जानेवारी या दरम्यान होतं असून, यात मोबिलिटी क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्या एकत्र येणार आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल निर्माते, घटक उत्पादक, इलेक्ट्रॉनिक भाग, टायर उत्पादक, ऊर्जा संचय करणारे उत्पादक, विविध ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर्स कंपनी आणि साहित्य पुनर्नवीनीकरण करणाऱ्या अनेक कंपनी यामध्ये सहभागी होणार आहेत.
एक्स्पोचे मुख्य उद्दिष्ट हे “Beyond Boundaries: Co-creating Future Automotive Value Chain” या थीमवर आधारीत ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रातील सहकार्य आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे आहे. तसचं, नवीन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. हा एक्स्पो भारत मंडपम (नवी दिल्ली), यशोभूमी (द्वारका, दिल्ली) आणि इंडिया एक्स्पो सेंटर & मार्ट (ग्रेटर नोएडा) या तीन प्रमुख ठिकाणी आयोजित केला आहे.
दर दोन वर्षांनी होणारा ऑटो एक्स्पो आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोसोबत असणार आहे आणि एक दशकानंतर भारत मंडपम या ठिकाणी परत होईल. या आधी हा शो ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो सेंटर इथे होत होता.
हा एक्स्पो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ( Ministry of Commerce & Industry ) पाठिंब्याने आयोजित केला जात आहे. यामध्ये SIAM, ACMA, IESA, ATMA, ICEMA, नॅसकॉम, आणि CII यासारखी प्रमुख उद्योग संघटनांचा सहभाग आहे.
5100 आंतरराष्ट्रीय सहभागी
या एक्स्पोमध्ये 5100 आंतरराष्ट्रीय लोकं सहभागी होणार आहेत आणि 5 लाखांहून अधिक लोक एक्स्पोला भेट देण्याची अपेक्षा आहे.
नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे लाँचींग
भारत मंडपममध्ये इलेक्ट्रिक वाहनं प्रमुख आकर्षण ठरतील. यावेळी मारुती सुजुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV, e VITARA चे प्रदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे, Hyundai Motor India Ltd. 17 जानेवारीला Crtea EV लाँच करणार आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये, मर्सिडीज-बेंझ इलेक्ट्रिक EQS मायबॅच SUV लाँच करणार आहे, तर BMW आपल्या इलेक्ट्रिक BMW i7 चे प्रदर्शन करेल.
यशोभूमी येथे 18 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजीत प्रदर्शनात 7 देशांतील 1000 पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होणार आहेत. जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवान आणि यूके यांचे पॅव्हिलियन असतील. यामध्ये 60 पेक्षा जास्त नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान लाँच होण्याची शक्यता आहे.
भारत CE एक्स्पो 2025
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 च्या दरम्यान भारत कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट एक्स्पो (भारत CE एक्स्पो) 19 ते 22 जानेवारी दरम्यान इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडामध्ये होईल. यामध्ये कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात सहभागी होतील.