प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार 2025 मिळाला आहे. ISC-FICCI च्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘WASH (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) मधील सर्वोत्तम कौशल्य उपक्रम’ या श्रेणीत हा सन्मान मिळाला आहे.
या पुरस्कारामुळे प्रथम संस्थेच्या ‘जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रमा’ चे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या कार्यक्रमातून भारतातील पाणी, स्वच्छता आणि आरोग्य (WASH) या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तरुणांना प्लम्बिंगचे (नळ जोडणीचे) खास प्रशिक्षण दिलं जाते.
हा पुरस्कार पद्मभूषण डॉ. रघुनाथ ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिला. नवी दिल्ली इथे झालेल्या ‘इंडिया सॅनिटेशन कॉन्क्लेव्ह 2025’ या समारंभामध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी श्री. अशोक के. के. मीना (सचिव, पेयजल आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय), श्रीमती नैना लाल किडवई (अध्यक्षा, इंडिया सॅनिटेशन कोलिशन), श्रीमती ज्योती वीज (महासंचालक, FICCI) आणि GMR वरलक्ष्मी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पुरस्काराच्या सन्मानासोबत प्रथम संस्थेला अडीच लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
“हा पुरस्कार आमच्या प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक आणि सामुदायिक भागीदारांच्या मेहनतीची ओळख आहे. कौशल्य केवळ रोजगार देत नाही, तर *सन्मान, सशक्तीकरण आणि समुदायाचा शाश्वत विकास* करते. WASH च्या माध्यमातून भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या स्वप्नात योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया प्रथम संस्थेने व्यक्त केलं आहे.
युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रमाची माहिती
प्रथम संस्थेकडून सन 2017 साली युवा कौशल्य जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमधील हजारो तरुणांना प्लम्बिंग, जलव्यवस्थापन देखभाल आणि स्वच्छता प्रणाली व्यवस्थापनाशी संबंधित व्यावहारिक कौशल्य शिकवली जातात. हे प्रशिक्षण केंद्रांवर आणि समुदायाच्या स्तरावर कॅम्प लावून दिलं जाते. त्यामुळे दुर्गम भागातील तरुणांनाही सहजपणे या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेता येतो.
उपक्रमाचे सकारात्मक परिणाम
पाणी आणि स्वच्छता – गरजू आणि असुरक्षित समुदायांमध्ये केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठामध्ये सुरक्षित पाणी आणि स्वच्छता वाढली.
नोकरी-व्यवसाय – या कार्यक्रमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. अनेक प्रशिक्षित तरुण आता महानगरपालिका प्रकल्प, खासगी कंपन्या मध्ये नोकरी करत आहेत. तर काही तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
महिला सहभाग – प्लम्बिंग आणि स्वच्छता कामांमध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिलेलं आहे.
पर्यावरणपूरक – या उपक्रमात पाणी वाचवण्याचे विविध मार्ग आणि पर्यावरणाला मदत करणाऱ्या पद्धती शिकवल्या जातात. त्यामुळे पाण्याचा वापर केला जातो. त्याविषयीची जनजागृती ही प्रत्यक्ष कृतीतून केली जाते.
प्रथम संस्थेचा हा उपक्रम परवडणारी क्षमता, मोठ्या स्तरावर लागू करण्याची क्षमता, सर्वसमावेशकता आणि शाश्वत परिणाम साधणारा उपक्रम आहे अशा शब्दात फिक्की संस्थेने या उपक्रमांचं कौतुक केलं आहे.
2024-2025 या वर्षात या कार्यक्रमातून 1,700 हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. त्यापैकी सरासरी 85 टक्क्याहून अधिक प्रशिक्षणार्थीना रोजगार मिळाला आहे. हा कार्यक्रम कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक समता यांचा समन्वय साधणारे एक आदर्श मॉडेल आहे.