गिलान बार सिंड्रोममुळे पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण हा 40 वर्षांचा होता. दरम्यान, पुण्यात रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. यापैकी 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्रांकडून सात सदस्यीय तज्ज्ञांची टीम पुण्यामध्ये पाठवण्यात आली आहे.
श्वास घ्यायला त्रास, पॅरालिसीसचा झटका
गिलान बार सिंड्रोममुळे मृत झालेली व्यक्ती ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील होती. गेल्या काही वर्षांपासून ही व्यक्ती पुण्यात राहायला होती. काही कौटुंबिक कामानिमित्त हा तरुण सोलापूरला गेला होता. तिथेच त्याला सर्दी, खोकला झाला. हळूहळू त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्यामुळे लागलीच 18 जानेवारीला त्याला एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. सुरुवातीला त्याला आयसीयूमध्ये ठेवलेलं. त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाल्यावर त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. मात्र, थोड्या दिवसांनी पुन्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला पॅरालिसीसचा झटका आला. म्हणून त्याला आयसीयूमध्ये ठेवून उपचार सुरु केले. पण या उपचारा दरम्यान दिनांक 25 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, 40 वर्षीय मृत व्यक्तीचे सोलापूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं. मृत्यूचं नेमकं कारण समजावं यासाठी या रुग्णाची मेडिकल आणि क्लिनिकल अशा दोन्ही पद्धतीचे पोस्टमार्टम करण्यात आलं. या दोन्ही पोस्टमार्टमच्या अहवालानुसार रुग्णांचा मृत्यू हा गिलान बार सिंड्रोममुळे झाला आहे. अशी माहिती कॉलेजचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, पोस्टमार्टम अहवालाशिवाय, या रुग्णांच्या शरीरातील सेरेब्रोस्पायनल फ्लूड (पाणी) आणि रक्ताचे नमुने सुद्धा चाचणीसाठी पाठवली आहेत. या दोन्ही नमुन्याचे मायक्रोबायोलॉजीकल आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल 5-6 दिवसात आल्यावर रुग्णांचा मृत्यू जीबीएस मुळेच झाला आहे की नाही याला दुजोरा मिळेल.
हेही वाचा : गिलान बार सिंड्रोम (GBS) म्हणजे वाट चुकलेली इम्युनिटी
पुण्यात रुग्णांची वाढती संख्या
पुण्यामध्ये आतापर्यंत गिलान बार सिंड्रोमचे 101 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 68 रुग्ण हे पुरुष आहेत तर 33 रुग्ण या महिला आहेत. 19 रुग्ण हे वय वर्ष 9 च्या खालील आहेत. तर 23 रुग्ण हे वय वर्ष 50 ते 80 च्या दरम्यानचे आहेत. त्यापैकी 16 रुग्ण हे गंभीरावस्थेत असून त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड भागामध्ये सापडले आहेत. त्यामुळे रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून या भागावर लक्ष ठेवून आहे. या भागातल्या 25 हजार 578 घरांमधील लोकांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेकडून 15 हजार 761 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर चिंचवड पालिकेकडून 3 हजार 719 आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून 6 हजार 098 रुग्णांची तपासणी केली आहे.
पुणे पालिकेकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. उघड्यावरचे अन्नपदार्थ, थंड पदार्थ आणि बाहेरचं पाणी पिण्यास मनाई केली आहे. घरातलं गरम अन्न आणि उकळलेलं पाणी पिण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एक इंजेक्शन 20 हजार रुपयाचे
या आजारावरील उपचार खर्च महाग आहे. या आजारामध्ये रुग्णांना इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. खासगी हॉस्पीटलमध्ये या एका इंजेक्शनचा दर 20 हजार रुपये आहे. पुण्यात उपचार सुरु असलेल्या एका वृद्ध रुग्णाला अशी तब्बल 13 इंजेक्शन्स घ्यावी लागली.
उपचार पूर्ण झाल्यावर काही रुग्ण हे सहा महिन्यामध्ये पूर्ण बरे होऊन फिरू शकतात. तर काही रुग्णांना पूर्ण बरं होण्यासाठी एक वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
जीबीएस रुग्णावर मोफत उपचार
या आजारावरील उपचाराचा खर्च हा अवाजवी आहे. त्यामुळे या रुग्णावर मोफत उपचार करण्याची घोषण राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केली आहे. यासाठी विभागनिहाय हॉस्पीटल निश्चित करुन दिले आहे. पिंपरी – चिंचवडमधल्या रुग्णांसाठी वीसीएम हॉस्पीटलमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णांवर कमला नेहरु हॉस्पीटलमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांवर ससून हॉस्पीटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.