राज्यात पावसाचं आगमन झालं आहे. रविवार, दिनांक 25 मे च्या मध्यरात्रीपासून मुंबई आणि मुंबई उपनगरामधील बऱ्याच भागात धुव्वाधार पाऊस पडत आहे. कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार सोमवार दिनांक 26 मे सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई भागात 135 मिमी पाऊस पडल्याची नोंद केली आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे.
वाहतुकीवर परिणाम
रात्रभरापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची गती मंदावली आहे. रस्तेवाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तिन्ही मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनीटांनी उशीराने धावत आहेत.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यकता असेल तरच बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.
दरम्यान, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर, रायगड, बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
राज्यभरातली परिस्थिती
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील निरा डावा कालवा फुटला आहे. तसेच दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जिल्ह्यातील नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
तर पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे काही भागांमध्ये वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. तर काही मंदिरांना पाण्याचा वेढा आहे.
मे महिन्यात पावसाचं आगमन
मे महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचा महिना आणि जून महिन्यापासूनचे चार महिने पावसाळा असं ऋतूचक्र आहे. मात्र, यंदा देशभरातच पावसाने लवकर हजेरी लावली आहे. दक्षिणेतल्या किनाऱ्यावर पावसाचं आगमन झालं की, आठवडाभराच्या अंतरावर महाराष्ट्रात पावसाचं आगमन होतं. मात्र, यंदा सगळंच गणित बदललं आहे. तब्बल 16 वर्षांनंतर पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली आहे. केरळमध्ये यंदा 25 मे ला पावसाचं आगमन झालं तर, महाराष्ट्रात लगेच दुसऱ्या दिवसी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
गेल्या दशकभराच्या पावसाच्या आगमनाच्या तारखा पुढीलप्रमाणे :
साल |
केरळ |
महाराष्ट्र |
2011 |
29 मे | 04 जून |
2012 |
05 जून | 06 जून |
2013 |
01 जून |
04 जून |
2014 |
06 जून |
11 जून |
2015 |
05 जून |
08 जून |
2016 |
08 जून | 19 जून |
2017 | 30 मे |
10 जून |
2018 | 29 मे |
08 जून |
2019 | 08 जून |
20 जून |
2020 | 01 जून |
11 जून |
2021 |
03 जून |
05 जून |
2022 |
29 मे |
10 जून |
2023 | 08 जून |
11 जून |
2024 | 30 मे |
06 जून |
2025 | 24 मे |
25 मे |