महाराष्ट्रात थोरल्या पवारांचं राजकारण हे त्यांच्या घरातील व्यक्तींनाही कळत नाही. असं जाणकारांचे मत आहे. आणि ते खरं ही आहे. थोरले पवार म्हणजे शरद पवार हे कधी कोणता डाव खेळतील याचा नेम नाही. आणि याचा अंदाज अनेक राजकीय तज्ञांना सुद्धा लावता येत नाही. एवढेच काय त्यांच्यासोबत राजकीय कारकिर्दीत कायम सोबती राहिलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही त्यांचा डाव लक्षात येत नाही. यापूर्वीच्या राजकारणात थोरल्या पवारांचं चांगलंच महत्त्व होतं. आणि अजूनही तेच महत्त्व शरद पवारांनी आहे तसं अबाधित ठेवलं आहे. त्यामुळे शरद पवार कधी कोणता पत्ता खेळतील हे कोणालाही ओळखता येत नाही. असं असलं तरी मागील काही दिवसात राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर धाकल्या पवारांचेही वजन चांगलेच वाढले आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी फारकत घेऊन आपला राष्ट्रवादी पक्षाचा सवता सुभा मांडला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना राज्यातील जनतेने नाकारलं. त्यानंतर मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला. एकूणच काय थोरले पवार असतील किंवा धाकले पवार असतील महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपली पकड कायम ठेवण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यात दोघेही आपआपल्या परीने वाटचाल करत आहेत.
सातारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा जिल्हा हा पवार कुटुंबीयांवर प्रेम करणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि अशातच शरद पवारांना या जिल्ह्याने एक वेगळीच ताकद दिली. अनेक वर्ष सातारा जिल्ह्याने शरद पवारांची पाठराखण केली. त्याला मूळ कारणही तसेच आहे. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांच्या या मानसपुत्रावर सातारा जिल्ह्याने आणि विशेषतः कराडने प्रेम दाखवले. त्यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्हा ओळखला जायचा. राजकीय घडामोडीनंतर यामध्ये बदल होत गेले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची पिछेहाट करत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या जिल्ह्यात मुसंडी मारली. असं असलं तरी दोन्ही पवारांनी म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांनी सातारा जिल्ह्याकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आणि म्हणूनच दोन्ही पवारांनी सातारा जिल्ह्याचे अनेक वेळा दौरे सुद्धा केले आहेत. यामध्ये आता सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे विभागणी झाली आहे. जरी मूळ राष्ट्रवादी पक्षात फूट पडले असली तरी दोन्ही पवार अजूनही जिल्ह्यात आपल्या शिलेदारांना ताकद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाटचाल?
शरद पवार आणि अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. याचच उदाहरण म्हणून पहायचं झालं तर अजित पवार यांचा 19 एप्रिल रोजी कराड दौरा असून या दौऱ्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर 26 एप्रिल रोजी शरद पवार हे यशवंत नगरला सह्याद्री साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार करणार आहेत. म्हणजेच थोरले पवारही कराड दौऱ्यावर आहेत आणि धाकले पवारही कराड दौऱ्यावर आहेत. दोघांनी आपापल्या शिलेदारांना ताकद देऊन येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची चाचपणी करण्यासाठी हा खटाटोप असल्याचं राजकीय जाणकार सांगतायेत.
अजित पवारांनी कोणता पत्ता खेळला?
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आग्रही आहेत. राज्यात विविध भागात वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तशा सक्त सूचनासुद्धा त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची प्रतिमा मलीन झाली होती. मात्र बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे कोणतेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सोबतच चुकीच्या मार्गाने कोणीही वागू नये असाही दम दिला. यातून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठीची धडपड दिसून येते. कधीकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र कालांतराने तो शरद पवारांच्या पाठीमागे राहिला आणि पर्यायानं राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहिला. आता राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाल्यानंतर अजित पवार आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणूनच स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन जिल्ह्यातली आपली ताकत वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
ॲड. उदयसिंह पाटील अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याने काय होईल?
उदयसिंह पाटील स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र आहेत. विलासराव पाटील उंडाळकर यांचा सातारा जिल्ह्यात एक गट आहे. विशेषतः त्यांच्या रयत संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांची मोट बांधली गेलेली आहे आणि त्याच कार्यकर्त्याना सोबत घेऊन उदयसिंह पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला कार्यकर्त्यांची एक तयार फळी मिळणार आहे. आणि याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.
शरद पवार कोणता डाव टाकू शकतात?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. यामध्येच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुद्धा मोठा फटका बसला. तरीसुध्दा शरद पवारांनी हार न मानता राज्यात पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांची फळी बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोबतच जे शिलेदार आहेत. त्यांना ताकद देऊन अजूनही आपण मैदानातच आहोत असा संदेशही दिला. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजप नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलचा मोठा पराभव करून पुन्हा एकदा आम्हीही अजून रेसमध्येच आहोत याची चुणूक दाखवून दिली.
या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या शिलेदाराने पुन्हा एकदा मैदान मारलं अशा आशयाचे फलक आणि सोशल माध्यमावर चर्चा रंगली होती. आता शरद पवार याच निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यासाठी सह्याद्री साखर कारखाना स्थळावर येणार आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमातून शरद पवार पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आणि येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोट बांधण्याचा संदेशही देऊ शकतात.
जिल्ह्यातून निसटलेली कमान पुन्हा मिळवण्यासाठीची ही धडपड आहे?
शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील सातारा जिल्ह्यावर नेहमीच त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. या जिल्ह्याकडे विशेषता दोघांनीही लक्ष दिलेलं आहे. मात्र मागील काही निवडणुकांमध्ये या जिल्ह्यातून दोघांचीही पकड सैल झाल्याचे बोलले जाते. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या हातातून गेलेली कमान पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी हे दोन्ही पवार धडपडत असल्याची चर्चा सुद्धा राजकीय पटलावर रंगली आहे येणाऱ्या काळात या सर्व बाबींचा खुलासा हे दोन्ही दिग्गज जे निर्णय घेतील यावरूनच होईल असेही राजकीय जाणकार खाजगीत बोलत आहेत.