ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज पुणे इथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 87 वर्षाचे होते. वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. खगोलशास्त्रातील संशोधन आणि सर्वसामान्याना समजेल, त्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञानाला रंजक पद्धतीने मांडत त्यानी विज्ञानाचा प्रसार केला आहे.
बालपण आणि शिक्षण
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 साली कोल्हापूर इथे झाला. त्यांचे वडिल विष्णू नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. तर आई सुमती नारळीकर या संस्कृत अभ्यासक होत्या. डॉ. नारळीकर यांनी वाराणसी इथेच शिक्षण पूर्ण करत बनारस हिंदू विद्यापीठातून बी.एस्सी. विषयात पदवी घेतली. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणिताची ट्रायपास परीक्षा देत रँग्लर पदवी मिळवली. त्यानंतर पीएचडी आणि डी.एस्सी पदव्या पूर्ण केल्या.
विज्ञानशास्त्रातलं योगदान
डॉ. नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षण आणि कणांच्या वस्तुमानाशी संबंधित असलेला ‘हॉयल-नारळीकर सिध्दांत’ मांडला. सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी या सिद्धांतावर काम केलं. तसंच बिग बँग सिद्धांताला पर्यायी स्थिर अवस्था सिद्धांत आणि श्वेत विवरांच्या संशोधनात त्यांनी योगदान दिलं आहे.
1972 मध्ये ते परदेशातून परतून टाटा मुलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्य करु लागले. 1988 मध्ये त्यांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल- भौतिक केंद्राची स्थापना केली. 2003 पर्यंत त्यांनी या केंद्राची संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. तर 1994 ते 1997 या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाच्या कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते.
विज्ञानाचे प्रसार कार्य
डॉ. नारळीकर हे सर्जनशील असे शास्त्रन होते. सर्वसामान्यांना विज्ञानातल्या विविध संकल्पनांची माहिती मिळावी, या विषयात रुची निर्माण व्हावी, यासाठी डॉ. नारळीकर यांनी विज्ञान साहित्य निर्माणासाठी मेहनत घेतली आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत विज्ञानकथा आणि ललित लेखन केलं आहे.
‘अंतराळातील भस्मासुर’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’ आणि ‘चार नगरांतले माझे विश्व’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञानातील संकल्पना गोष्टीरुपाने वाचकांसमोर मांडल्या आहेत.
पुरस्काराचे धनी
2014 साली त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर 1996 साली विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी युनेस्कोचा कलिंग पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि केंब्रिज फिलोसॉफिकल सोसायटीचे फॅलो यासह अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आलं आहे.