काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेला भारताचे अंतराळ नियामक, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरकडून मान्यता मिळाली. त्यामुळे येत्या काही महिन्यात सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात सुरु होईल. स्टारलिंकनंतर आता टेस्लाच्या चारचाकी गाड्या सुद्धा भारतात विक्रीला येणार आहे.
भारतात, मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला कंपनीचं पहिलं शोरूम – (Experience Center) सुरु झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरुमचं शुभारंभ झालं. तर, राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ट्रेड सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं.
जागतिक बाजारपेठेत कार उद्योगाच्या क्षेत्रात भारत ही तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. पारंपारिक गाड्याऐवजी इलेक्ट्रिक गाड्या निर्माण करणे हे टेस्लाचं वैशिष्ट्य आहे. मात्र, जागतिक पातळीवर या गाड्याचा खप कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत अनेक अडथळे पार करत अखेर भारतात पहिलं शोरुम – एक्सपीरियंस सेंटर सुरु होत आहे म्हणून हा कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो.
LIVE | Inauguration of 'Tesla Experience Center'
🕙 9.53am | 15-07-2025 📍BKC, Mumbai.@Tesla_India #Maharashtra #Mumbai #Tesla https://t.co/l5NnuT3cQt
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 15, 2025
टेस्ला मॉडेल वायचीच भारतात विक्री होणार
सुरुवातीला टेस्ला भारतामध्ये त्यांचं सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं मॉडेल वाय (Model Y) ही गाडी टेस्ट ड्राईव्ह आणि विक्रीसाठी ठेवणार आहे. टेस्लाच्या शांघायमधील कारखान्यातून मॉडेल वाय एसयूव्हीचे सहा युनिट्स भारतात आणली आहेत. या मॉडेलशिवाय टेस्ला मॉडेल 3 ची गाडी ही विक्रीसाठी ठेवली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबद्दल टेस्ला कंपनीने अधिकृत माहिती दिली नाहीये.
मॉडेल वाय ही एक मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. या मॉडेलची डिझाइन खूप आकर्षक असून शक्तिशाली कामगिरीसाठी या गाडीची ओळख आहे. ती लाँग रेंज आरडब्ल्यूडी आणि लाँग रेंज एडब्ल्यूडी (ड्युअल मोटर) प्रकारांमध्ये येते. ही ईव्ही फक्त 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग घेऊ शकते. 574 किमी पर्यंतची रेंज देते. त्यामुळे ती तिच्या वर्गातील सर्वात व्यावहारिक इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ओळखली जाते.
मॉडेल वाय गाडीची किंमत किती असेल?
रॉयटर्सच्या मते, जानेवारी ते जून दरम्यान टेस्ला कंपनीने भारतात सुमारे 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीचे उत्पादनं आयात केले. यामध्ये मॉडेल वाय एसयूव्हीचे सहा यूनिट्स, चार्जर आणि अन्य ॲक्सेसरीजचा समावेश होता. आयात केलेल्या मॉडेल वायच्या एका युनिट्सची किंमत ही 32,500 अमेरिकन डॉलर (27 लाख 90 हजार 864 रुपये) ते 46,000 अमेरिकन डॉलर (39 लाख 50 हजार 146 रुपये) होती.
भारतामध्ये ईव्ही वाहनांवर 70 टक्के आयात शुल्क आकारलं जातं. त्यामुळे भारतात एका गाडीची किंमत 56 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे 46 – 47 लाख रुपये असेल.
हे ही वाचा : भारतात स्टारलिंकला मान्यता; भारतात सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा
टेस्लासाठी भारत एक संधी
कार उद्योग क्षेत्रात जागतिक बाजारपेठेत भारत ही तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतात उत्पादन विक्रीची संधी मिळणं हे टेस्लासाठी महत्वपूर्ण आहे. भारतात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जात आहे. भविष्यात टेस्ला भारतातच आपला प्रकल्प उभारू शकते. ज्यामुळे रोजगारासह या वाहनाच्या किंमतीही कमी होऊ शकतात.