क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

Mahatma Basweshwar Maharaj Jayanti: लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीदिना निमित्ताने.
[gspeech type=button]

प्राचीन काळापासून ‘लिंगायत’ हा एक स्वतंत्र धर्म म्हणून अस्तित्वात आहे.  हा धर्म कोणत्याही धर्म,जात किंवा पंथाची पोट शाखा नाही. या धर्माचे आराध्य दैवत श्री शिवशंकर/ महादेव हे आहेत. महादेव हे सृष्टीच्या ‘उत्पती – स्थिती – लय ‘ या सर्व क्रियांचे ते कारक आहेत. वीरशैव लिंगायत धर्माची शक्तिपीठे संपूर्ण भारतभर आणि परदेशात पण फार पूर्वीपासून असल्याची दिसून येतात. या मठ पिठातील वेदशास्त्र अभ्यासपूर्ण  मठाधिश /मठाधिपती  गुरु – शिष्य परंपरा फार पूर्वीपासून प्रचलित आहे. या धर्माचा स्वतंत्र असा विजय ध्वज / विजय पताका फार पूर्वीपासून प्रचलित आहे.

महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कौटुंबिक जीवन

इ. स.12 शतकाच्या पूर्वार्धात सन 1105 मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जवळील इंगळेश्वर बागेवाडी येथे एका शैव कर्म उपासक कुटुंबात वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेला म. बसवेश्वर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज आणि आईचे नाव मदलांबिका असं होतं. थोरल्या बहिणीचे नाव नागंबिका आणि भावाचे नाव देवराज असं होतं.  

वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार करण्याचे ठरले. त्यावेळी त्यांच्या पेक्षा थोरली बहीण असलेल्या नागक्का हिचा उपनयन संस्कार झाला नाही आणि त्याआधी आपलाच तो का केला जात आहे ? असा प्रश्न त्यांनी विद्वान शास्त्री पंडीत यांना विचारला. तेव्हा पंडीतांनी त्यांना उत्तर दिलं की, “ती स्त्री असून, तिला शूद्र स्थान आहे.” 

आपल्या धर्मामध्ये स्त्रीला समान दर्जाचे मानले जात नाही म्हणून महात्मा बसवेश्वर यांनी स्वतःच्या उपनयन संस्कारास विरोध करून तो टाळला. त्यांच्या मते, “ प्रचलित समाजात आदिमाया स्त्रीला शूद्र स्थान असून तिला जर सर्व बाबतीत उपेक्षित ठेवलं जात असेल तर तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पुरुषांना उच्च कसं समजायचं?” हा विरोधाभास त्यांना सहन झाला नाही.  

गृहत्याग

आपल्या क्रांतिकारक विचारांमुळे कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला. ते पशुपात शैव ज्ञान भांडार असलेल्या कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या संगमावर वसलेल्या आणि ईशान्य मुनींनी स्थापन केलेल्या ‘कुडल संगम’ या तीर्थ क्षेत्री राहु लागले. तेथून पुढे त्यांनी वेदशास्त्र, तत्वज्ञान आणि भाषा अभ्यास  सुरू केला.

वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्यांनी वेदाभ्यास पूर्ण केला. बाराव्या वर्षी सोलापूर इथल्या त्यांचे मामा बलदेव यांनी आपली मुलगी गंगाबिका हिच्याशी त्यांचं लग्न लावून दिलं. म.बसवेश्वर यांची विद्वत्ता पाहून राजाने त्यांना कारकून म्हणून राजकारभार करण्यास नेमले. पण  आपल्या अंगभूत विद्वत्तेमुळे अल्पावधीतच त्यांनी राज्याच्या प्रधान पदापर्यंत मजल मारली. सलग 3 वर्षे त्यांनी राजदरबारी नोकरी केली. या कार्यकाळात त्यांनी ‘कल्याण शहराला’ राज्याची राजधानी बनवली.

शरण चळवळ

कल्याण शहरामध्ये त्यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘शरण चळवळ ‘ सुरू केली. या चळवळीत अग्रज ते अंत्यज अशा सर्व घटकांना सहभागी करून घेतलं. त्यांनी स्त्री – पुरुष समानतेचे तत्व अंगिकारलं. त्यामुळे या चळवळीत सहभागी होणाऱ्या पुरुषांना ‘शरण’ आणि  स्त्रियांना ‘शरणी’ असं संबोधलं जाऊ लागलं. 

या चळवळीचे पुढे त्यांनी विश्वव्यापक अशा लिंगायत धर्मात रूपांतर केलं. त्यामुळे पुढे या चळवळीत सहभागी झालेल्यांमध्ये ‘रोजी – रोटी – बेटी ‘ व्यवहार सुरू झाला. 

लिंगायत धर्माची विचारसरणी

समता, समानता, सरलता, बंधुत्व, जातीभेद, लिंगभेद  निर्मूलन, निर्मोही, निजमुक्त ही या धर्माची मूलभूत विचारसरणी आहे.  ‘कायक वे कैलास ‘ म्हणजे “श्रम हाच स्वर्ग” या मूलमंत्राला अनुसरून ‘दासोह’ या सूत्राचा पुरस्कृत करणाऱ्या शरण – शरणींची एक मोठी संघटनाच त्यांनी उभी केली. या संघटनेला त्यांनी ‘अनुभव मंडप’ असं नाव दिलं. 

समाजात दुष्कृत्य करणाऱ्यांनी आपला मार्ग बदलला

‘अनुभव मंडप’ सारख्या संघटनेची स्थापना करून त्यांनी क्रौर्य आणि चौर्य विरोधी विचार प्रणाली रुजवली. त्यामुळे अनेक चोर, लुटारू आपला वाईट मार्ग सोडून या चळवळीत शरण आले. दारू विकणारा म्हाऱय्या आपले वाईट कर्म सोडून वाटसरू यात्रिकांसाठी दूध, ताक,पाणी पुरवू लागला.  

‘कायक वे कैलास’ मुळे श्रम प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले. भीक, भिक्षा अथवा काम न करता फुकट खाणे बंद झाले. समाजात श्रम संस्कार रुजवले गेले. अनुभव मंडपात जी वचने लिहिली गेली तीच पुढे भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता या मार्गदर्शक तत्वांचा अंगीकार करणारी जीवन मूल्ये ठरली गेली. 

सदाचारी आचरण करताना कोणाची चोरी, असंग, राग, तिरस्कार, हत्या नको अशी वर्तणूक जपली तरच कुडल संगमेश्वर देव प्रसन्न होऊन कृपादृष्टी ठेवेल अशी समाज धारणा तयार झाली. 

गुरु-शिष्यांचे एकमेकांप्रती प्रेम

महात्मा बसवेश्वर स्वतः हरळय्या शरण आणि  कल्याणीम्मा शरणींच्या घरी ‘दासोह’ म्हणजे कष्ट केल्यानंतरचे गरजेपुरते जेवण करण्यासाठी गेले होते. अन्नदात्यांना त्यांनी ‘शरणू – शरणार्थी’ म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तेव्हा या दांपत्याने महात्मा बसवेश्वर यांच्या नमस्कारा मधून उतराई होण्यासाठी त्यांना स्वत:च्या पायावरच्या कातडीपासून बनवलेले जोडे भेट म्हणून दिले. 

शरण हरळय्या यांनी डाव्या तर शरणी कल्याणीम्मा यांनी आपल्या उजव्या मांडीवरचं कातडं काढून ते वाळून त्यापासून सुंदर सुबक असे डाव्या आणि उजव्या पायांचे जोडे तयार केले. संपूर्ण जोडे तयार होईपर्यंत त्यांनी त्या जोड्यांना जमिनीचा स्पर्श होऊन दिला नाही. त्या दोघांच्याही मांडीचे कातडे पार सोलवटून निघाले, त्यांना खूप जीवघेण्या यातना सोसाव्या लागल्या पण गुरु प्रेमासाठी त्यांनी त्या  सोसल्या. महात्मा बसवेश्वर यांना हे वास्तव समजल्यावर ते म्हणाले की, “हे जोडे कोणत्याही पशू पक्ष्यांच्या कातडी पासून बनलेले नसून ते माझ्या शरण – शरणीच्या कातडीचे बनलेले आहेत. हे मला माझ्या प्राणाहूनही प्रिय राहतील.” असे म्हणून त्यांनी ते जोडे हातात घेवून नमस्कार केला. 

लिंगायत धर्माची उपासना पद्धत

म.बसवेश्वर यांनी मंदिर आणि मठ यापेक्षा देहाची अनुभव भक्ती स्वीकारून देहावर शिवलिंग स्थापन करून, त्याची सुलभ पूजाअर्चा अंगिकारली. पंचामृत अभिषेक पेक्षा घामाचा अभिषेक सर्वश्रेष्ठ मानून ‘कायक वे कैलास’ म्हणजेच श्रम प्रतिष्ठा अर्थात ‘वर्क इज वर्कशिप’ ला उच्च स्थान दिलं. अनेक देव आणि महाराज यापेक्षा श्री शिव शंकर आणि शरण – शरणी यांच्या अनुभवातून निर्माण झालेले अनुभव वचन साहित्य सर्वश्रेष्ठ मानून त्यांची मनोभावे पूजा करून सारासार विचारसरणी आणि विवेकवाद प्रस्थापित केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Satara : सातारा जिल्ह्यातील पर्यंटन स्थळांवर कोणताही अपघात होऊ नये, कायदा-सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने जिल्ह्याधिकारी संतोश पाटील यांनी 19
Satara: काटेकर यांच्या पद्धतीनं आंबा रोपाची लागवड केल्यावर साधारणपणे रोप लावलेल्या दिवसांपासून दोन ते तीन वर्षात या झाडांना मोहर येतो.
The Cable Stay Bridge project : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत असून महाबळेश्वहून कोकणात जाण्यासाठी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ