सातारा जिल्ह्यात अनेक अशी पर्यटन स्थळ आहेत. ज्या पर्यटन स्थळाला राज्यभरातूनच नाही तर देश विदेशातून सुद्धा पर्यटक भेटी देतात. सातारचे कास पठार, महाबळेश्वर, वाई, बामनोली तापोला यासारख्या अनेक पर्यटन स्थळांना हजारो पर्यटक भेटी देतात. मात्र स्थानिक प्रशासनाने, या पावसाळ्यात पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.
सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्बंध घातले आहेत?
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत काही निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, पावसामुळे धबधब्यावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरायला, पोहायला आणि बसायला मनाई केली आहे. तसेच धबधबे, धरणे किंवा नदीच्या परिसरात दुचाकी, चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांवर असणार प्रामुख्याने निर्बंध
जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, एकीव धबधबा, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा, कास पुष्प पठार, अजिंक्यतारा किल्ला, कास तलाव, बामणोली, तसेच महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन स्थळ आणि जिल्ह्यातील धरणांवर जाण्यास निर्बंध घातले आहेत.
प्रशासनाने घातलेले निर्बंध पुढील प्रमाणे :-
सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता दिनांक 20 जून ते 19 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
1) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरायला आणि पोहायला बंदी.
2) धबधब्यावर जाणं आणि पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई.
3) धबधबे, धरणे आणि नदी परिसरात दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून)
सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.
पर्यटन स्थळे बंद राहिल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा
सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही पर्यटन स्थळं आहेत. या पर्यटन स्थळावर आसपासचे नागरिक छोटे-छोटे व्यवसाय करतात. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंधाच्या निर्णयामुळे सगळ्याच पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळत नाही. या पर्यटन स्थळावर पाण्याच्या बाटल्या, चहा, खाण्याच्या पदार्थांची विक्री करण्याचा व्यवसाय काहि स्थानिक करतात. मात्र, पर्यटकांची गर्दी कमी झाल्यामुळे हा व्यवसाय मंदावला आहे. एकूणच जिल्ह्याधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहेत, याकडेही जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.