तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये कसलीच अडचण येत नाही. जर तुमचे प्रयत्न कठोर असतील आणि करत असलेल्या कामावर तुमची निष्ठा असेल तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते. यापूर्वी आपण अनेक तरुणांची अशी उदाहरणे पाहिलेले आहेत. ज्यांनी इच्छाशक्ती बाळगून त्यांना जे हवं ते साध्य करून दाखवले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बामणवाडी गावातील एक होतकरू तरुणही अशीच वाटचाल करत आहे. या तरुणाचे नाव आहे गणेश शंकर काटेकर…
पत्रकार ते सेंद्रीय बागायतदार
व्यवसायाने पत्रकार असलेले गणेश यांनी त्यांच्या कामातून वेळ काढून एक छंद जोपासला आहे. त्यांनी आपले काम सांभाळतच त्यांच्या रानामध्ये केशर आंब्याची लागवड केली आहे. साधारणपणे 15 ते 16 वर्षांपूर्वी त्यांनी या बागेची उभारणी केली. आज त्यांच्या केशर आंब्याला राज्यातील विविध भागातून मागणी आहे. विशेष म्हणजे गणेश काटेकर हे या केशर आंब्याचे पीक पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतात. मागील अनेक वर्षापासून त्यांनी हा प्रयत्न अविरतपणे सुरू ठेवलेला आहे. आता गणेश काटेकर यांच्या आंब्याला सर्वत्र मागणी होऊ लागली आहे. कारण सेंद्रिय पद्धतीने घेतलेले पीक आणि सेंद्रिय पद्धतीनेच पिकलेला आंबा हा सर्वांच्या आवडीचा ठरू लागलाय. अगदी 700 ते 800 रुपये डझन हे आंबे असले तरी त्याची मागणी काही कमी होताना दिसत नाही.
सहा गुंठ्यात 45 रोपं
गणेश काटेकर यांनी साधारणपणे 15 वर्षांपूर्वी त्यांच्या शेतातील सहा गुंठ्यामध्ये केशर आंब्याची 45 रोपं लावली. त्यानंतर त्यांनी हळूहळू या रोपांना सेंद्रिय पद्धतीने वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणत्याही प्रकारे रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर केला नाही. जो आंब्याचा हंगाम असेल त्या हंगामात त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतले.
गणेश काटेकर यांची सेंद्रिय पद्धत
केशर आंब्याची रोप लावायची झाल्यास सुरुवातीला दोन बाय दोनचा खड्डा काढून त्यामध्ये गाळ भरला जातो. सोबतच ग्रीन हार्वेस्टरही टाकायचे. ग्रीन हार्वेस्टर हे संपूर्णपणे सेंद्रिय खतांमध्ये मोडते. यामुळे रोपांना हूमनी (एक प्रकारची कीड) किंवा इतर किड लागत नाही. अशी प्रक्रिया करून रोपाची लागवड केली जाते. साधारणपणे तुम्ही रोप लावलेल्या दिवसांपासून दोन ते तीन वर्षात या झाडांना मोहर येतो. त्यावेळी गाईचे गोमूत्र, कंपोस्ट खत, गांडूळ खत याचा वापर केला जातो. जर मोहर आल्यानंतर झाड कमकुवत वाटत असेल तर तो मोहर काढूनही टाकला जातो.
फवारणी कशाची करतात?
या सेंद्रिय पद्धतीने पीक घेताना या झाडांवरती गांडूळ खतातून निघणाऱ्या वर्मी वॉश, निंबोळी अर्क यांच्या फवारण्या केल्या जातात. सोबतच वारुळाची माती, वडाखालची माती, गाईचे शेण , गोमूत्र, बेसन पिठ, गुळ यापासून बनविलेल्या ‘जिवामृत’ची फवारणी या झाडांवर केली जाते.
सेंद्रीय पद्धतीचा फायदा
खत आणि फवारणीसाठी सेंद्रिय पद्धत वापरल्याने या आंब्याला मोहर चांगला येतो. तसेच आंब्याचा आकार नैसर्गिक ठेवून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे केमिकलचा वापर न करता हे पीक घेतले जाते. यामुळे आंब्याची गोडी आहे तशीच राहते. या पद्धतीने घेतलेल्या पिकामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. या उलट तुम्ही जर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला तर, त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतानाची आपण अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने घेतलेले पीक हे आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरते. सोबतच हे पीक ज्या वेळेला येते त्यावेळी ‘पाड’ लागल्याशिवाय आंबा उतरवला जात नाही. त्यामुळे होतं काय तर आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकला जातो आणि आंब्याची चव ही अधिक गोडसर बनते.
हेही वाचा : केबल स्टे ब्रिज या प्रोजेक्टमुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याची कनेक्टिविटी वाढणार
राज्यातील विविध भागातील ग्राहकांकडून पसंती
मागील अनेक वर्षांमध्ये राज्यातील विविध भागातून काटेकर यांच्याकडे केशर आंबा घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागतेय. हाच केशर आंबा घेण्यासाठी अनेक ग्राहक बामणवाडी मध्ये येतात. काटेकर यांनी केलेल्या या प्रयोगामुळे सर्वांना पौष्टिक आणि गोड केशर आंब्याची चवचा चाखायला मिळतेय.
अर्धवेळ काम आणि उत्पन्न पूर्णवेळाचं
गणेश काटेकर हे व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांचे दैनंदिन काम करून ते आपल्या बागेमध्ये वेळ देतात. मागील अनेक वर्षापासून हे पीक घेत असताना साधारणपणे सर्व खर्च जाऊन गणेश काटेकर यांना एक लाख रुपये एका हंगामाला मिळतात. गणेश काटेकर यांनी अनेक वर्ष सेंद्रिय पद्धतीचा वापर करत केशर आंबा हे पीक घेतले आहे. आपले काम करत आपल्या छंद जोपासणाऱ्या गणेश काटेकर यांनी तरुणांना यातून एक वेगळा संदेश दिला आहे.