ऑफिसला जाताना प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर सगळ्यात पहिलं ऐकायला मिळतं ते म्हणजे ‘झोपच पूर्ण होत नाही’. हे फक्त तुमच्या बाबतीतच घडतं असं नाही. अनेकांची हीच तक्रार असते. या संदर्भात ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेने सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार देशभरातील 59 टक्के लोकं हे 6 तासापेक्षा कमी वेळ झोपत असल्याचं समोर आलं आहे.
तुम्ही कदाचित 7 – 8 तास झोपतही असाल. पण जर का तुम्ही बाथरुमला जाण्यासाठी 2 – 3 वेळा उठत असाल तर तुमची झोपमोड होते. 7 ते 8 तासाची सलग झोप मिळत नाही. या सगळ्याला मोबाईल फोनचा अतिरेक वापर हे एकमेव कारण नाही, तर अनेक कारणं आहेत. पाहुयात ही अन्य कारणं कोणती आहेत.
भारतीय पुरेशी झोप घेत नाहीत
‘लोकल सर्कल्स’ या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण केलं. यामध्ये विविध वयोगटातील व्यक्ती साधारण किती तास झोपतात, सलग झोप घेण्यात काय अडचणी आहेत, त्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात या विषयावर लक्ष केंद्रीत केलं होतं. या सर्वेक्षणात 348 जिल्ह्यातील 43 हजार लोकांचा सहभाग होता. यामध्ये 61 टक्के पुरुष आणि 39 टक्के महिला होत्या.
या सर्वेक्षणातून असं समोर आलं की, देशातील 39 टक्के लोकं 6 ते 8 तास झोपतात. 39 टक्के लोकं 4 ते 6 तास झोपतात. तर 20 टक्के लोकं फक्त 4 तासचं झोप घेतात. फक्त आणि फक्त 2 टक्केच लोकं हे 8 ते 10 तासासाठी झोपतात. तर उरलेले 59 टक्के लोकं हे सहा तासापेक्षा कमी वेळ झोपतात.
राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार प्रौढ व्यक्तिंनी 7 तास झोपणं आवश्यक असतं. डॉ. कार्लोस नूनीस सांगतात की, ‘निरोगी आरोग्यासाठी आहार आणि व्यायाम जेवढा आवश्यक आहे. तेवढ्याच प्रमाणात योग्य झोप ही अत्यावश्यक आहे.’ डॉ. कार्लोस नूनीस यांनी जागतिक पातळीवर याच विषयावर संशोधक केलेलं आहे.
हे ही वाचा : मुलांची पुरेशी झोप – निरोगी वाढीची गुरुकिल्ली
भारतीयांना का झोप लागत नाही?
अनेकदा झोप अपुरी राहिल्यावर आपण मोबाईलला दुषणं देतो. रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहत बसल्यामुळे झोप लागत नाही हे नेहमीच कारण सांगितलं जातं. मोबाईल नव्हते तेव्हा हा आरोप टिव्हीवर व्हायचा. मोबाईल आणि टिव्ही पाहण्यासाठी झोपेचा वेळ तिकडे दिला जातो हे मान्य. पण एकदा का झोपी गेल्यावर तुम्हाला सलग, शांत, कोणतंही व्यत्यय न येणारी झोप लागते का? जर याचं उत्तर नकारात्मक असेल तर तुमच्या अपुरी झोपेला फक्त मोबाईल किंवा टिव्ही कारणीभूत नाहीत.
आपल्या वयानुसार, कामाच्य पद्धतीनुसार, जेवनाच्या वेळा, अन्नपदार्थांचं पचन, झोपण्यापूर्वी मनोरंजनाचा वेळ वा अभ्यासाच्या वेळा यानुसार प्रत्येकांची झोपण्याची वेळ ही वेगवेगळी असते. झोपेचेही वेगवेगळे टप्पे असतात. जेव्हा आपण कोणतेही व्यत्यय न येता सलग सात – आठ तास झोपतो. तेव्हाच आपण झोपण्याची एक प्रक्रिया पूर्ण करतो.
झोपमोड होण्याची कारणं
लोकल सर्कल्सच्या अभ्यासानुसार, 72 टक्के म्हणजे 14,952 लोकं ही रात्री बाथरुमला जाण्यासाठी झोपेतून उठत असतात. तर 25 टक्के लोकांची झोपमोड ही मच्छर आणि बाहेरुन येणाऱ्या आवाजामुळे होते. 9 टक्के लोकांना स्लीप एपनिया (झोपेत श्वासोच्छवासामध्ये अडथळा येणं) या आजारामुळे झोपेत व्यत्यय येते. जर लहान बाळ, मुलांच्या किंवा साथीदारांच्या बाजुला झोपत असतील तर त्यांच्या हालचालीमुळे 9 टक्के लोकांची झोपमोड होते. तर 6 टक्के लोकांनी मोबाईलवर रात्री येणारे मॅसेज, नोटिफिकेशन किंवा फोनमुळे झोपमोड होत असल्याचं सांगितलं आहे.
या कारणांसह ‘रेस्टलेज लेग्ज सिंड्रोम’ या आजारामध्ये रुग्णांच्या पायात मुंग्या येतात, गोळे येतात, पायाची जळजळ होते त्यामुळे ते पाय हलवतात पर्यायी झोपमोड होते. झोपेत दात चावणे, हृदयविकार, घोरणे, श्वास घेताना त्रास या कारणांमुळे झोपमोड होते असं या सर्वेक्षणाच्या निष्कर्षामध्ये नमुद केलं आहे.
हे ही वाचा : प्रसूतीनंतर येणारे नैराश्य (PPD) – एक गंभीर समस्या
सर्वेक्षणातून समोर आलेली उशीरा झोपण्याची कारणं
रात्री उशीरा जेवण्याच्या वेळा, रात्री उशीरापर्यंत ऑफिसची कामं करणं, नोकरीसाठी करावा लागणारा दूरचा प्रवास, कामाला जाणाऱ्यांची सकाळी लवकर उठून दिवस सुरू करण्याची गरज अशा अनेक कारणांमुळे लोकांना झोपेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. रात्र पाळीत काम करणाऱ्या लोकांच्याही नैसर्गिक रित्या ठरलेल्या रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येत असतं.
ही झोप पुर्ण होत नसल्यामुळे जवळपास 47 टक्के भारतीय हे महिन्याला एक तरी सीक लिव्ह घेत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
जर झोपेचा वेळ आणि गुणवत्ता सुधरायची असेल तर जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे, असं मत लोकल सर्कल्सचे संस्थापक सचिन तापारिया यांनी मांडलं आहे.
पुरुषांपेक्षा स्त्रियांना झोपण्यासाठी कमी वेळ मिळतो
या अपुऱ्या झोपेचे सर्वाधिक बळी या महिला ठरतात. घरातली कामं, रात्री मुलांना झोपवणं, मुलं रात्री उठले असतील तर त्यांना पुन्हा झोपवणं, नवजात बाळाची काळजी घेणाऱ्या महिला, सकाळी लवकर उठून कुटुंबाच्या सकाळचा चहा – नाश्ता, डबाअशा सगळ्या गोष्टी तयार करणं या सगळ्या दैनंदिन कामांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना खूप कमी वेळ झोपण्यासाठी मिळतो. या कारणांसह शरीरातील हार्मोन्समध्ये वारंवार होणारा बदल हाही महिलांना पुरेशी झोप न मिळण्यामागचं महत्वाचं कारण आहे.
‘झोप न लागणं’ आजारी असल्याचं लक्षण
झोप न लागणं, झोपल्यावर वारंवार उठणं यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असतं. सातत्याने झोप अपुरी राहिल्यावर हृदयाशी संबंधित, रक्तदाब, लठ्ठपणा, पचनाशी संबंधित आजार आणि टाइप 2 चा मधुमेह हे आजार होण्याची शक्यता असते.
या सगळ्या संभावित आजारांची आपल्याला माहिती असते. तरी आपण याकडे बऱ्याचदा दुर्लेक्ष करतो. या सर्वेतून असं लक्षात आलं की, काहि लोकं ही रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवशी दुपारी झोपून आठवड्याभराची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर 23 टक्के लोकं ज्यांना शनिवार, रविवार अशी दोन दिवसाची सुट्टी असते ते या दोन दिवसात झोप पूर्ण करतात. पण वैद्यकीय संशोधनानुसार, दररोज सात ते आठ तासाची झोप न घेता, मध्ये कधितरी दहा तासापेक्षा जास्त झोपून झोप पूर्ण केल्याने संभावित आजारापासून सुटका होते असं नाही आहे.