हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकदा आपल्या गरजेपेक्षा जास्त जेवण आपण ऑर्डर करतो. हे जेवण जर आपण कुटुंबासोबत गेलो असू तर सोबत पार्सल घेतो. पण तेच मित्रमैत्रिणींसोबत गेलो असू तर बहुतांशी वेळा ते तसंच टेबलवर टाकून देतो. यामुळे अन्नाची नासाडी होते. दिवसभरात हॉटेलमधून ग्राहकांनी ऑर्डर केलेलं आणि न संपवलेलं बरचसं अन्न फेकून द्यावं लागतं.
यावर युक्ती म्हणून पुण्यातल्या एका दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी जेवण फेकून दिल्यास 20 रुपये दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. ही कल्पना जरी भारी वाटत असली तरी सोशल मीडियावर यावरून वाद निर्माण झाले आहेत.
एक्स या प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तिने एका हॉटेलच्या बाहेर व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेन्यूचा फोटो शेअर केला आहे. आणि त्यावर जेवण प्लेटमध्ये उरल्यास आकारला जाणारा दंड हे हायलाईट केलं आहे. जेवणाची नासाडी होऊ नये यासाठी हॉटेल चालकांच्या या निर्णयाचं त्याने कौतुक केलं आहे. हे हॉटेल नेमकं कोणतं त्याचं नाव जाहीर केलेलं नाहीये.
ग्राहकांनी त्यांना हवं आहे तेवढ्याच पदार्थांची ऑर्डर द्यावी, मागवलेलं सगळं जेवण संपवावं, जेवण वाया जाऊ नये यासाठी हॉटेल चालकांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्तुत्य असल्याचं मत अनेक युजर्सनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलं आहे.
यासह अनेक हॉटेलमध्ये याचं अनुकरण केलं पाहिजे असं मत काही युजर्सनी व्यक्त केलं. तर सगळ्याच हॉटेल चालकांनी जेवण वाया घालवणाऱ्या ग्राहकांवर दंड आकारला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
हॉटेलशिवाय अनेक सोहळ्यांमध्ये, लग्न समारंभामध्येही उरलेलं अन्न कचरापेटीत टाकलं जातं. तेव्हा अशा ठिकाणीही दंड आकारावा अशी मागणी काही युजर्सनी केली आहे.
मात्र सगळ्याच युजर्सनी या दंडाला सहमती दाखवली नाहीये. काही युजर्सनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, दंड आकारण्याआधी जेवणाची चवही तशी उत्तम असणं गरजेचं आहे. जर एखादा पदार्थ मागवला पण तो चांगल्या पद्धतीने तयार केलेला नसेल, त्याची चव आवडीप्रमाणे नसेल तर कसा खाल्ला जाणार? असा प्रश्न उपस्थित करत हा दंड चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
तर एका युजरने असं म्हटलं आहे की, अन्न फुकट घालवणं चुकीचं आहे. पण अशापद्धतीने हॉटेलमध्ये दंड आकारणं हे चुकीचं आहे. तर काहीजणांनी म्हटलं आहे की, ग्राहकांना हॉटेलमध्ये दर्जेदार, चांगल्या चवीचं जेवण जेवायला दिलं पाहिजे. दंड आकारला जाईल या भितीने जेवण करणं चुकीचं आहे.
दरम्यान, अनेक हॉटेलमध्ये उरलेलं जेवण हे अनेकदा गरजुंपर्यंत पोहोचविलं जातं. मात्र, ताटात घेऊन अर्ध खाऊन टाकलेलं अन्न हे थेट कचरापेटीत टाकावं लागतं. ते अन्न पूर्ण वाया जातं. यासाठी ग्राहकांनी आपण खाऊ शकतो एवढंच अन्न मागवणं, अन्नाची नासाडी होणार नाही याची दक्षता बाळगणं गरजेचं आहे.