तुम्ही 9वी, 10वी, 11वी किंवा 12वीत आहात, तर सध्या तुमच्या डोक्यात एकच विचार सुरू असेल की, आता पुढे काय करायचं? कोणतं करिअर निवडायचं? आपल्याला नेमकं कशात इंटरेस्ट आहे, हे कसं ओळखायचं? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील, बरोबर ना?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भारत सरकारने एक खास ॲप तयार केलं आहे. ‘माय करिअर ॲडव्हायझर’. हे ॲप तुमच्यासाठी एक पर्सनल करिअर गाईडसारखं काम करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे ॲप NEP 2020 म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार बनवलेलं आहे. या ॲपमध्ये फक्त पारंपरिक करिअरबद्दल नाही, तर आजच्या युगातील नव्या संधींचाही विचार करण्यात आला आहे.
‘माय करिअर ॲडव्हायझर’ ॲप काय आहे?
हे ॲप शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी खास बनवलं आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि व्यक्तिमत्त्वानुसार योग्य करिअर निवडायला मदत करणं, हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही या ॲपमधून फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारख्या पारंपरिक करिअरबद्दलच नाही, तर आजच्या आधुनिक जगातील गेमिंग, ई-स्पोर्ट्स, डिझाइन, मीडिया, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, पर्यावरण, संशोधन अशा अनेक क्षेत्रांतील संधींबद्दल माहिती घेऊ शकता.
या ॲपमध्ये काय खास आहे?
या ॲपमध्ये तुम्हाला तीन प्रश्नावली मिळतील. या प्रश्नावली तुम्हाला 45 मिनिटांत पूर्ण करता येतात. तुम्हाला कोणत्या कामात जास्त रस आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी सहज शिकू शकता, हे या प्रश्नावलीतून कळतं.
तुमची आवड काय आहे, कोणत्या गोष्टी करायला तुम्हाला मनापासून आवडतात? गेमिंग, चित्र काढणं, संशोधन करणं की लोकांना मदत करणं? तसंच तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? पैसा कमावणं की समाजासाठी काहीतरी चांगलं करणं? अशाप्रकारची प्रश्नावली पूर्ण केल्यावर, हे ॲप तुमच्यासाठी एक खास रिपोर्ट तयार करतं. हा रिपोर्ट तुमच्यासाठी अगदी टेलर-मेड असतो. या रिपोर्टमध्ये तुम्हाला 1500 हून अधिक करिअर ऑप्शन्समधून तुमच्यासाठी सर्वात योग्य असे करिअर मार्ग सुचवले जातात. यामुळे, तुम्हाला करिअर निवडताना होणारा गोंधळ कमी होतो.
‘माय करिअर ॲडव्हायझर’ ॲप तुम्हाला एक दिशा देतं, पण त्या दिशेवर चालायचं कसं, यासाठी तुम्हाला आणखी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
संशोधन करा: ॲपने सुचवलेल्या करिअर ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती मिळवा. त्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या पदव्या, कोणते कोर्स आवश्यक आहेत कोणती कौशल्ये लागतात, हे जाणून घ्या.
तज्ज्ञांशी बोला: तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी बोला. त्यांच्याकडून प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाबद्दल जाणून घ्या.
प्रॅक्टिकल अनुभव घ्या: शक्य असल्यास, इंटर्नशिप किंवा पार्ट-टाइम जॉब करून त्या क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.
हे ॲप वापरण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत
My Career Advisor या नावाने गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर दोन्हीवर हे ॲप उपलब्ध आहे.
तुम्ही तुमच्या फोनवर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर ओपन करा.
सर्च बारमध्ये “My Career Advisor” असं टाईप करा.
तुम्हाला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचं अधिकृत ॲप दिसेल. पिवळ्या आणि केशरी रंगाचे हे ॲप असेल.
लगेच ते ॲप डाऊनलोड करा.
ॲप उघडल्यावर, तुम्ही त्यात रजिस्टर करून प्रश्नावली सोडवू शकता
‘माय करिअर ॲडव्हायझर’ ॲप हे तुमच्या करिअरच्या प्रवासातील एक महत्त्वाचं साधन आहे. हे ॲप वापरून तुम्ही तुमच्या आवडीचा मार्ग शोधू शकता आणि भविष्यात एक यशस्वी करिअर घडवू शकता.