पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 23 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती, पाकिस्तानवर राजनैतिक दबाव, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सवलती स्थगित करणे, पाकिस्तानी लष्करी कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे निर्देश देणे यासारखे निर्णय घेत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे.
लष्करी सामर्थ्य वापरणं, प्रतिहल्ला करणं या मार्गापेक्षा पाकिस्तानची आर्थिक कोंडी करुन भारत पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर देऊ शकतो. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. दररोज लागणाऱ्या वस्तूही पाकिस्तान भारताकडून आयात करतो. या दोन्ही देशामधला व्यापाराचं प्रमाण पाहता भारत सरकारच्या व्यापार थांबवण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी होणार आहे. तसंच दैनंदिन वस्तूंचा पुरवठाही खंडीत होणार आहे.
भारत पाकिस्तानला कोणत्या वस्तू निर्यात करतो?
भारत हा पाकिस्तानकडून कपडे, फळं अशा गोष्टी आयात करतो. मात्र, भारताकडून पाकिस्तानामध्ये अत्यावश्यक वस्तूंसह अनेक वस्तू निर्यात केल्या जातात. यामध्ये औषधं, वैद्यकीय उपकरणं, अन्नपदार्थ, सेंद्रिय खतं, गुरांचा चारा, लोखंड, स्टील अशा विविध क्षेत्रातल्या वस्तूंची निर्यात पाकिस्तानमध्ये केली जाते. त्यामुळे भारताकडून जर अन्नपदार्थ आणि औषधं पाठवली नाहीत तर पाकिस्तानामध्ये या अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवेल. याची झळ सरकारसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे.
भारतीय वस्तूंसाठी पाकिस्तानला दुप्पट किंमत मोजावी लागणार
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह संस्थेच्या मतानुसार, भारत आणि पाकिस्तानकडून अधिकृतरित्या व्यापार थांबवण्यात आला आहे. तरिही पाकिस्तान अन्य देशाकडून भारतीय वस्तूंची आयात करु शकतो. मात्र यासाठी त्यांना त्या वस्तूची दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे.
2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर या दोन्ही देशा दरम्यानचे व्यापारी संबंध बिघडलेले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन हा दर्जा काढून टाकला आणि पाकिस्तानातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूवर थेट 200 टक्के कर लादला.
भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्ताने भारतासोबत व्यापारी संबंधांना स्थगिती दिली होती. तेव्हापासून या दोन्ही देशांदरम्यान, अधिकृत व्यापार बंद झाला होता. या काळामध्ये फक्त औषधांची निर्यात केली जायची.
हे ही वाचा : भारतानं केली पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांची कोंडी
भारत – पाकिस्तान दरम्यानचा व्यापार
पाकिस्तानसोबतचा अधिकृत व्यापार बंद झाला होता. तरिही एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताने 447.7 दशलक्ष अमेरिकन डॉलरची निर्यात केली आहे. या निर्यातीमध्ये औषधांचा समावेश आहे.
या निर्यातीमध्ये प्रामुख्याने 110.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या औषधनिर्माण वस्तू, 129.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे सक्रिय औषध घटक (एपीआयएस – APIS), 85.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची साखर, 12.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे ऑटो पार्ट्स आणि 6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची खते यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
याउलट, पाकिस्तानमधून भारतात 0.42 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंमतीची आयात झाली आहे. या आयातीमध्ये 78 हजार अमेरिकन डॉलर्स किमतीचे अंजीर आणि 18,856 अमेरिकन डॉलर्स किमतीच्या तुळस आणि रोजमेरी सारख्या औषधी वनस्पतींचा समावेश होता.
हे ही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू
अन्य देशांच्या माध्यमातून पाकिस्तानात भारतीय वस्तू
या दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार थांबलेला असला तरीहि पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर मार्गे भारतीय वस्तूची आयात करत असतो. या व्यापाराची किंमत साधारणत: 10 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. यामध्ये केमिकल्स, कॉटन, चहा पावडर, कॉफी, डाईज, कांदा, टॉमेटो, साखर, मीठ, लोखंड, स्टील आणि ऑटो पार्ट्सची आयात करतात.
तर भारतही अन्य देशाच्या माध्यमातून पाकिस्तानमधून हिमालयन पिंक सॉल्ट आणि सुकामेवा जसं की खजूर, जर्दाळू आणि बदाम याची आयात करतो.
सध्याच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये भारतातून मागवाव्या लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. तसंच पुरवठा साखळीवरही याचा नकारात्मक परिणार होणार आहे.