शास्त्रोयुक्त उपचारपद्धती आणि निरोगी जीवनशैलीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आयुर्वेदाची जगभर प्रचार प्रसार व्हावा यासाठी 2016 सालापासून आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा या विशेष दिनाची दशकपूर्ती वर्ष आहे. आज जवळपास 150 देशांमध्ये हा आयुर्वेद दिन साजरा केला जातो.
दरवर्षी धनतेरस या दिवशी हा आयुर्वेद दिवस साजरा केला जायचा. मात्र, चंद्राच्या कलेवर आधारीत असलेल्या कॅलेंडरमध्ये तिथीनुसार बदल होतो. त्यामुळे गॅगरियन कॅलेंडरनुसार एक दिवस निश्चित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यानुसार या वर्षापासून प्रत्येक वर्षी 23 सप्टेंबर या दिवशी हा आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे.
धरतेरस या दिवशीच आयुर्वेद दिवस का साजरा केला जायचा?
सन 2016 सालापासून भारत सरकारने धन्वंतरी जयंती दिनी म्हणजेच धनतेरस या दिवशी आयुर्वेद दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. धनतेरस हा सण कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. गॅगरियन कॅलेंडरनुसार साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यामध्ये ही धन्वंतरी जयंती असते.
भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे प्रवर्तक मानलं जाते. त्यांच्याकडून आरोग्य आणि संपत्तीचं वरदान मिळत अशी श्रध्दा आहे. या श्रध्देपोटी धन्वंतरी जयंती दिनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
आयुर्वेद दिनामध्ये बदल का केला?
धन्वंतरी जयंती ही तिथीनुसार काढली जाते. ती चंद्रकलेवरील आधारित कॅलेडरच्या तिथीनुसार असते. दरवर्षी या दिवसामध्ये बदल होत असे. त्यामुळे जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करताना त्यानिमित्ताने विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गॅगरियन कॅलेंडरनुसार एक दिवस निश्चित केल्यास जगभरात दरवर्षी यानिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करणं शक्य होतं.
पण मग 23 सप्टेंबर हाच दिवस का निवडला गेला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 23 सप्टेंबर हा दिवस शरद ऋतूतील विषुववृत्ताशी जुळतो. या दिवशी दिवस आणि रात्र जवळजवळ समान असतात. ही खगोलीय घटना निसर्गातील संतुलनाचं प्रतीक आहे. आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे आपल्या शरीर, मन, आत्मा यांच्या सुसंगतीवर आणि संतुलनावर भर दिला जातो तसाच हा दिवस आहे. त्यामुळे आयुष मंत्रायलाने आयुर्वेद तत्वज्ञानाशी साम्य साधणाऱ्या या दिवशी (23 सप्टेंबर) आयुर्वेद दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भारत सरकारने 23 मार्च 2025 रोजी गॅझेटद्वारे या निर्णयाची घोषणा केली.
आयुर्वेद दिनाच्या संकल्पना
आयुर्वेद ही सर्वात प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धत आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली ही उपचार पद्धत आताच्या आधुनिक काळातही तितकीच सुसंगत आहे. आज अनेक लोकं दीर्घकाळ आजारावर उपचार घेण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करतात. निरोगी व्यक्तिही निरोगी राहण्यासाठी तर आजारी व्यक्ती आजारातून मूळापासून बरे होण्यासाठी या आयुर्वेद शास्त्राचा वापर करु शकतात. सहज, सोपी, शिस्तबद्ध अशी ही उपचारप्रणाली आहे. रोगाला प्रतिबंध करणे आणि आरोग्याचं संवर्धन करणं हेच आयुर्वेदाचं मूळ उद्देश आहे.
आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना पटावं, आणि अधिकाधिक देशांमध्ये लोकांपर्यंत या उपचार पद्धतीचा प्रसार व्हावा यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी, “लोकांसाठी आणि ग्रहांसाठी आयुर्वेद” ही संकल्पना ठरविण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांशी आणि वैयक्तिक आरोग्य आणि ग्रहाचे कल्याण या दोन्हींचे रक्षण करण्यासाठी आयुर्वेदाची गरज हा विचार मांडते.
2016 साली आयुर्वेद आणि मधुमेह, 2017 मध्ये आयुर्वेद आणि वेदना कमी करण्याचे उपचार 2018 मध्ये सार्वजनिक आरोग्य अशा वेगवेगळ्या संकल्पनावर हा दिवस साजरा केला गेला आहे. 2019 साली “दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद” , 2020 साली “कोविड-19साठी आयुर्वेद”, 2021 साली “पोषणासाठी आयुर्वेद”, 2022 साली “हर दिन हर घर आयुर्वेद” आणि 2023 साली “एक आरोग्यासाठी आयुर्वेद” यासारख्या थीम्सने आयुर्वेदाची बदलत्या काळातील गरज स्पष्ट केली. तर 2024 साली “जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद इनोव्हेशन” या संकल्पनेने आयुर्वेदाची वाढती वैज्ञानिक आणि धोरणात्मक गरज दर्शविली.
यंदा आयुर्वेद दिन कसा साजरा होणार?
दरवर्षी या दिनी देशात आणि परदेशातही दिलेल्या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे मोहिमां आणि व्याख्यानं याचं आयोजन केलं जातं. यंदा राष्ट्रीय पातळीवर हा दिवस साजरा करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवा (एआयआयए – गोवा) याची नोडल संस्था म्हणून निवड केली आहे.
2022 साली गोव्यातील एआयआयए संस्था कार्यरत झाली. तेव्हापासून हे केंद्र आयुर्वेद शिक्षण, रुग्णसेवा आणि संशोधनाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झालं आहे. 300 हून अधिक पदवीपूर्व विद्यार्थी, 10 पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि 100 खाटांच्या आयुर्वेद रुग्णालयासह 22 हून अधिक विशेष बाह्यरुग्ण सेवां अशा एकूणच आयुर्वेदाच्या परंपरा आणि आधुनिकतेच्या मिश्रणाचं हे केंद्र प्रतीक आहे.
या वर्षीच्या उत्सवाच्या आदल्या दिवशी, एआयआयए गोवाने जनजागृती व्याख्याने, मिथकांचे खंडन करणारे सत्र आणि पथनाट्ये, वैद्यकीय शिबिरे, आयुर्वेदासाठी धावणे आणि निरोगी पाककृती अशा विविध सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं.
क्विझ, पोस्टर-मेकिंग, निबंध आणि लघुपटांमधील स्पर्धांमध्ये तरुणांनी विशेष सहभाग घेतला होता.
आजच्या दिनी या संस्थेत आयुर्वेदाच्या अविरत प्रवासाचे भव्य प्रदर्शन करण्यासाठी धोरणकर्ते, संशोधक, अभ्यासक आणि नागरिक एकत्र जमणार आहेत.
एआयआयए, गोवा हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटींसाठी एक प्रमुख ठिकाण आहे. इथे त्यांना आयुर्वेदामधील भारताच्या पारंपारिक ज्ञानाची ओळख करुन दिली जाते. जग शाश्वत आरोग्यसेवा मॉडेल्सकडे अधिकाधिक वळत असताना, आयुर्वेद शास्त्र हा परंपरा आणि विज्ञान यांच्यातील, वैयक्तिक आरोग्य आणि ग्रह कल्याण यांच्यातील दुवा म्हणून भूमिका निभावत आहे. दहावा आयुर्वेद दिन हा केवळ गेल्या दशकातील कामगिरीचा उत्सव नाही, तर लोक आणि ग्रहाच्या आरोग्यासाठी – जगासोबत हे ज्ञानाचा प्रसार करण्याच्या भारताच्या संकल्पाची पुष्टी आहे.