डिजिटल युगात सगळेच व्यवहार, कामं, खरेदी, विक्री ऑनलाईन होत आहे. कोरोना काळामध्ये तर शिक्षण आणि परिक्षाही ऑनलाईन व्हायला लागल्या. विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता काही शाळा, कॉलेजेसमध्ये ऑनलाईन परिक्षा घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते. अशावेळी ऑनलाईन परिक्षेसाठी केंद्र सुरु करण्याची कल्पना संभाजी नगरमधल्या सई हस्तक हिला सुचली. पण तिच्यासमोर भांडवल कसं उभं करायचं हा प्रश्न होताच?
कर्ज पाहिजे तर बँकेत जायचं हा एकमेव मार्ग आपल्याला माहित आहे. त्याप्रमाणेच सई कर्ज काढण्यासाठी बँकेत गेली. पण बँकेने तिला कर्ज दिलं नाही त्याऐवजी तिला केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. केवळ सल्लाच दिला नाही तर, या योजनेची माहिती देऊन अर्ज कसा करायचा, काय प्रक्रिया असते अशी सगळी माहिती देत तिला मदत केली.
सध्या संभाजी नगरमधल्या सातारा परिसरामध्ये सईचं शुभवी एंटरप्राईज नावाचं ‘ऑनलाईन परिक्षा केंद्र’ आहे. एका वेळी 150 विद्यार्थी ऑनलाईन परिक्षा देऊ शकतात. संभाजी नगर हे मराठवाडा विभागाचं केंद्र आहे. अनेक मुलं तिथे शिकायला येतात. शिवाय सईच्या परिक्षा केंद्राच्या आसपास 2-3 महाविद्यालयंही आहेत. त्यामुळे तिचा चांगला व्यवसाय होत आहे. हा व्यवसाय सईनं सरकारच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेतून उभा केला आहे. तुम्हाला पण व्यवसाय सुरु करायचा आहे? मग जाणून घेऊयात काय आहे ही योजना आणि याच्यासाठी कुठे अर्ज करायचा?
स्टँड अप इंडिया योजना नेमकी काय आहे
अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीतले बांधव आणि सर्व समाजातल्या महिला ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे अशा सगळ्यांना आर्थिक भांडवल उपलब्ध करुन देणारी ही योजना आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2016 मध्ये या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेमध्ये SC, ST आणि महिला उद्योजकांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो.
स्टँड अप इंडिया हा स्टार्ट अप इंडिया या योजनेचाच एक भाग आहे. देशात नोकरी करणाऱ्यांपेक्षा स्वयं – रोजगार निर्मिती आणि व्यवसाय क्षेत्राची वाढ व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. समाजातील सर्व जातीतल्या लोकांना व्यवसाय सुरु करता यावा. महिला उद्योजकांना वाव मिळावा, त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातली पहिली अॅस्ट्रोप्रुन्यर- श्वेता कुलकर्णी!
लाभार्थीचे निकष काय आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही SC, ST समाजातले किंवा महिला असला पाहिजेत. तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी वयोवर्ष 18 पूर्ण असलं पाहिजे.
या योजने अंतर्गत ग्रीन फील्ड म्हणजे उत्पादन, सेवा आणि कृषी संलग्न व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
जर लाभार्थी स्वत: हून व्यवसाय सुरु करत नसेल आणि कर्ज त्यांच्या नावावर हवं असेल तर त्या व्यवसायामध्ये 51 टक्के हिस्सा हा लाभार्थ्यांचा असला पाहिजे.
याशिवाय लाभार्थी हा कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ब्लॅक लिस्टेड झालेला नसावा.
कर्ज पुरवठा
या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यावसायिक (शेड्युल कमर्शियल बँक) बँकेमधून कर्ज घेऊ शकतो. यामध्ये संयुक्त कर्ज, मुदत कर्ज आणि खेळते भांडवल अशा तिन्ही प्रकारच्या कर्जाचा समावेश असतो. योजनेनुसार 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचं कर्ज दिलं जातं. प्रकल्प खर्चाच्या एकूण 85 टक्के भांडवल हे बँकेकडून कर्जरुपाने मिळते. जर लाभार्थी अन्य योजनेच्या माध्यमातून एकूण प्रकल्प खर्चाच्या 15 टक्क्याहून अधिक निधी मिळवत असेल तर त्या लाभार्थ्यांला 85 टक्के कर्ज दिलं जात नाही.
(कर्जाचा व्याजदर हा बँकेचा बेस रेट किंवा निधीचा किरकोळ खर्च + 3 टक्के + कर्ज परतफेडीच्या काळावर आधारित असतो.) यानुसार सप्टेंबर 2023 मध्ये या योजनेतील कर्जांवर 9.67 टक्क्यांपर्यंत व्याज आकारलं गेलं होतं.
हे कर्ज तारण सुरक्षा किंवा क्रेडिट गॅरेंटी फंड स्कीम फॉर स्टँड अप इंडिया लोन्सच्या हमीद्वारे सुरक्षित केलं जातं.
कर्ज दिल्यावर पुढच्या सात वर्षात त्याची परतफेड करायचा नियम आहे. यामध्ये जास्तीत जास्त 18 महिन्याची मुदत वाढ दिली जाते.
10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे ओव्हरड्राफ्टद्वारे मंजूर केलं जातं. लाभार्थ्यांला सोपं जावं म्हणून त्यासाठी रुपे डेबिट कार्ड दिलं जातं.
हे ही वाचा : पीएमटी ते फोर्ड फिगो – प्रवास ‘मीरानी’ चा!
2 लाखाहून अधिक लाभार्थी
केंद्र सरकारच्या या योजनेचे 2 लाखाहून अधिक लाभार्थी आहेत. स्टँड अप मित्र या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आतापर्यंत 2 लाख 75 हजार 321 जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी एकूण 62,807.46 कोटीचं कर्ज वितरीत केलं आहे. तर देशातल्या 1,48,520 बँका या योजनेशी जोडलेल्या आहेत.
संपर्क कुठे साधाल?
डिजिटल क्रांतीमुळे व्यवसायाच्या रोज शेकडो कल्पना तुम्हाला सुचतच असतील. आणि आता तर पैसा कुठून आणायचा या प्रश्नाचं उत्तर ही तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केंद्र सरकारच्या https://www.standupmitra.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करु शकता.
या संकेतस्थळावर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती, अर्ज करण्याची सुविधा आणि मार्गदर्शन हवं असेल तर कुणाशी संपर्क करायचा याची माहिती ही मिळेल.