‘महिला सशक्तीकरण मोहीम’ ही जगभरातच जोमात आहे. महत्वपूर्ण क्षेत्रात महिलांचं नेतृत्व, महिला उद्योजक घडवण्यासाठी आवश्यक ती धोरणं राबवणे यासह बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांनाही संघटीत करुन त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आता स्त्रियांचा सहज वावर पाहायला मिळतोय. गेल्या काही वर्षात महिलादिनाला एखादं फ्लाईट संपूर्ण ‘विमेन क्रू’ नं उडवलं अशी बातमी आपण वाचली असेल. हे फार तर वर्षातील एक दिवस किंवा योगायोगानं दोन दिवस होतं. मात्र, एखादं ऑफिस किंवा रिसॉर्ट हे केवळ स्त्रियाचं सांभाळत असतील तर… चेहऱ्यावर लगेच स्मितहास्य येतं ना. हा विचार खूप चांगला वाटतो. आणि प्रत्यक्षातही असं असणं खूप आनंदाचं आहे. चला तर पाहुयात गोव्यातील संपूर्णपणे महिलाच सांभाळत असणारं हे रिसॉर्ट.
गोव्यातलं क्लब महिंद्रा अकाशिया पाम्स हे रिसॉर्ट संपूर्णत: महिलांकडून सांभाळलं जातं. अनेकदा रिसॉर्ट, हॉटेलमध्ये रिसेप्शन डेस्कवर, हाऊसकिपिंग आणि किचनमध्येच काही प्रमाणात महिला कर्मचारी असतात. मात्र, महिंद्रा ग्रुपच्या या रिसॉर्टमध्ये रिसॉर्टच्या गेट पासून ते किचन पर्यंत, मॅनेजर ते टेक्निशियन्सपर्यंत सगळ्या पदावर महिला कर्मचारीच काम करत आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक, गार्डनमधला माळी, प्रमुख शेफ, मॅनेजर, आयटी तंत्रज्ञ अशा काही पुरुष मक्तेदारी असलेल्या पदावरही महिला कर्मचारी सफाईने काम करत असलेल्या पाहायला मिळतं.
महिलांकडे नेतृत्व हे मुख्य आकर्षण
गोव्यातल्या कोलवा किनाऱ्याजवळ हे रिसॉर्ट आहे. समुद्र किनाऱ्याजवळ हे रिसॉर्ट आहे म्हणून नैसर्गिक सौदर्यं हे या रिसॉर्टचं आकर्षण केंद्र आहेच. पण, महिला कर्मचाऱ्यांकडून सांभाळलं जाणार हे पहिलं रिसॉर्ट आहे, त्यामुळे या रिसॉर्टकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येक महिला कर्मचारी ही आत्मविश्वासाने, कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना नेमून दिलेली कामं यशस्वीरित्या पूर्ण करतात. पुरुष कर्मचारी नाहीत, त्यामुळे कोणतचं काम अडत नसल्याचं त्या रिसॉर्टमधल्या पर्यटकांच्या गर्दीवरुन लक्षात येतं. महिलांकडे नेतृत्व दिल्यावर ते किती जबाबदारीने सांभाळलं जाऊ शकतं याचं हे रिसॉर्ट उदाहरण आहे.
समानतेचा पाया घालणं गरजेचं
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडच्या मुख्य एच आर अधिकारी तन्वी चोक्सी म्हणतात की, अकाशिया पाम्स हे रिसॉर्ट उभं करताना या रिसॉर्टमध्ये काही तरी विशेष करण्याचा प्रयत्न होता. विविधता, समानता अशा सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात तसं घडत नाही. त्यामुळे महिंद्रा ग्रुपने ‘समानता’ या मुद्द्यावर काम करताना या रिसॉर्टची पूर्ण जबाबदारी महिलांना द्यायचं ठरवलं. रिसॉर्ट, हॉटेल ही इंडस्ट्री मोठी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी संपूर्ण रिसॉर्टचं महिलांकडून सांभाळण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणणं धाडसाचं होतं. आणि आता हा निर्णय यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याही क्षेत्रात महिला या पूर्ण जबाबदारी घेऊन त्यात यश मिळवू शकतात, याचा महिंद्रा ग्रुपने पाया घातला आहे.
सर्व वयोगटातल्या महिलांचा समावेश
या रिसॉर्टमध्ये सगळ्या वयोगटातल्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलेल्या फ्रेशर तरुणी, देशभरातील अनुभवी कर्मचारी, नोकरीमधून काही काळ विश्रांती (ब्रेक) घेतलेल्या महिलांचा समावेश आहे. या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या आणि त्यांच्या प्रगतीसाठी पूरक असलेल्या काही गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे इथं नोकरी करणं हे फक्त नोकरीपुरतंच मर्यादित नसून त्यांच्या अस्तित्वाला जपणाऱ्या गोष्टी आहेत, असं मत इथल्या महिला कर्मचारी व्यक्त करतात.
काही पर्यटक हे रिसॉर्टला आल्यावर या महिला कर्मचारी जड बॅगा रुममध्ये घेऊन जाऊ शकतील का अशी शंका व्यक्त करतात. पण काम पूर्ण झाल्यावर त्याचं कौतुक करतात.
संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, त्यांच्या हातात संपूर्ण कारभार देणं हे नेहमीच्या प्रक्रिये इतकं सोपं नव्हतं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल विभाग, सुरक्षा विभाग, किचन या तीन विभागामध्ये अनेकदा प्रामुख्याने पुरुषचं असतात. किचनमध्ये महिला कर्मचारी असल्या तरी प्रमुख शेफ हा पुरुषच असतो. त्यामुळे त्या तोडीच्या महिला कर्मचारी शोधणं हे खूप आव्हानात्मक होतं.
राज्य सरकारची जोड
गोवा सरकारच्या कायद्यानुसार गोव्यामध्ये हॉस्पिटिलिटी क्षेत्रामध्ये महिलांना रात्रपाळीवर काम करु देता येत नाही. ही एक खूप मोठी अडचण होती. पण महिंद्रा ग्रुपने महिला सुरक्षेची पूर्ण काळजी घेत गोवा सरकारच्या जोडीने थेट काम सुरु केलं. या रिसॉर्टमध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला सुरक्षित असतील का याची खातरजमा कशी करावी, यासाठी महिंद्रा ग्रुपने गोवा सरकारला यासंबंधित धोरण आखण्यास मदत केली. विविध राज्यातील महिलांच्या रात्रपाळीतल्या कामाविषयीच्या धोरणांचा अभ्यास करुन त्यानुसार गोवा सरकारने धोरण निश्चित केलं.
स्तुत्य उपक्रमाची दखल
महिंद्रा ग्रुपच्या या उपक्रमाची दखल अनेक जणांकडून घेतली जात आहे. या क्षेत्रातले अनेक व्यावसायिक या महिला विशेष मॉडेलबद्दल विचारणा करत आहेत अशाच पद्धतीचं रिसॉर्ट वा हॉटेल विविध शहरात सुरु करण्यासंबंधित चर्चा करत आहेत.
रिसॉर्टच्या सुरुवातीला तिथं फक्त पाच महिला कर्मचारी होत्या. मात्र आज 73 महिला आहेत. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. स्थानिक पारंपारिक कुटुंबामध्ये मुलींना , महिलांना रात्रपाळीत काम करु देण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती. मात्र, कंपनीतर्फे आम्ही त्यांच्या पालकांची भेट घेतली. त्यांच्या मुलींच्या सुरक्षेची खात्री दिली. तसेच रिसॉर्टच्या जवळपासचं त्यांची राहण्याची व्यवस्था केली. या सगळ्या व्यवस्थेनंतर त्या मुलींच्या कुटुंबियांनी रात्रपाळी करण्यास परवानगी दिली. अनेकदा रात्रपाळी करु शकत नसल्यामुळे अनेक मुलींना नोकरी सोडावी लागते, किंवा साधी नोकरी करावी लागते. मात्र, इथल्या व्यवस्थेमुळे अनेक मुलींना त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात आणि कंपनीमध्ये मनमोकळेपणाने नोकरी करता येत आहे.
गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे. अशा गजबजलेल्या राज्यात महिंद्रा ग्रुपने महिलांच्या नेतृत्वाखाली रिसॉर्ट चालविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. हा त्यांचा पहिला प्रयोग असून अशी आणखीन पिंक रिसॉर्ट, हॉटेल सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.