‘महिलांनी कमीतकमी तीन अपत्यांना जन्म द्यावा’, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात केलं. एकिकडे लोकसंख्येच्या बाबतीत जगाच्या क्रमवारीत अव्वल असणाऱ्या भारतात पुन्हा एकदा अधिकाधिक अपत्यांना जन्म देण्याचं आवाहन का केलं जातंय. आणखीन किती लोकसंख्या वाढवणार आहात? बरं अपत्य जन्माची जबाबदारी निसर्गानं महिलांवर सोपवली आहे. तर महिलांची इतकी अपत्य जन्माला घालायची शारीरिक-मानसिक तयारी आहे का? या अपत्यांच्या संगोपन आणि शिक्षणाचा खर्च कसा करावा? बरं हे आवाहन करणारी व्यक्ती ब्रह्मचारी आहे, अशा व्यक्तीने इतरांना अधिक अपत्य जन्माला घालण्याचं आवाहन करावं का? असे सगळे प्रश्न नक्कीच आपल्यापुढे उभे राहिले असतील.
पण पुढच्या 25 वर्षात भारताची लोकसंख्या किती असेल? आवश्यक आहे तेवढी तरुण लोकसंख्या असेल का? की वृद्धांची लोकसंख्या अधिक असेल ? असेही अनेक भविष्यातील प्रश्न आहेतच.
थोडक्यात आज भारतामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने भारताला तरुण देश म्हणूनही ओळखलं जातं. भविष्यात हा तरुण देशच असावा या अनुंषगाने पुन्हा एकदा जन्मदरांवर लक्ष दिलं जात आहे.
समाज टिकवण्यासाठी जन्मदर वाढवा
जगात अनेक संस्कृती आणि जाती या नामशेष झाल्या आहेत. याला कारण आहे ते म्हणजे घटलेला जन्मदर. एक किंवा दोनच मुलं जन्माला आल्याने पिढ्या कमी कमी होत जातात आणि हळूहळू हळूहळू त्या नष्टच होतात. कोणत्याही समाजाचा जन्मदर हा 2.1 च्या खाली येत असेल तर काही वर्षांनी हा समाज सहज नामशेष होऊ लागतो. त्यामुळे आपला समाज टिकवायचा असेल तर जन्मदर हा 2.1 हून अधिक ठेवणं गरजेचं आहे.
1998 – 2002 साली तयार करण्यात आलेल्या लोकसंख्या धोरणामध्ये सुद्धा जन्मदर हा 2.1 असावा, म्हणजे प्रत्येक दाम्पत्यांनी 3 मुलांना जन्म द्यावा, असं या धोरणामध्ये सांगितलेलं आहे.
भारतात प्रजनन दर घटला
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, भारतातल्या प्रजनन दरात हा 2.2 टक्क्यांवर घट होत तो 2.1 टक्के झाला आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, पुढील पिढीच्या वाढीसाठी प्रजनन दर हा किमान 2.1 टक्के असावा.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेच्या 1990-1992 च्या सर्वेक्षणानुसार, त्यावेळी देशाचा प्रजनन दर हा 3.2 टक्के होता. म्हणजे तेव्हा एक महिला तीन बाळांना जन्म देत होती. मात्र, त्यानंतर हे प्रमाण घटत गेलं आहे.
वृद्धाच्या लोकसंख्येत वाढ
एकीकडे जन्मदरात घट होत असताना वृद्धांच्या लोकसंख्येत मात्र वाढ होत आहे. एकीकडे नविन पिढी जन्माला येण्याचं प्रमाण कमी होत आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेली पिढी आता म्हातारपणाकडे झुकत आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट 2023’ नुसार भारतात 2050 मध्ये 20.8 टक्के लोकसंख्या ही वृद्ध म्हणजे वयोवर्ष 60 आणि त्यापुढील लोकांची असणार आहे. सन 2010 पासून या वृद्ध लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
सन 2022 साली देशात वृद्धांची संख्या ही 14.9 कोटी होती. एकूण लोकसंख्येच्या 10.5 टक्के. 2050 पर्यंत ही लोकसंख्या 34.7 कोटी म्हणजे 20.8 टक्के असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात 2022 ते 2050 या कालावधीत भारतात वृद्धांची लोकसंख्या ही 18 टक्क्यांने वाढणार आहे.
प्रजनन दरांमध्ये घट
भारतात 1950 मध्ये एक महिला सरासरी 6 बाळांना जन्म देत होती. 2000 मध्ये या जन्मदरामध्ये घट होत ती 3.4 टक्क्यांवर आली. सन 2019 -2021 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार हा प्रजनन दर 2.1 टक्क्यावर आला असून, आता महिला 2 बाळांनाच जन्म देते. यानुसार 2050 पर्यंत हा दर आखणीन घरसत जाऊन 1.7 म्हणजे फक्त एका मुलालाच जन्म देण्याची प्रथा सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
प्रजनन दर कमी पण एकूण लोकसंख्येत मोठी वाढ
देशात प्रजनन दरांचं प्रमाण कमी होताना दिसत असलं तरिही लोकसंख्या मात्र आटोक्यात नाही. 2001 साली देशाची लोकसंख्या ही 102 कोटी होती. तर 2011 मध्ये या लोकसंख्येत 17.7 टक्क्यांनी वाढ होत ती 121 कोटी झाली होती. 2011 नंतर देशात अजून लोकसंख्या गणना झाली नाहीये.
2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत वाढ झाली असली तर ग्रोथ रेट (लोकसंख्या वाढीचं प्रमाण) मात्र कमी होतं. 1991 ते 2001 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर 22 टक्के होता. तर 2001 ते 2011 दरम्यान हे प्रमाण 18 टक्के होतं. आज भारताची लोकसंख्या ही 140 कोटी आहे.
कारण 2021 सालापर्यंत देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 27टक्के लोकसंख्या ही 15 ते 29 वयोगटातल्या तरुणांची होती. त्यामुळे लोकसंख्या ही वाढती होती. यानुसार 2063 पर्यंत भारताची लोकसंख्या ही 1.67 अब्ज असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र, आताचा प्रजनन दर पाहता त्यानंतर या लोकसंख्या वाढीला उतरंड लागू शकते.
प्रजनन दर का घटत आहे
घटत्या प्रजनन दराला अनेक कारणं आहेत. एकिकडे बदलत्या जीवनशैलीमुळे तर इच्छा असूनही अनेक दाम्पत्यांना काही कारणांमुळे वंध्यत्व येत आहे. तर दुसरीकडे बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती विचारात घेता एक किंवा दोन मुलांनाच जन्म देऊन त्याचं संगोपन करण्यावर भर दिला जातो.
आई-वडिल दोघंही नोकरी करणारी असल्याने मुलांचा सांभाळ कोण करणार या कारणानेही मुलांना जन्म द्यायचा की नाही आणि किती यावर विचार केला जातो. यामुळे अनेक दाम्पत्यांनी केवळ एक किंवा जास्तीत जास्त दोनच मुलांना जन्म देण्याचा ठाम निर्णय घेतलेला असतो.
घटत्या प्रजनन दराचा देशाच्या भवितव्यावरही परिणाम
या देशाच्या विकासावर अर्थव्यवस्थेवरही दुरगामी परिणाम होतो. आज तरुण देश म्हणून ओळखला जाणार भारत देश येत्या काही काळात वृद्धांचा देश म्हणून गणला जाऊ शकतो. याचा मानवी संसाधनांवर परिणाम होतो.
आज चीन, रशिया, कोरिया अनेक युरोप देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. शहरं ओस पडत चालली आहेत. या देशामध्ये तरुण पिढीची संख्याही कमी होत चालली आहे. त्यामुळे अनेक देशामध्ये आता लोकसंख्या वाढीसाठी विविध योजना आखत आहेत.