पूर्वी बँकेत ठेवलेल्या पैशांमधून 10 रुपये जरी काढायचे असतील तरी बँकेत जावं लागायचं. हळूहळू एटीएम आले आणि आपण जिथे आहोत तिथून आपल्या खात्यातून मर्यादित रक्कम काढण्याची मुभा मिळाली. एटीएमनंतर पुढच्या टप्प्यात तर थेट आपण हातातल्या मोबाईलवरुन पैशांचे व्यवहार करु लागलो. याच डिजिटल क्रांतीमध्ये नेट बँकिंगचा पर्यायही उपलब्ध झाला. त्यामुळे बँकेतील सगळीच कामं मोबाईलवरुन करणं शक्य झालं.
हे सगळे बदल घडत असताना बँकेतील सगळे व्यवहार सुरळित व्हावे म्हणून बँकेकडून प्रत्येक खातेदारांसाठी वेगवेगळे कोड दिले जातात. ज्याच्या माध्यमातून खातेदारांची ओळख पटवणं, त्याच्या व्यवहाराचा तपशील व्यवस्थित ठेवणं आणि जेव्हा खातेदारांना ती माहिती हवी असेल तेव्हा त्या कोडच्या मदतीने हा सगळा तपशील वेळेत खातेदाराला देणं अशा विविध कामांसाठी कोडची मदत होते.
आपल्याला सगळ्यांना आपल्या बँकेच्या पासबुक आणि चेकबुकवर असलेल्या आयएफएससी (IFSC) कोडची कल्पना आहे. पण असाच अजून एक कोड असतो तो म्हणजे सीआयएफ (CIF). आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.
सीआयएफ क्रमांक म्हणजे काय?
सीआयएफ क्रमांक म्हणजे ग्राहक माहिती फाईल. इंग्रजीमध्ये त्याला कस्टमर इम्फॉर्मेंशन फाईल असं म्हटलं जातं. बँकेकडून प्रत्येक खातेदारांसाठी हा एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. खातेदारांच्या बँक खात्याच्या क्रमांकानुसार हा सीआयएफ क्रमांक त्यांच्या खात्याशी जोडलेला असतो. या क्रमांकाच्या साहय्याने खातेदारांच्या व्यावहारांवर लक्ष ठेवलं जातं. या क्रमांका अंतर्गत त्या बँकेत असलेलं तुमचं सेव्हिंग्ज खातं, संयुक्त खाते, तुम्ही काही ठेवी ठेवल्या असतील तर त्यांची माहिती, बँकेचे शेअर्स घेतले असतील किंवा त्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्याची माहिती अशी खातेदारांची बँकेसोबत असलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती या क्रमांकाच्या आधारावर एकत्र केलेली असते.
म्हणूनच, हा क्रमांक खातेदाराचा बँकेशी असलेल्या संबंधांसाठी डिजिटल ओळख म्हणून काम करतो. त्यात खातेधारकाची सर्वसमावेशक अशी वैयक्तिक आणि आर्थिक माहिती असते. थोडक्यात हा क्रमांक खातेदारांचा त्या बँकेत असलेल्या सगळ्या व्यवहारांची माहिती एकत्र ठेवतो.
हा क्रमांक आपल्या पासबुकवर, बँक स्टेटमेंट आणि ऑनलाईन बँकिग पोर्टलवर आपण पाहू शकतो.
हे ही वाचा : मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत पैशाचा व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी?
CIF क्रमांक का महत्त्वाचा आहे?
- हा क्रमांक खातेधारकांना बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी केंद्रीकृत बँकिंग सुविधा देतो.
- जेव्हा आपल्याला त्या बँकेत दुसरं खातं उघडायचं असेल किंवा ठेवी ठेवायच्या असतील, कर्ज घ्यायचं असेल तेव्हा बँकेकडे आपला मूलभूत तपशील आधीच उपलब्ध असतो. या क्रमांकाच्या मदतीने बँक हा तपशील तपासून अन्य सेवांच्या अर्जांना पटकन मंजुरी मिळते.
- फसवणूक शोधण्यासाठी, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी, क्रेडिट कार्ड फसवणूक टाळण्यासाठी आणि देखरेखीसाठी या क्रमांकाच्या साहय्याने वाढीव सुरक्षा पुरवली जाते.
- बँक कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक सेवा आणि ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी या क्रमांकाचा उपयोग होतो.
- मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगवर बँकेच्या विविध सेवांचा सहज डिजिटल अनुभव घेता येतो.
सीआयएफ आणि आयएफएससी क्रमांकामध्ये काय फरक असतो?
सीआयएफ आणि आयएफएससी हे दोन्ही बँकिंग सेवेशी संबंधित क्रमांक आहेत. या दोन्ही क्रमांकाची काम मात्र वेगवेगळी आहेत.
सीआयएफ क्रमांक हा खातेदारांच्या डिजिटल बँकिंग ओळखीचा मुख्य क्रमांक आहे. तपशील अपडेट करणे असो, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे असो किंवा खाती एकमेकांशी जोडणे असो, हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला डिजिटल ओळख देतो. ज्यामुळे तुम्हाला बँकेतल्या कोणत्याही सुविधांचा सहज लाभ घेता येतो.
तर आयएफएससी क्रमांक हा बँकेच्या शाखेची ओळख पटवण्यासाठी निर्माण केलेला असतो. हा अकरा अंकी क्रमांक असतो. दोन वेगवेगळ्या बँका दरम्यान जेव्हा व्यवहार होत असतो त्यामुळे या क्रमांकाचा उपयोग होतो. एकाच बँकेच्या अनेक शाखा असतात. त्या प्रत्येक शाखेचा विशिष्ट असा आयएफएससी क्रमांक असतो.