राष्ट्रीय महिला आयोगाकडे जानेवारी 2025 ते 5 मे पर्यंत 7,698 तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या कौटुंबिक हिंसाचार घटनेच्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार, छळ आणि धमक्या या गुन्ह्यांच्या एकूण 1,594 घटनांची नोंद झाली आहे.
गुन्ह्यांचे स्वरुप
जानेवारी महिन्यामध्ये एकूण 367, फेब्रुवारीमध्ये 390, मार्चमध्ये 513 आणि एप्रिलमध्ये 322 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण तक्रारींपैकी जवळजवळ 20 टक्के तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत.
जिवे मारण्याच्या धमक्या या गुन्हेगारी स्वरुपाच्या एकूण 989 प्रकरणे नोंदवली आहेत. जानेवारी महिन्यात अशा 268, फेब्रुवारी महिन्यात 260, मार्च महिन्यात 288 आणि एप्रिल महिन्यात 170 घटनांची नोंद झाली आहे.
प्राणघातक हल्ला या स्वरुपातील गुन्ह्यांच्या तक्रारींची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या एकूण 950 घटना या चार महिन्याच्या कालावधीत घडल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये अशा 249 घटना घडल्या. फेब्रुवारी महिन्यात 239, मार्च महिन्यात 278 आणि एप्रिल महिन्यात 183 घटना घडल्या आहेत.
हुंड्यासाठी घळ केल्याच्या एकूण 916 गुन्ह्यांची नोंद महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. त्याशिवाय बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्न असे 394 गुन्हे आणि विनयभंगाच्या 310 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.
या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये लैंगिक छळाच्या 302 तक्रारी नोंदवण्यात आल्या. तर महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांची संख्या 110 होती. तसंच घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि पाठलाग यासारख्या गुन्ह्यांच्या घटना सुद्धा नोंदवण्यात आल्या आहेत.
उत्तरप्रदेश मधून सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
उत्तरप्रदेश राज्यातून सगळ्यात जास्त 3,921 तक्रारींची नोंद झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर 50 टक्के गुन्ह्यांची नोंद ही एकट्या उत्तरप्रदेश राज्यातून होत असल्याचं आढळून आलं आहे. या राज्यातून जानेवारी महिन्यात विविध स्वरुपाच्या 952 केसेस राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात 841, मार्चमध्ये 957 , एप्रिल महिन्यामध्ये 1,087 आणि मे महिन्यामध्ये 5 तारखेपर्यंत 84 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
उत्तरप्रदेशनंतर दिल्लीमधून 688 गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. दिल्लीमधून जानेवारी महिन्यात 146, फेब्रुवारी मध्ये 172 , मार्च महिन्यात 184, एप्रिल महिन्यात 183 आणि मे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत तीन तक्रारी नोंदवल्या आहेत. तर, महाराष्ट्रामधून या पाच महिन्यात 473 तक्रारींची नोंद झाली आहे.
याशिवाय मध्यप्रदेशमधून 351, बिहारमधून 342 आणि हरियाणा राज्यातून 306 तक्रारी नोंदवल्या आहेत.
जनजागृतीमुळे घटनेच्या नोंदीमध्ये वाढ
दरम्यान, 2025 वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची नोंद ही चिंताजनक आहे. यावर महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, अलिकडे महिलांमध्ये त्यांच्याविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद करण्याची जनजागृती झाली आहे. महिला आता मोठ्या हिंमतीने गुन्हे दाखल करण्यासाठी समोर येतात.
सर्वच गुन्ह्यांच्या वर्गवारीमध्ये एप्रिल महिन्यात सगळ्यात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. या महिन्यात तब्बल 2,123 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर, या पहिल्या तिमाहीतील 881 तक्रारींची अजूनही कोणत्याच गुन्ह्यांच्या वर्गवारीमध्ये नोंद झाली नाही आहे.
2024 साली राष्ट्रीय महिला आयोगाकडे एकूण 25,743 तक्रारींची नोंद झाली होती. यामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार, घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक होतं.