केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील 244 सूचीबद्ध जिल्ह्यांना परिणामकारक नागरी सुरक्षेकरता सुसज्ज राहण्याचे आदेश दिले. 5 मे 2025 रोजी देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबतीत कळवण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 च्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही मॉक ड्रील घेण्यात येत आहे. एअर रेड वॉर्निंग, ब्लॅकआऊट प्रोसिजर, नागरिकांची सुटका या प्रक्रियांचा यादरम्यान सराव करण्यात येईल.
नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रील आयोजित करण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “युद्धजन्य परिस्थिती अथवा अचानक युद्धाला सामोरं जायला लागल्यास नागरिक किती तयार आहेत, बचावयंत्रणा कशी काम करेल, नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, आपल्या बचावकार्यातील त्रुटी समजून घ्यायला या मॉक ड्रीलमुळे मदत होईल”.
हवाईहल्ला झाल्यास त्याबाबतीत माहिती देणारी वॉर्निंग सिस्टम (इशारा यंत्रणा) तपासणे, ब्लॅक आउट प्रोसिजरचा सराव, नागरिकांची सुटका या गोष्टींचा सराव या मॉक ड्रीलमुळे होतील. 1999 च्या कारगील युद्धादरम्यानही अशा पद्धतीने मॉक ड्रील झाली नव्हती.
महाराष्ट्रात कुठे होणार मॉक ड्रील?
2010 मध्ये सिव्हिल डिफेन्सनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना सिव्हिल डिफेन्स टाऊनचा दर्जा आहे. त्यानुसार पुढील भागात 7 मे 2025 ला मॉक ड्रिल होणार आहे.
कॅटेगरी एक – मुंबई, उरण, तारापूर
कॅटेगरी दोन – ठाणे, पुणे, नाशिक, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशोट, पिंपरी-चिंचवड
कॅटेगरी तीन – औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मॉक ड्रीलकरता एनसीसी कॅडेट, सिव्हिल डिफेन्स छात्र, होमगार्ड, एनएसएस कॅडेट यांच्यासोबतच महाविद्यालय आणि शाळांच्या विद्यार्थ्यांकरता मॉक ड्रिलकरता विशेष कॅम्पस् घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी युद्धादरम्यान कसे वागले पाहिजे याकरता मॉक ड्रील खूप महत्वाची असते.
मॉक ड्रीलमध्ये काय करतात?
- या मॉक ड्रीलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात येईल. सर्व नागरी केंद्रे आणि महत्वाच्या संस्थांमध्ये सायरनची चाचणी घेतली जाईल. नागरिकांना हवाई हल्ल्यापासून सावध करण्यासाठी सायरन महत्वाची भूमिका बजावते.
- हवाई हल्ला, मिसाईल हल्ला, ड्रोन रेड झाल्यास लोकांचा तात्काळ प्रतिसाद कसा असू शकतो याचा अंदाज येईल. सायरनमुळे लोक चटकन सुरक्षित जागी जातील.
- मॉक ड्रीलमध्ये रात्री अचानक वीज बंद करून काळोख केला जाईल. ज्यामुळं शत्रूला नागरी वस्तीचा अंदाज येणार नाही. आणि लोकांचा बचाव होईल.
- औद्योगिक परिसर, सरकारी इमारती, मिलिटरी आउटपोस्ट, वीजनिर्मिती केंद्रे, सॅटेलाईट स्टेशन इथंही ही मॉक ड्रील होणार आहे.
हेही वाचा – शिमला करार पाकिस्तानकडून स्थगित; भारतासाठी तीन मोठे फायदे!



